22 November 2010

व्यथा


रखरखीत ऊन पडलं व्हतं. अंगातनं घामाच्या धारा वाहाव्या इतका प्रचंड उकाडा अन् रखरख त्या उन्हाचा व्हता. तशातच तावातावानं उपाशीपोटी पाठीवर दप्तर टाकून सायकलचा पायंडा हाणत दामू घराकडं निघाला व्हता. पोटात भूक तावत व्हती. घराची ओढ लागली व्हती. अंगात अजिबात त्राण राहिलं नव्हतं. चार महिन्याच्या आजारपणातनं नुकताच उठल्यासारखा चेहरा अशक्त दिसत व्हता. सायकलीच्या टायराखालनं धुरळा उडत व्हता. तहान लागली व्हती. बरोबरच्या सवंगड्याच्या सायकलीचा धुरळा उडून डोळ्यात जात व्हता. डोळं नुसतं चर्र करत व्हतं.

चांगलं चार-पाच किमी अंतर कापूर गेल्यावर सोनारसिद्धाच देऊळ आलं. देवळातनं देवाच्या पाया पडून पाणी पिऊन पुन्हा घराकडं सायकलीवर बसून ही टोळी निघाली. नुसती चर्चा चालू व्हती. सारी जण आता बारावीच्या वर्गात जाणार व्हती. बारावीनंतर कामधंद्याचा इचार चालू व्हता. पण डोळ्यापुढं दिसत व्हतं, फक्त
पडद्याआडचं खरंखुरं वास्तव अन् पोटात गोळा उठत व्हता. पुढं काय वाढून ठिवलयं कुणास ठाऊक, पण प्रत्येक क्षण आनंदात काढावा इतकाच इचार करून चालू घडीला चांगलं मानून सारं त्याचं जगणं चालू व्हतं.

धडपड करून तो इथपतूर शिकला व्हता. दहावीपतूर गावातल्या हायस्कूलात अन् तिथनं पुढं आटपाडीच्या ‘श्रीराम कॉलेजा’मधी अकरावीला. त्यात त्यानं सायन्स शाखा निवडली व्हती. सकाळच्या पारी साडेसहाला उठून थोडी फार कसरत करून सातच्या दरम्यान कॉलेजकडं जायाचं, पुन्हा दुपारी तीनच्या उन्हात परत घरी यायचं. पोटाला सकाळच्या पारी काय मिळालं तर मिळालं! न्हाय तर निसत्या चहाच्या पाण्यावर दिस काढायचा, असं रहाटगाडगं रोजच्याला चाललं व्हतं.

दामू घरी आला त्यानं पाठीवरची पुस्तकाची झोळी काढून पाठीवरचं वझं
हालकं केलं. अकरावीचा निकाल तीन दिसावर आला व्हता. घरी आल्याआल्याच मामाचा फोन येऊन गेल्याचं कळलं. मामाच्या म्हणण्यानुसार अकरावीला सत्तर टक्के मार्क पडलं तर शाळा शिकवा. न्हाय तर मग मी लावतू त्याला धंद्याला. बघता बघता तीन दिस निघून गेलं. एकदा दामू तीन वाजता तसाच उन्हातान्हात घरी आला तो निकालाच्या कागदाचा तुकडा हातात घेऊनच. बापानं लगेच इचारलं, ‘किती मार्क पाडलीस रं बाबा?’ उन्हानं रापल्याला, इचारानं काळवंढल्याला चेहरा बापाच्या सवालानं अन् मार्काच्या धाकानं काळाटिक्कर पडला. त्वांड उघडत नव्हतं. बापजाद्यापुढं बोलण्याची टाप नव्हती. नुसता सांबासारखा वाढल्याला दाम्या बापाच्या सवालाला काय उत्तर देणार? नुसता ढिम्म व्हुभा र्‍हायला, खाली मान घालून. हिकठ मामानं जुळणी लावून ठिवली व्हती. मामा सोन्याचांदीचा मोठा दुकानदार व्हता. चार गावात त्येचं नाव व्हतं. सदाशेठ त्येचं नावं. नावापरमान त्येनं सदान्कदा ठपला लावला व्हता. निकाल लागस्तोर त्येचं तीन दिसात अठरा फोन इवून गेलं व्हतं. त्येला माहीत व्हतं, दाम्या काय चांगलं मार्क पाडायचा न्हाय अन् आपण त्याला न्ह्यायचं अन् दुकानदारीच्या धंद्याला लावायचं.
मामाला निकाल कळला. दाम्याला गबाळ भरून तयार र्‍हायला सांगितलं. आतापातूर शिकल्याल्या पुस्तकाचं, ज्ञानाचं गठूळं गावाशेजारच्या वढ्यात टाकून त्याचं इसर्जन करायचा नामी उपायबी मामानंच सुचिवला.

दाम्या इचार करत बसला व्हता. समोर घडणारं भयाण वास्तव डोळ्यापुढनं तरळून जात व्हतं. तोंड दाबून बुक्क्यांचा मार खात जगणारा दाम्या कुणापुढं काय बोलणार? दिस कसाबसा मावळा. प्रत्येक क्षण गोठल्यासारखा वाटत व्हता. त्याच्यापुढं दोन मार्ग व्हतं. एकतर भरपूर शाळा शिकाय
ची, रातभर जागून अभ्यास करायचा. अन् आपलं उज्ज्वल भवितव्य घडवायचं, आयबापाला सुखी करायचं, बहिणीला सारं काही पुरवायचं, पण सारं होईपतूर डोळं पांढरं व्हणार! पण इलाज नव्हता. दारिद्र्याच्या उन्हातनं गेल्याशिवाय सुखाची ऊब मिळणं कठीण व्हतं. असं जगणं म्हंजी डोंबार्‍याच्या खेळातली तारंवरची कसरत असतीया, पण सारं सोसल्यशिवाय चांगलं दिस दिसणार नव्हतं. असा ह्यो बंडखोर करून जिद्दीनं सार्‍यांच्या इच्छा मारून शिकायचा एक मार्ग.

दुसरं म्हणजे बापाच्या हातनं आता काम होत न्हाय. आयनं इकटीनं पैसा आणायचा कुठनं? घरात चार-पाच खाणारी तोंड. हाता-तोंडाची मिळवणी कशी करणार? बहिणीचं लग्न करायचं कसं? धाकट्या भावाला शिकवायचं कसं? या सार्‍यावर उपाय म्हणून मग दुकानदारीसारख्या वेठबिगारीच्या धंद्यात पडून स्वत:च्या आयुष्याची राख करून आयबापाला सुखी करायचं. भावाला शिकवायचं अन् बहिणीचं लगीन करायचं. ह्यात जीव जाणार माहिती असूनसुद्धा नाईलाजानं आगीत पाय टाकायचा, त्याचं चटकं सोसायचं अन् आपलं ईप्सित साध्य करायचं, त्याबिगर माघार घ्यायची न्हाय.

दोन वाटा एकाच ठिकाणाला पोचणार्‍या, पण दोन्हीत केवढी मोठी दरी? दोन्ही वाटा, उद्दिष्ट एकच, पण दिशा मात्र वेगळ्या. कष्ट, संकटं दोन्हीकडं सारखीच. आयबापाला सुखी करायचंच दोन्ही मार्ग. मात्र एकात स्वत:च्या आयुष्याची राखरांगोळी करावी लागणार व्हती, तर दुसर्‍यात आयबापाची आज्ञा मोडून त्यालाच जरासा तरास सोसायला
लावून थोडी फार बंडखोरी करून आयुष्य प्रकाशमान करायचं.
पुढलं तीन दिस दामू नुसता इचाराच्या हेलकाव्यानं, भविष्याच्या चिंतेनं, बिनआधाराच्या अन् सतावणार्‍या भावनांच्या हिंदोळ्यावर लोंबकळत व्हता. त्याला माहीत व्हतं की, जगात कितीही मोठा प्रलय आला, भूकंप झाला, ज्वालामुखीचा भडका उडाला किंवा यापैकी काही झाले नाही तरी त्याच्यावर आभाळ कोसळणारच होतं. त्याला ह्याचीसुद्धा खात्री व्हतं की, तो दुसरा मार्गच पत्करणार अन् स्वत:चं आयुष्य प्रकाशमान करण्याऐवजी भविष्याच्या अंधारकोठडीत स्वत:ला झोकून देणार. त्याला कारणंसुद्धा तशीच व्हती. आजपर्यंत तो गरीब गाईसारखंच जगत आला. चुकूनसुद्धा कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावरही पाऊल पडू न देणारा, स्वत:च्या सुखाचा इचार न करता समोरच्याला आनंदात पाहण्यासाठी स्वत:च्या इच्छा मारणारा अन् महत्त्वाचं म्हणजे कुणालाही स्वत:च्या मनातली सल बोलून न दाखवण्याचा त्याचा स्वभाव. साधा संघर्षही त्याच्या मनात नव्हता. मात्र त्याचा जीवलग दोस्त रंग्या त्याला स्वत:चा विचार करण्यास भडकवत व्हता. कशानंही आग लावली तरी पाणी पेटणार न्हाय, तसा तो पाण्यासारखा थंडगार. मात्र पाण्यानसुद्धा दगड कापता येतो, हे दाखवणारा रंग्याही काही कमी नव्हता. त्यानं अजिबात माघार घ्यायची न्हाय असं ठरवलं व्हतं. दाम्याला पेटवायचं अन् त्याला त्याच्या ध्येयापतुर पोचवायचंच.

त्याच्या भल्यासाठीच रंग्यानं तीन दिस दाम्याची पाठ सोडली न्हाय. त्याचं मतपरिवर्तन करण्यास रंग्याला अखेर यश आलं. रंग्या दाम्याला सतत समजावत व्हता. अन् अखेर दाम्या पेटला! रंग्याचं भारुड सतत चालू व्हतं, शाळा शिकल्यावर माणसाला जगण्याचं ज्ञान येतं. शिवाय शिक्षण हे पैशावाचून अडणारी गोष्ट न्हाय. शिकण्याची इच्छा असली की कुणीबी मदत करतया. न्हाय तर आपलं सरकार शिकण्यासाठी कर्जबी देतया. शिकशण म्हणजे, बिनतारणाचा अन् बिनभांडवलाचा धंदा झालाय. त्यातच तुझी काळजी हाय ती भयनीची. एकविसाव्या शतकात पोरीस्नी खूप मागणी हाय. तिच्या लग्नाची चिंता करू नको. कुणीबी आज शिकलेला बिनहुंड्याचं लगीन कराया तयार हुतो, पण जगण्याच्या संघर्षाची भीती बाळगून जगाच्या रणांगणावरनं संकटाना पाठ दाखवून पळणं योग्य न्हाय. रंग्याची ही नेहमीची बोलण्याची पद्धत. जसा काय शिकागोला जाऊन आल्याला विवेकानंदच समजायचा स्वत:ला. दाम्याचं मन बोळवण करून कसंबसं वळवलं.

दाम्या मनाच्या उंचीवर जाऊन पोचला. त्याला वाटू लागलं, कायबी करीन, पण साळा शिकीन. बँकेकडून कर्ज काढीन. त्यासाठनं वाटंल ती धडपड कराया मागंपुढं बघणार न्हाय. पडेल ते कष्ट करीन. रात-दिस एक करून अभ्यास करीन आणि साळा शिकन. घरच्यांचं भलं करीन. मामाला आतापुरता थोडा विरोध केला म्हणून कुठं बिघडलं? मामा काय आपल्याला जलमापतूर पुरणार हाय? काही काळ नाराज राह्यलं. पुढे गोडी येईलच की!

दाम्या घरी आला. मोठ्या आशेने आपल्या आयजवळ गेला. आपला मनसूबा सांगाया त्याला तिचाच तेवढा आधार वाटला. बापाला सांगून बाप ऐकणार नव्हता. तो ऐकण्याच्या पल्याड गेला व्हता. मामाच्या बोलण्याला तो कवाच एकरूप झाला व्हता. चुलते तर काखा वर करून कवाच मोकळे झाले व्हते. त्येनला पुतण्याच्या कल्याणापरास त्याच्या तूर्ताच्या कमाईवर डोळा व्हता. त्यांनी कधीच गणित बांधून ठेवली व्हती. कुठ तरी कामाधंद्याला लागला तर वर्षाकाठी निदान पंचवीस हजार आणील. अन् साळचा खर्च वाचल. त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे समाजाकडून पुतण्याला शिकवण्यासाठी मदत करा, अशी सुनावणी ऐकावी लागणार नाही. मोठ्या इस्वासानं तो तिच्यापाशी गेला, अन् म्हणाला,
‘आय्य, एक बोलवं वाटतया.’
‘काय रं लेकरा?’
‘समज मी जर मामासंग दुकानाला न्हाय गेलू तर काय व्हईल?
‘आरं, दा
मू आपल्याला कुणाचा आधार हाय, तुझा बाप हातानं आधू हाय, बहिणीचं लगीन करायचय अन् धाकट्याला शाळा शिकवायची हाय.’

दामू गप्प झाला. पुढं बरंच काही बोलणार व्हता, पण मनातलं इचाराचं वादळ थांबत नव्हतं. जबरदस्त इच्छाशक्ती व्हती. शिकण्याचीपण भीती अन् वडिलधार्‍यांचा आदर, समोरच्या समस्यांना कवटाळणं यामुळं इच्छा व्यक्त होत नव्हती. रंग्याच्या सल्ल्यानं अन् घरातल्यांसमोर न बोलण्याच्या भ्यानं मनाचा कोंडमारा करून घेतला व्हता. मनात विचाराचं काहूर माजलं व्हतं. एकदा का माणूस मनाची कोंडी फोडू शकला न्हाय, तर त्याला आयुष्यभर तसं करण्यासाठी झगडावं लागतं. त्यात यशस्वी होणं जरा अवघडच. मन मानायला तयार नव्हतं की आपण शाला सोडून दुकानदारी करावी. मनाचा कल सगळा शिकशनाकडंच व्हता.

आयचं बोलणं ऐकलं अन् एकवेळ विचार केला. मनात एक ठाम निर्णय झाला. सर्व इच्छाशक्तींना मनाच्या विरुद्ध बळजबरीनं मूठमाती दिली. आमच्या शब्दापुढं दाम्या विरघळला, नरमला, वरमला, हतबल झाला. शेवटी सगळ्या संघर्षाच्या विचारांना त्यानं मूठमाती दिली अन् त्यानं एक निर्णय घेतला. त्याच्या काळजात धस्स झालं. क्षणभर हृदय बंद झालं. श्वास चुकला अन् रक्तप्रवाह थांबला की काय असं त्याला वाटलं, पण निर्णय बदलला न्हाय. पायाखालची जमीन हादरल्यासारखं झालं. टकूर्‍यावरचं छत्र उडून गेल्यासारखं वाटलं. आधार तुटला पण स्व
त:च सगळ्या कुटुंबाचा आधार बनण्यासाठी आयुष्याच्या सीमारेषवर उभा राहून जिकडं प्रकाशमान जीवनाचा आशेचा किरण दिसत होता, तिकडं पाठ फिरवली अन् स्वत:ला स्वत:च्या इच्छाशक्तीला, भावनांना घेऊन, आयुष्याला घेऊन कायमस्वरूपी अंधारात व्याकूळ मनानं हतबलतेनं म्हणा की निरुपायानं स्वत:च्या सुखाचा त्याग करून इतरांच्या भल्यासाठी स्वत:च्या शरीराची ज्योत विझवून प्रदीर्घ अंधारात उडी मारली परत परतून न येण्यासाठीच.

त्यानं हातानं स्वत:ला वंचित बनवलं, मनातल्या सगळ्या इच्छा मारून टाकल्या. अंधारात धडपडला अथवा मेला तरी माघार घ्यायची न्हाय, असं ठरवून मातीमोल आयुष्याला तिलांजली देऊन बिनमनाचा, बिनभावनाचा पुतळा बनून दुकानदारीच्या धंद्याला हसतमुखानं कवटाळलं.
त्यानं तयारी सुरू केली. माणदेशी मातीतला एक पुत्र बलिदान देत होता. आत्मसमर्पण करत होता. कच्च्या सोन्यापासून पिवळंधमक बनवण्यासाठी. देशातल्या माता-भगिनींच्या अंगावर ते शोभून दिसावं म्हणून धगधगत्या आगीसमोर जाण्याचं दिव्य करण्यासाठी त्यानं गबाळं बांधलं अन् निघाला.
जाण्याआधी एक दिवस त्याच्यातला माणूस जागा होऊन माळावरच्या धोंड्याजवळ रडला. गावंदरीच्या हिरीत उड्या मारून मारून मनसोक्त आयुष्यातला शेवटचा दिवस जगला. मायभूमी माणदेशाला. माणदेशाच्या मातीला सोडून जाताना बारक्या पोरासा
रखा हमशीहमशी रडला. मनावर माणदेशातल्या दगडाला ठेऊन कायमचा चालता झाला.
पिपरीतून निघाला त्या शिकलेल्या शाळेकडे बघून हुंदका दाटून आला. सवंगड्याची आठवण झाली. रंग्याला भेटायला मन धजवत नव्हतं, पण त्याला भेटल्याशिवाय म्होरं जावावं असं वाटतही नव्हतं. शेवटी रंग्याचं त्याला येऊन भेटला व म्हणाला, ‘लाखमोलाचं आयुष्य मातीत घालवून निघालाय, पण थोडं भान ठिवून वाग. दुकानदारी कर, पण व्यसन करू नकोस. तुझ्या भावबहिणीकडं अन् आयबापाकडं मी ध्यान ठिऊन राहतो.’ रंग्यानं जे काही बोलून दाखवलं त्यामुळे दाम्याच्या मनातली शंका फिटली. तो रंग्याला तेच सांगणार होता, जे रंग्यानं आता बोलून दाखवलं. स्वत:च्या आयबापाकडं बघण्यासाठी रंग्याला विनवनार होता, पण देवळामागचं देव पावला. रंग्या स्वत:हून कबूल झाला.

गाव सोडलं तो आता नव्या विश्वात सहभागी होणार व्हता. पिपरीतनं तो आटपाडीला गेला. तिथं मामाचा हस्तक व्हुभा व्हता. तो त्याला घिऊन घरनिंकी पिपरीकडं निघाला. आतापतूर तो कित्येक वेळा घरनिंकीला गेला व्हता, पण आजचा अनुभव वेगळाच व्हता. कारण ह्याच्या अदुगर प्रत्येक जाण्याला मामाचं गाव, मळा, शेत सारं काही डोळ्यापुढं यायचं. आजोबासंग, म्हणजे बाबासंग बैलगाडीतनं शेताकडं जायचा अनुभव काही औरच असायचा. आजीच्या हातचा मायाळूपणाचा स्पर्श याची उत्सुकता अनुभवण्यासाठी मन अगदी वेडावून जायचं. मामाचं गाव कधी येतंय असं व्हायचं. प्रत्येक वेळी एस.टी.नं न्हाय तर वडापानं मामाच्या गावाकडं तो जायाचा. सोबत आय असायची.

आता तो मामाच्या मालकी
च्या गाडीवर बसून निघाला व्हता, पण त्यात अभिमानाचा लवलेशही नव्हता. आज काही वेगळंच वाटत व्हतं. जसं काही त्याला घरनिंकीची ओळखच नव्हती. पहिल्यांदा जावावं, तसा उदासपणानं निघाला व्हता. अजिबात ओढ नव्हती. आजीनं मायेचा हात फिरवलाही असता कदाचित, पण त्या स्पर्शाची उब तेवढी आपुलकीची वाटली नसती. बाबासंग शेतात जायाचं नावच नव्हतं. फक्त आपल्या शकुनीमामासारख्या मामाचा धाक असणार व्हता. पहिल्यासारखा मामा लाडानं खांद्यावर बसवून गावभर फिरवणार नव्हता. तसं मामाच्या खांद्यावर बसून फिरण्याचं वयही निघून गेलं व्हतं. आता तो सोळा वर्ष अन् सात महिन्याचा अकाली प्रौढ झाला व्हता. नेहमी कवतुक करत असलेल्या गुजरातेत स्वत: जाऊन बघणार व्हता. सवंगड्यात अभिमानानं माझं मामा गुजरातला हायतं. येताना मला हे घेऊन येणार हायतं, ते घेऊन येणार हायतं, असा बडेजाव मारायचा. त्या गुजरातची वारी आज करणार व्हता.

विचार चालू असतानाच मामाचं गाव आलं. मामा वाट बघतच दारात व्हुभा व्हता. मासा गळाला लागल्याची त्याला पूर्ण खात्री झाली व्हती म्हणून तोंडावर स्मितहास्य की काय म्हणतात, तशा छटा उमटल्या. पण ते स्मितहास्य नव्हतं. स्वत:च्या भाच्याच्या जीवनाशी केलेलं घातहास्य व्हतं. दाम्यानं मामाच्या तोंडाकडं ढुंकूनही पाहिलं नव्हतं. पण सुरतला गेल्यावर रोज त्याचीच सुरत म्हणजे थोबाड बघण्याची आपत्ती त्याच्यावर ओढवणार व्हती. आजीजवळ गेला, आजीही मनातून खिन्न व्हती. तिला पोटच्या पोरानं पोटच्या पोरीच्या संसारात मीठ कालवल्याचं स्वत:च्या डोळ्यानं बघावं लागतं व्हतं. स्वत:च्या लेकीच्या पोराला असा उपरा झाल्याला तिला पाहवत नव्हतं, पण तिचाच उपाय चालत नव्हता तर ती तरी काय करणार बिचारी? पोरच घरची मालक झाली व्हती त्यामुळे तिला आता सत्ता चालवता येत नव्हती. ए
का उपर्‍यानं दुसर्‍या उपर्‍याच्या आधाराला जावं तशी गत झाली व्हती.

मोजून दहा मिनिटं झाली असतील-नसतील एवढ्यात सदामामानं हाक मारली. ‘दाम्या उरक लवकर उशीर व्हतूया.’ दाम्या असहाय्यतेनं उठला. आजीचं डोळं पाण्यानं भरलं. बाबा कुठं तरी गेलं व्हतं त्यामुळं त्यांची गाठ पडणं महाकठीण. दाम्या उठला, आयुष्याच्या संसाराचं गठूळं पाठीवर टाकून मामासंग निघाला.
पुन्हा आटपाडीला आला. सोबत मामा व्हता. मामानं लक्झरीचं तिकीट काढून ठिवलं व्हतं. लक्झरीत बसून माणदेशाचा वारकरी गुजरातच्या वारीवर निघाला. कशी असलं तिथली भाषा? काय तिथं गेलो तर आपलं मन रमल का? आपल्याला कामातलं पटकन शिकता येईल का? असा संदिग्ध करून टाकणारा एक विचारही मनात येत नव्हता. याउलट कसली जर भाषा असली तर ती शिकायची, न्हाय जरी रमलं मन तर परत फिरायचं न्हाय. अन् मनाला इतकं कठोर बनवायचं की मन रमण्या न रमण्यापलीकडं गेलं पाहिजे. काम कितीही अवघड अन् कितीही कठोर असलं, तरी कसल्याही परिस्थितीत शिकायचं. त्याच्याबिगर गत्यंतर न्हाय. इथं जर आपटी खाल्ली तर आयुष्यात काय शिल्लक म्हणून न्हाय राहणार. भावाला शिकवून मोठं करायचं, आपलं स्वप्न भंगू द्यायचं न्हाय. आपण खचलो तर मागच्यांना धीर कुणी द्यायचा? जेमतेम सतराव्या वर्षाकडं झुकलेला जीव, तरुणाईची मौजमस्ती सोडून पोक्त प्रौढासारखा विचार करत व्हता. भावासाठी, घरासाठी, पर्यायानं समाजासाठी स्वत:च्या आचरणातून एक शिकवण समाजाला देत व्हता. स्वत: झिजून दुसर्‍याला प्रकाश देण्यासाठी झगडत राहणं कधीही चांगलं आहे. दुसर्‍याच्या चारीमुंड्या चीत करून स्वत:साठी जगण्यापेक्षा.

गाडीनं म्हसवड, फलटण ओलांडलं. माणदेशाला या वीरानं एकवेळ सलामी दिली. माणदेशाचं अस्तित्व डोळ्यात साठवत नुकत्याच मावळलेल्या दिसाच्या गोळ्यासोबत पडणार्‍या अंधाराला साक्षी ठेऊन जीवनाच्या अंधकारमय प्रदेशात प्रवेश केला.
तसं पाहिलं तर अंधारही होता अन् उज्ज्वल भवितव्यही; जे तो परीस होऊन इतरांसाठी उभारणार होता. गाडी भरधाव वेगानं पुण्याकडं निघाली होती.
उद्यापासनं तो एक गलाई बांधव होणार व्हता. माणदेशातल्या प्रत्येक दुसर्‍या घरातला एखादा तरी माणूस सोन्याचांदीचा कारागीर असतो. बारा महिनं दुष्काळ, उदास, उजाड, वैराण माळरानं, कोरड्या ठणठणीत विहिरी, दहा जणात दोन एकर जमिनीची वाटणी, दारिद्र्य, पाण्यासाठीची वणवण, शिकण्याचा वनवास, कर्जाचा बोजा या सार्‍या परिस्थितीला कंटाळलेला माणदेशी माणूस लेकरं दहा-बारा वर्षांची झाली की स्वत:च्या मायेला तोडून देशोधडीला लावतो. अन् सांगत राहतो की, ‘‘बाबा इथं मातीत मरण्याबिगर काय न्हाय. जा तकडंच कसाबी जग, मागल्याची चिंता करू नगसं अन् जमलं तर दोन रुपयाचा हातभारही लाव घरासाठी.’’ माणदेशी माती खंबीर मनाच्या, कधीही नाउमेद न होणार्‍या, धडपड्या-खटपट्या माणसाला जन्म देते. कित्येक नवरत्नांना उभं राहण्यासाठी त्याच्या पायाखालचा आधार बनते. त्याला स्वाभिमानी बनवते. अन्यायाविरुद्ध मनात चीड उत्पन्न करते अन् देशाच्या जडणघडणीत घराघरातून एक माणूस उभा करते. पण या गुणसंपन्न मातीवर निसर्गाची कृपा कधीच झाली न्हाय. तो इथं कधीच भरभरून गरजला न्हाय की बरसला न्हाय. तोही या मातीवर असा कठोर होत असावा इथल्या मातीसारखाच. इथल्या मातीसारखाच त्याचाही स्वाभिमान मग जागृत होत असावा. धनगर, शिंपी, महार, मांग, चांभार, कुणबी, रामोशी अशा अठरापगड जातीची माणसं इथं गुण्यागोविंदानं नांदतात. माणुसकीचा ओलावा रणरणत्या दुष्काळातही टिकून हाय इथं. देशाच्या कुठल्याबी भागातला माणूस कधी वाट चुकून इथं आला तर त्याला उपाशीपोटी झोपावं लागणार न्हाय. त्याची भाषा जरी कुणाला कळणारी नसली, तरी त्याच्या आत्म्याची भूक इथल्या प्रत्येक कष्टकर्‍याला कळते. मग दांडगाव्यानं अर्धीच भाकरी असली तर ती त्याला खायला लावल्याबिगर इथल्या माणसाच्या जीवाला चैन पडत न्हाय.

अशा माणदेशातला पुत्र आता सौराष्ट्रात निघाला व्हता. माणदेशी माणूस सोन्याचांदीचा कारागीर म्हणून देशाच्या प्रत्येक भागात जाऊन आलाय. उत्तर भारतातल्या पंजाब, लखनऊ, कानपूर, बिहार तर वायव्य भारतातल्या राजस्थानच्या वाळवंटात, गुजरातच्या आखाती भागात, पश्चिम बंगाल, झारखंडच्या जंगलात, कलकत्ता, हुगळी, रायपूर, भुवनेश्वर, कटकमध्ये कुणी तर कुणी आंध्र प्रदेशच्या हैदराबाद, कर्नाटकच्या बेळगाव, म्हैसूर, बंगळूर, तर तामिळनाडूच्या सेलम, चेन्नई अन् केरळच्या त्रिवेंद्रम् या प्रत्येक भागात माणदेशी माणूस सोन्याला झळाळी अन् चांदीला चकाकी देण्याचं काम करतोय त्यात नवीन असं काहीच न्हाय.

पण दाम्यानं शाळा शिकूनही त्याच धंद्यात पडण्याचा निर्णय घेतला ते जरा खटकण्यासारखंच होतं. पहाट झाली, दाम्या पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर रेल्वेत बसलेला तो सुरतमध्ये येऊन पोचला होता. एक नवी पहाट त्याच्या जीवनात आली माणदेशाबाहेरची. जिल्ह्याची सीमा ओलांडून न गेलेला दाम्या चक्क राज्याची सीमा ओलांडून गेला. सुरतमधून मामासोबत राजकोटला गेला. तिथं मामाचं सोन्या-चांदीचं दुकान होतं.
तिथं गेल्यागेल्या त्याचा भ्रमनिरास झाला. पहिला अंदाज चुकला, त्याला वाटलं तसं आटपाडीच्या पेठेतलं ज्वेलर्स नव्हतं मामाचं दुकान. ती तर सोनं अन् विशेष करून चांदी गाळायची भट्टी होती. पहिला अंदाज चुकल्यावर मग पुढचे सगळे अंदाज चुकतच गेले. तरी तो स्वत:ला सावरत होता. येईल त्या परिस्थितीला कवटाळत होता. त्याला वाटलं आपला मामा आपल्याला काम शिकवेल. भाचा हाय म्हणून विश्वासानं एखादी जबाबदारी अंगावर टाकलं. त्यातल्या त्यात कामातलं चांगल्यातलं चांगलं कसब शिकविलं. त्याचा प्रत्येक अंदाज फोल ठरत चालला व्हता. सगळं अपेक्षेपेक्षा वेगळं घडत चाललं व्हतं. सगळं काही नवीन व्हतं. अनपेक्षित होतं. पण त्याचं मन इतकं निर्ढोक बनलं व्हतं, मुर्दाड बनलं व्हतं की त्याच्या मनाला कोणतीच अनपेक्षित घडणारी गोष्ट वाटत नव्हती.

मामचं दुकान राजकोटमधील एक तेजीत चालणारं दुकान व्हतं. प्रत्येक दिवसाला शंभर-दोनशे किलो चांदी गाळून नेणारी चांगली चार-पाच गिर्‍हाईकं व्हती. पण मामाचं लक्ष धंद्यात नव्हतं की दुकानदारीत त्याला हातात येणारा पैसा स्वत:चा गुलाम बनवत चालला व्हता. मामा पैशाच्या आहारी गेला व्हता. आठवड्याला हजार रुपयाची ब्रँडेड दारू त्याला पुरत नव्हती. दुकानात काम करण्यासाठी मामाचा एक हस्तक व्हता. दुकानदारीत पैशाची चलती व्हती. शंभर किलोतली अर्धा किलो चांदी आठवड्याला मारली तर पंधरा-वीस हजाराचा धंदा होत व्हता. हस्तक पण पैसा राखून व्हता, अन् मामाचा खिसाही भरत व्हता.
आता हस्तक दाम्याला काम शिकवणार व्हता. दाम्याची अन् हस्तकाची भेट झाली. भट्टीपुढे दाम्या घामाघूम होऊन उभा व्हता. हस्तकानं मुस हातात धरायला सांगितली. दाम्यानं लटपटत्या हातानं फडक्यानं मुस धरली. भट्टीत तापवली अन् चांदीचं गाळणं काढणं चालू झालं. दाम्याच्या आयुष्यातली ती अग्निपरीक्षा व्हती. मामाचा हस्तक थोडी जरी चूक झाली तरी गजानं मारायला कमी करत नसायचा. तसा तो मुर्दाड झाला व्हता. त्याच्या मानसिक जीवनात स्थैर्य नव्हतं. सततची चिडचिड करत राहायचा. हाताखालच्या पोरांना मारायचा.

त्यानं दाम्याला बर्‍यापैकी चांगल म्हणता येईल असं काम शिकवलं. पण हातचा राखून ठेवला. तीन महिन्यात दाम्या काम शिकला. तोपर्यंत श्रावण महिना संपून गेला. रक्षाबंधन निघून गेलं. मग दाम्याला आणखी एक दिव्य करायला लागलं. मामानं दाम्याला चांदीच्या कारखान्यात कामाला लावलं. हस्तकाला दुकान चालवायला दिलं. अन् हस्तकाशी करार करून गावाला येऊन राह्यला. कारखानदारीत कामाचं टाईमटेबल फार वेगळं व्हतं. काम इरसाल व्हतं. महिना साडेपाच हजार पगार अन् त्यातून जेवणाचे एक हजार कापून साडेचार हजार रुपये असा पगार. काम सकाळी आठ ते अडीच अन् दुपारी साडेतीन वाजल्यापासून रात्री साडेअकरा वाजेपर्यंत. चौदा साडेचौदा तास भट्टीपुढं काम करून जीव अगदी पेकाळून जायचा. त्यात जेवायला रोज शिजवलेला बटाटा अन् पांढर्‍याफकट रोट्या. रोज रोज तेच खाऊन वैताग यायचा, पण काही घडत नसल्यासारखं तो तसाच जगत राहायचा. त्याला सारखी दिवास्वप्नं पडायची. माझा भाऊ शिकून मोठा अधिकारी झालाय. त्याचं सगळं श्रेय मला देतोय, चार लोकात ओरडून सांगतोय की माझ्या भावामुळं मी एवढा मोठा अधिकारी झालोय. बहिणीचा दुवा, आयबापाचे आशीर्वाद अन् त्यांचं समाधान स्वप्नात पाहून राब राब राबायचा. दिवसातनं तीन वेळा कपडी वल्लीगार व्हायची घामानं. शारीरिक वाढ खुंटली. उंची पावणेपाच फूट ती कायम तेवढीच र्‍हायली. त्याला रोजचा दिस सारखाच चालला होता. दिवाळी झाली, मकरसंक्रांत झाली, शिमगा झाला, गुढीपाढवा पण झाला मग रक्षाबंधनाच्या आधीच्या पंधरा दिवसात तो गावाकडं आला.

त्या कारखान्यात काम करणारा प्रत्येकजण अगतिक होऊन तिथं आला व्हता. कुणाच्या बापानं कर्ज काढलं व्हतं, कुणी स्वत:च कर्ज काढून बहिणीचं लग्न केलं होतं, तर कुणी स्वत:च्या बापाला मरणाच्या दाढेतून माघारी आणण्यासाठी उचललेले पैसे फेडण्याकरिता परिस्थितीपुढं हतबल होऊन तिथं आलं व्हतं. रोजगार मिळत न्हाय म्हणून त्या कारखान्यात आजवर कुणी आलं नाय. त्या कामात नरकयातना व्हत्या, दु:खाचं, कष्टाचं सारं मर्म त्यात गुंतलं व्हतं. कारखान्यात पाच महिनं कामासाठी टिकणारा ‘किंग’ म्हणून ओळखला जायचा. कारण पाच महिनं काम करणं, तर सोडाच पण पहिला पगार व्हायच्या आत सोडून जाण्याइतकं वाईट काम व्हतं. तापलेल्या भट्टीपुढं चौदा तास काम करून दोन वेळच्या जेवणाला शिजवलेला बटाटा अन् पांढर्‍याफकट रोट्या खाऊन एक दिस काढणं म्हणजे महाभयानक. पण दाम्या तिथला ‘सुपरकिंग’ झाला. त्यानं तिथं साडेअकरा महिनं काम केलं अजूनही करतच राहणार व्हता. सोळा महिनं आयबाप, बहिण-भाऊ यांचाच ईचार करता कष्ट करत राहिला. मन अजिबात खचलं नव्हतं. उलट रोज नव्या उमेदीनं काम करायचा. अन् घरातल्यांच्या सुखासाठी धडपडायचा, पण मन दमलं नसलं तरी शरीर दमाणारच. यंत्रवत काम केलं म्हणून काय झालं, कामानं ठणकणारी हाडं ठणकायची बंद होणार नव्हती.

तो आला, गावातलं सारं काही बदललं व्हतं. बापाला नोटांची हाव सुटली व्हती. भावाला शाळा शिकण्याची गोडी राहिली नव्हती. आय कष्ट करत व्हती. बहिणीनं शिकशणात बाजी मारली व्हती. तिच्या लग्नाची घाई नव्हती. वर्षभर घाम गाळून कमावलेल्या पैशातला छदामही चांगल्या कामासाठी उपयोगी येणार नव्हता. किती खंत वाटली असेल जीवाला त्याच्या?
गुजरातेतून निघताना चांगले दोन ड्रेस घेतले स्वत:साठी जेणेकरून घरच्यांना कल्पना यायची नाही आपल्या कामाची. त्यांच्या चेहर्‍यावर आनंद फुलेल. चांगली कापडं घालून खोटंनाटं भाव उत्पन्न करून घराकडं आला. पण कृत्रिमपणानं पावणेपाच फूटाची उंची कशी वाढणार? राबून राबून कृश झालेली शरीरयष्टी कशी सुधारणार? कातडं हाडाला चिकटलं व्हतं ते कसं बळकट करणार? ह्या प्रश्‍नाची उत्तरे त्याच्याकडे होती का? जरूर होती, कारण त्यानं मनात सारी आखणी करून ठेवली व्हती.

तसा प्रत्येक गलाई बांधव असंच जीणं जगतो. गावाकडं आल्यावर फक्त टापटीप अन् दुकानदारीत देह झिजवत राहतो. त्याचं दु:ख उंच इमारतीत राहणार्‍या अन् पंख्याच्या हवेखाली बसून सोन्या-चांदीचे दागिने घालणार्‍याला काय माहीत असणार? ती मंडळी फक्त चारचौघात शोभून दिसावं म्हणून चढ्या भावानं सोनं खरेदी करणार, पण सोन्याला एवढी किंमत प्राप्त करून देणार्‍याला सोन्यासारख्या जीवाची राख करण्याला कवढीमोल मोबदला मिळतो. हे झालं पडद्याआडचं सत्य. सत्य बाहेर येणार कसं? अन् सगळ्या जनतेला पडद्याआडची भूमिका कळणार कशी हे न उलगडणारं कोडं आहे.
थोरला भाऊ आल्याचं धाकट्यानं दुरूनच पाहिलं. त्याचं रूप बघून हा बावचळला. ह्यानं ईचार केला, दुकानदारीत एवढी चांगली कापडं घालायला मिळतात, गावोगाव फिरायला मिळतं, मग मास्तराचा मार खात इथं बळजबरीनं अभ्यास करत जगण्यापेक्षा चांगली कापडं घालून गावोगाव फिरत राहावं अन् दुकानदारी करावी. पण त्याला कुठं माहीत होतं की, दुकानदारी म्हणजे गोळ्या-बिस्किटाच्या, किराणा मालाच्या, आठवडी बाजाराच्या दुकानदारी इतकी सोपी नसते. गावोगाव फिरण्याऐवजी एकाच जागी डांबून घेऊन चौदा तास काम करावं लागतं. चांगल्या कपड्याच्याऐवजी फाटकी, मळकी कापडं दिवसातनं तीन वेळा भिजतात ते.

दाम्यानं वेगळ्या कारणानं खोटं रूप धारण केलं. जेणेकरून घरच्यांना चांगलं वाटावं. पण ह्याच गोष्टीचा धाकट्या भावानं किती चांगला आदर्श घेतला? धाकटा पहिल्यापासून म्हणजे दाम्या गेल्यापासून शाळंवरचं मन काढून पोरात हिंडण्यात दंग असायचा. त्याची शाळा शिकण्याची इच्छा निघून गेली व्हती. त्यानंही दाम्याकडं पाहून शाळेविषयीचा तिरस्कार जास्तच गडद केला. दाम्यानं त्याच्याकडनं किती मोठी अपेक्षा केली होती अन् समोर काय वाढून ठेवलंय याची तीळमात्र कल्पनाही दाम्याला नव्हती.
दाम्या परत आल्यापासून धाकटा एक दिवसही शाळेत गेला न्हाय. दाम्यानं त्याच्या भरपूर विणवण्या केल्या, पण तो नमला न्हाय. उलट मामाला सांगून मला दुकानदारीला न्या म्हणून हट्ट धरून बसला. त्यातच बापाला झटपट नोटा हव्या होत्या. त्यामुळे बापानं धाकट्याचंच कान भरून सोडलं व्हतं. धाकट्याच्या वृत्तीला खतपाणीच मिळालं.
एक दिशी रंग्या आला. तो कुठं तरी इंजिनिअरिंग शिकत व्हता. त्याला दाम्या आल्याचं कळलं. दाम्याच्या ओढीनं तो त्याला जाऊन भेटला. रंग्यालाही दाम्याच्या धाकट्या भावाचं कवतिक समजलं. धाकटा जेमतेम चौदा वर्षांचा व्हता. रंग्यानं अनं दाम्यानं संघनमतानं एक निर्णय घेतला. काहीही होवो आकाश-पाताळ एक झालं तरी चालेल पण मामाला, बापाला विरोध करायचा अन् धाकट्याला शाळा शिकायला लावायची.

शेवटी धाकट्याला शाळेतनं काढू नका म्हणून दाम्यानं बापाला अन् मामाला सांगितलं.
‘‘माझ्या जीवनाशी जो भयानक खेळ खेळला गेलाय तो निदान माझ्या भावाच्या वाट्याला तरी येऊ देऊ नका. मी जरूर ‘सुपरकिंग’ असलो तरी, मला माझ्या या धंद्यात इतर कुणालाही पडू द्यायचं न्हाय. मग हा माझा स्वार्थ म्हणा किंवा काही म्हणा. मी तुमच्या म्हणण्याला भीक घालणार न्हाय.’’ दाम्यानं सगळं एका दमात सांगितलं अन् कोणत्याही निर्णयाची वाट न पाहता तडक उठला अन् धाकट्याला घेऊन शाळेकडे चालू लागला.

धाकटाही मारून मुसलमान होणारा नव्हता, कारण तोही या माणमातीतला स्वाभिमानी मराठा व्हता. तेवढ्यापुरता साळंत गेला. अन् दाम्या पुन्हा गुजरातला गेल्यानंतर त्याचे पहिले पाढे पंचावन्न सुरू झाले. शाळा शिकण्यासाठी धडपड करणारा दाम्या कुठे? रंग्या कुठे? अन् शाळा सोडण्यासाठी जीवाचं रान करणारा दाम्याचा धाकटा भाऊ कुठे?
आजपर्यंत विरघळून जाणारा दाम्या एवढा कसा धडाधडा बोलला? बापाशी अन् मामाशी स्वत:च्या वेळी गपगुमान गल्लीतल्या कुत्र्यापरमाण निघून गेला. पण त्याची पुनरावृत्ती त्याला पुन्हा घडू द्यायची नव्हती. आपल्या भावासाठी म्हणून नोटांसाठी चटावलेल्या आपल्या बापापुढे अन् मामापुढे तोंड उघडून घडाघडा बोलला. ही एक क्रांती व्हती. चळवळ व्हती. परिवर्तन घडवण्यासाठी केलेली. एक घर जोडताना दाम्याला स्वत:च्या जीवाचं दाम मोजावं लागलं.

माणदेशी दाम्याचं बलिदान व्यर्थ गेलं व्हतं. स्वत:च्या भावाला शिकवण्यासाठी गाळलेला घाम मोती होण्याऐवजी दगड झाला व्हता. स्वत:च शिक्षण अर्धवट सोडून भावासाठी परमुलखात जाऊन झगडला व्हता, झगडत व्हता आणि पुढे झगडत राहण्यावाचून पर्याय नव्हता. भाऊ शिकणार न्हाय, मोठा अधिकारी होणार न्हाय. दुष्काळानं, नापीक जमिनींमुळं, राजकारण्यांच्या नापाक इराद्यांमुळं जी माणदेशी माणसाची भावना झालीय ती चुकीची न्हाय. पण रोजच्या अनुभवानं तयार झालेली दाम्याची भावनाही कमी महत्त्वाची न्हाय. तो म्हणतो, ‘‘दुकानदारीत कसाबी जगण्यापेक्षा स्वर्गापेक्षा चांगल्या माणदेशी मातीत मरणं चांगलं.’’
स्वत:च्या सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर झालेला दाम्या, धाकट्या भावाविषयी पाहिलेल्या स्वप्नांचेही भग्नावशेष पाहत होता. तो त्या अंधार कोठडीत गेला तो दुसर्‍याच्या जीवनात उजेड यावा म्हणून, पण तेही जमलं नाय. आता तो केवळ एकाच आशेवर जगतोय. फक्त एकाच आशेवर... पिवळ्या धमक सोन्यानं सुखावलेली माणदेशी नारी, माता, भगिनी पाहून... त्यांच्या आशीर्वादाच्या जीवावर... त्यांच्याच दुव्यावर... अन् त्यांच्या चेहर्‍यावरच्या समाधानावर... जीव गहाण टाकून काम करतोय... फक्त समाधानासाठी... फक्त आणि फक्त समाधानासाठी... एक बलिदान... जित्यापणीच... स्वत:ची अंत्ययात्रा अनुभवतोय... केवळ असहायतेनं...!

- अमोल कदम
ए.सी. पाटील कॉलेज ऑफ इंजिनियरींग,
(प्रथम वर्ष, बी.ई)
खारघर, नवी मुंबई.
निवास : 13/220, तेजस नगर,
रेनॉल्डस् रोड, वडाळा (पूर्व) मुंबई - 400 037.
मो. : 9767002958 / 9503806980

No comments:

Post a Comment