24 November 2010

महात्मा फुले!


महात्मा फुले!
शेणा दगडात
फुले तुझा मळा
लावुनिया लळा
दलितांना ॥
तुझ्या दारी फुले
माणसाचे झाड
मुक्ता केला आड
तृषार्तांना ॥
दीन-दुबळ्यांचा
तुला कळवळा
समतेचा मळा
लावियेला ॥
सत्याचा शोधक
दलितांचा वाली
परि तुझ्या भाळी
छळ आला ॥
फुलविले आधी
सावित्रीचे रोप
झाले आदि रूप
स्त्री मुक्तिचे ॥
केला मुळारंभ
मुळाक्षरे मूळ
वाढवले बळ
स्त्री-शक्तीचे ॥
पांढर्‍या कपाळा
दिलास तू हात
झाला धर्मत्यात
अनाथांचा ॥
दुर्बलाला बळ
नादारा आधार
घेतलास भार
गरिबांचा ॥
नांगरून माती
कोळपले तन
कर्मठांचे तण
काढलेस ॥
कांदा मुळा भाजी
विचारांची ताजी
क्रांतीला साजी
लाविलीस ॥
कर्मकांडाचे
फोडुनिया भांडे
दंभिकाचे तांडे
रोखलेस ॥
पेटवून चूड
ओढले आसूड
परि नाही सूड
घेतलेस ॥
शोधताना सत्य
पाळलेस पथ्य
नाही कधी व्रात्य
वदलास ॥
तूच बळीराजा
काम करी प्रजा
दलितांच्या काजा
श्रमलास ॥
ठेवून पाऊल
धर्मांधाच्या माथी
चारलीस माती
कर्मठांना ॥
समतेची ज्योत
धरूनिया हाती
नाव तुझे जोति
सार्थ झाले ॥
फिटता फिटेना
तुझे मोठे ऋण
हीच आहे खूण
महात्म्याची ॥
अंधाराचे आळे
विचारांचे खत
लाविलेस झाड
प्रकाशाचे ॥
पेटवली ज्योत
विझू विझू पाहे
वादळही आहे
सनातन ॥
धर्मांधाचे वारे
आले घोंघावत
जपायाला ज्योत
नाही कोण! ॥
- ह.शि. खरात
भ्र. 27627 67372

काव्यशलाका - रिमझिमल्या सरीवर सरी


रिमझिमल्या सरीवर सरी
रिमझिमल्या सरीवर सरी
वाहू लागल्या मनाच्या घागरी
अडवू किती सांगा तरी
रिमझिमल्या सरीवर सरी

भिजू लागली तंग चोळी
शरमेने मी झाले बावरी
लपवू कशी लाज सारी
रिमझिमल्या सरीवर सरी

पैंजण माझे तालवर वाजती
कोसळल्या सरींसवे किणकिण करती
थांबवू कशी किलकिल पैंजणी
रिमझिमल्या सरीवर सरी

ओघळू लागले थेंब देहावरूनी
अंग अंग माझे आतून शहारती
झाकू कशी थरथर ओली
रिमझिमल्या सरीवर सरी

गेल्या कशा बरसून सरी
देऊन सख्याची याद जहरी
लपवू किती सांगा तरी
रिमझिमल्या सरीवर सरी



- कु. ऋतुजा पाटील, एस.वाय.बी.ए.
रामनारायण रुईया कॉलेज, मुंबई.

असे होते बाणेदार रामशास्त्री प्रभुणे!


नि:स्वार्थीपणा, निर्भीडपणा, न्याय निष्ठुर व नि:पक्षपातपणा या गुणांचा समुच्चय ज्या एका अधिकारी व्यक्तीमध्ये एकवटला होता, अशी एक व्यक्ती पेशवाईत होऊन गेली. या व्यक्तीने आपल्या कर्तव्यात मोठा आणि लहान आपला व परका असा आपपर भाव कधीच केला नाही. त्यामुळेच आज इतकी वर्षे झाली तरी त्या व्यक्तीचे नाव उच्चारल्या बरोबर मन एकदम भारावून जाते व माणूस नतमस्तक होतो. ती व्यक्ती म्हणजे पेशव्यांचे मुख्य न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे!

रामशास्त्री यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथभट व आईचे नाव पार्वतीबाई. त्यांचा जन्म 1720 मध्ये झाला. वयाच्या वीस वर्षापर्यंत त्यांना विद्येचा गंध नव्हता. ते प्रथम समोरच्या अनगळ सावकाराकडे शागीर्द होते. एकदा या सावकराकडे एका जवाहिर्‍याने दागदागिने तपासणीसाठी आणले होते. त्याच वेळी लहानग्या रामाचे लक्ष दागिन्यांच्या तेजामुळे आकृष्ट झाले व त्याच्या हातून सावकाराच्या पायावर पाणी नीट न पडता ते बाजूला पडू लागले, म्हणून सावकाराने त्याला विचारले, ‘‘तुझे कामात लक्ष का नाही?’’ तेव्हा रामाने उत्तर दिले की, ‘‘या जवाहिरांनी माझे लक्ष विचलित केले आहे.’’ अर्थात् त्याचे हे सरळ उत्तर सावकाराला पसंत न पडून तो रागाने त्यांना म्हणाला, ‘‘असल्या गोष्टी फक्त रणगाजी व विद्वान लोकांसाठीच असतात. या तुझ्यासारख्या भिकारड्या मुलाला कशा मिळतील?’’

सावकाराच्या या उद्गारानंतर रामाने आपल्या आयुष्यातील पहिली बाणेदार वाणी उच्चारली. तो म्हणाला, ‘‘तुम्ही आपल्या खोचक व बोचक शब्दांनी मला मार्ग दाखविला व त्यामुळे तुम्ही माझे गुरू झाला आहात. हाती तलवार धरणे हा काही माझा धर्म नाही. माझा धर्म म्हणजे वेदविद्या व शास्त्रे यांच्या अभ्यास. या विषयात नावलौकिक व मानमरातब मिळवीन तेव्हाच राहीन.’’ याप्रमाणे लहान वयातच रामशास्त्र्यांनी आपल्या बाणेदारपणाची चुणूक सर्वांना दाखवून दिली.

वरील प्रसंगानंतर रामशास्त्र्यांनी मार्ग धरला तो म्हणजे वेदविद्येचे माहेरघर असलेल्या काशी नगरीचा. या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी बाळभट पायगुडे यांच्या पाठशाळेत विद्याभ्यास करण्यास प्रारंभ करून व अत्यंत श्रम घेऊन विद्या मिळविली आणि थोड्याच दिवसात त्यांची धर्मशास्त्री म्हणून ख्याती झाली. महाराष्ट्रात ते परत आले ते महान शास्त्री म्हणूनच. 1751 मध्ये त्यांनी नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत धर्मखात्यात नोकरी धरली व नंतर 1759 मध्ये ते मुख्य न्यायाधीश झाले. त्यांना प्रथम रोजमुरा दीडमाही 40 रुपये मिळकत असे व श्रावण मासाची दक्षिणा 500 व कापड 551 रुपये इतके मिळत असे. पुढे त्यांना पेशव्यांनी घोडा बक्षीस दिला आणि त्याबद्दल 15 रुपये दरमहा जास्त वाढविला.

रामशास्त्र्यांची प्रतिष्ठा थोरले माधवराव पेशवे यांच्या कारकिर्दीत वाढली. माधवरावांनी त्यांना न्यायाधीशांचे काम सांगितले व पालखी दिली. पालखीच्या नेमणूकीबद्दल त्यांना 1 हजार रुपये अधिक मिळू लागले. माधवराव स्वत: कडक वृत्तीचे होते. तरीसुद्धा ते शास्त्रीबुवांना वचकून असत व त्यांच्याच तंत्राने वागत असत. एके दिवशी शास्त्रीबुवा माधवरावांना भेटावयास सकाळी गेले होते. त्यावेळी शिपायाने सांगितले की, श्रीमंत मौन धरून जप करीत आहेत. असा प्रकार एक दोन वेळा झाला. तेव्हा आपले सर्व सामान घेऊन ते श्रीमंताकडे आले व निरोप मागू लागले की, ‘‘काशीस जाण्यास रजा द्यावी’’, तेव्हा पेशव्यांनी विचारले, ‘‘असे विचारण्याचे कारण काय?’’ त्यावर शास्त्रीबुवा उत्तरले, ‘‘प्रभू जपास लागले तर प्रजेची व्यवस्था बिघडेल. याकरिता येथे ठीक नाही आणि जाते समयी आपणास इतकेच सांगणे आहे की, आपण ब्राह्मण असून क्षत्रिय धर्म अंगिकारला आहे. तरी तो सोडून देऊन ब्राह्मणाचा धर्म घ्यावयाचा असेल तर माझेबरोबर चलावे. आपण उभयंता गंगेचे काठी बसून स्नानसंध्या करू, परंतु क्षत्रियाचा व ब्राह्मणाचा हे दोन वर्णधर्म करू म्हणाल, तर दोन्ही बिघडतील. जशी मर्जी असेल तसे करावे.’’ यावर श्रीमंतांनी सांगितले की, ‘‘आपण जाण्याचे कारण नाही, आम्ही आपली स्नानसंध्या आजपासून सोडली.’’ तेव्हा शास्त्रीबुवा म्हणाले, ‘‘आपली स्नानसंध्या हीच की हजारो प्रजेस दाद द्यावी. त्याचे गार्‍हाणे ऐकावे हाच आपला धर्म आहे.’’
1772 मध्ये थोरले माधवराव मृत्यू पावले व त्यांच्यानंतर नारायणराव हा गादीवर आला. परंतु चुलत्याच्या म्हणजे राघोबादादांच्या कारस्थानामुळे त्याचा 1773 मध्ये खून झाला व महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. या प्रकरणात मुख्य आरोपी होता राघोबादादा. खून करणारी व्यक्ती एवढी मोठी होती, तरी रामशास्त्री यांनी आपल्या न्यायाच्या कामात मुळीच कसूर केली नाही. त्यांनी रोघाबास स्पष्ट बजावले की, ‘‘नारायणरावांच्या खुनाबद्दल तुम्हांस देहांत प्रायश्चित्त घेतले पाहिजे.’’ याप्रमाणे रोकडा जबाब देऊन व इतपर पुण्यात राहावयाचे नाही, असे ठरवून त्यांनी पुणे सोडले व वाईजवळ पांडववाडी म्हणून गाव आहे तेथे वास केला.

नारायणरावांच्या हत्येनंतर पुण्यात बारभाईचे राजकारण सुरू झाले. अशा वेळी रामशास्त्री यांच्यासारख्या न्यायनिपुण व्यक्तीची पुण्यात अत्यंत जरूरी होती. म्हणून नाना फडणवीसांनी त्यांना पुन्हा पुण्यात आणले व त्यांची पूर्वीची मुख्य न्यायाधीशांची जागा त्यांना दिली. या नेमणुकीबद्दल ऐतिहासिक पुरावा उपलब्ध असून ते साल 1774 होते. हा पुरावा म्हणजे नाना फडणवीस, सखारामबापू व मोरोबादादा यांनी 4 जुलै 1774 या रोजी लिहिलेले पत्र. ते याप्रमाणे आहे :
‘‘जा बल सु॥ खमस सब्वैन’’
॥ श्री ॥
राजश्री नारी अप्पाजी स्वामी गोसावी यास विनंती उपरी. वेदशास्त्रसंपन्न राजश्री रामशास्त्री पुण्यात आले आहेत. त्याजकडे न्यायाधीशाचा अधिकार पहिल्यापासून चालत होता. त्याप्रमाणे चालता करून व्याजकडे माणसे वगैरे पूर्ववतप्रमाणे नेमून देऊन तुम्हांपासी मनसुबीचे कामकाज पडेल ते दरोबस्त यांचे हाते घेत जाणे, पहिल्याप्रमाणे घेणे जाणिजे. छ. 24 सु॥ सन खमस सबैन मया व उलफ बहुत काय लिहिणे, हे विनंती.’’

या नेमणुकीनंतर 1780 मध्ये त्यांच्या पगारात व मानमरातबातपण पुष्कळच वाढ झालेली आढळते. कारण त्यांना रुपये 2 हजार जातीस तनखा, रुपये 1 हजार पालखी खर्च, शिवाय 1 हजार रुपये श्रावण मासाची दक्षिणा व दसर्‍याचा पोशाख इतके मिळत असे.
न्यायदानाच्या कामात रामशास्त्री अत्यंत कर्तव्यदक्ष होते. त्यामुळे त्यांच्या कामात कोणीही ढवळाढवळ केलेली त्यांना पसंत पडत नसे. नाना फडणवीस व सखारामबापू हे दोघेही उत्तर पेशवाईत सर्वाधिकारी होते, तरी त्यांनी न्यायाच्या कामात कधीच हस्तक्षेप केला नाही. त्याचप्रमाणे त्यांनी शास्त्रीबुवांना लेखी पत्राद्वारे कळविले होते. 26 सप्टेंबर 1774 चे ते पत्र येणेप्रमाणे आहे -
‘‘वेदशास्त्रसंपन्न राजश्री शास्त्रीबुवा स्वामीचे सेवेसी -
विनंती उपरी. सांप्रत मनसुब्या होतात, यात आपणास चौघांचा उपरोध होतो. याजमुळे शेवटास जात नाही. ऐशास आम्ही आपलेतर्फेने शपथपूर्वक हे पत्र आपणास लिहिले आहे. येविसी संशय न धरिता आपणही शपथपूर्वक ईश्वर स्मरोन आमची अगर दरबारात च्यार मातबर आहेत त्यांची भीड न धरिता न्याय करून विल्हेस लावीत जावे. या उपर आलस करू नये. सा.छ. 19 रजब लोभ असो दिजे, हे विनंती.’’

न्यायात काटेकोरपणा असूनसुद्धा काही वेळेला शास्त्रीबुवांबद्दल थेट पेशव्यांच्या कानापर्यंत गवगवा झालेला आढळतो. अशा प्रसंगी दरबारातील मुत्सुद्यांना शास्त्रीबुवांवर पक्षपाताचा निष्कारण आरोप येऊ नये म्हणून मध्यस्थी करणे भाग पडले. या विषयी पुरावा 2 ऑगस्ट 1764 च्या एका पत्रात सापडतो तो असा -
‘‘पैत्रग्ती छ 3 सफर
सु॥ स्वमस सितैन
सेवेसी विज्ञापना. मोरो अनंत व चिमणाजी बलाल खोत मौजे वाटदतर्फे सेतवड सुभा राजापूर याचा व कवठेकर याचा खोतीचा कजिया आहे. त्यासी शास्त्री पक्ष धरून मनसुफी करितात. त्यास दुसर्‍याकडे सांगावी म्हणोन. मोरो अनंत व चिमणाजी बल्लाळ यांना विनंती केली... शास्त्रीबाबा पक्ष धरून मनसबी करणार नाहीत. यास्तव त्याचकडेच करावयाची आज्ञा करावी हे विज्ञापना.’’

शास्त्रीबुवा पक्षपातीपणा करीत नसत, याबद्दल आणखी एक मनोरंजक गोष्ट उपलब्ध आहे. सवाई माधवरावांच्या कारकिर्दीत रामशास्त्री यांच्याकडे रमण्यात दक्षिणा वाटण्याचा अधिकार होता. एकदा त्यांचा सख्खा वडीलभाऊ दक्षिणा घेण्यास आला. तेव्हा जवळ बसलेल्या नानांनी सांगितले की, ‘‘वीस रुपये द्यावे.’’ यावर रामशास्त्री म्हणाले, ‘‘यास विद्या नाही, तेव्हा सर्वांप्रमाणेच दोन रुपये द्यावे, कारण मला पक्षपात केल्याचा दोष लागेल. याकरिता जास्ती देणे शिरस्त्यांबाहेर आहे. माझे भाऊ आहेत तर मीच काय ते देईन, पण दक्षिणेच्या अधिकारात पक्षपात नसावा.’’ या दक्षिणावाटपात ते इतके कडक व काटेकोर होते, की त्याबद्दल संस्कृतमध्ये एक श्‍लोक रचण्यात आला.
वृषिविना पंचकहो विचित्रं,
स्थलद्वषे तिष्टतिते सर्व कालं।
दानांबमिर्माधवताय मंदिरे,
विप्रस्यबाष्पै: खलु रामशास्त्रीणाम्‌॥
याचा अर्थ, ‘पावसाशिवाय चिखल तयार होतो, किती विस्मयकारक घटना आहे ही. हा चिखल बाराही महिने दोन ठिकाणी आढळतो. एक म्हणजे श्रीमंतांच्या वाड्यात दक्षिणेवर सोडलेल्या पाण्यामुळे व दुसरे म्हणजे रामशास्त्र्यांच्या वाड्यात ब्राह्मणांच्या डोळ्यातून वाहणार्‍या अश्रुंमुळे.’ शास्त्रीबुवा दक्षिणा घ्यावयास येणार्‍या प्रत्येक ब्राह्मणाची अगदी कसून परीक्षा घेत.

रामशास्त्री यांची राहणी अत्यंत साधी होती. त्यांची पत्नी काशीबाई यासुद्धा त्याचप्रमाणे वागत असत. डामडौलाचा शास्त्रीबुवांना तिटकारा होता. एकदा पेशव्यांच्या घरी हळदीकुंकू समारंभ होता. त्यावेळी काशीबाई तिथे गेल्या होत्या, पण त्यंाच्या अंगावर दागदागिने काहीच नव्हते. म्हणून समारंभ झाल्यावर पेशव्यांच्या पत्नीने दागिन्यांनी मढवून व पालखीत बसवून त्यांची घरी बोलवण केली. घराच्या दरवाज्यात त्या शिरणार इतक्यात रामशास्त्री यांनी त्यांना विचारले, ‘‘बाई आपणास कोण पाहिजे? आपण घर चुकला नाहीत ना? हे घर तर रामशास्त्र्यांचे आहे.’’ काशीबाई अत्यंत ओशाळल्या आणि त्यांनी शास्त्रीबुवांचे पाय धरले.

वेदशास्त्र पारंगत असूनसुद्धा रामशास्त्री हे पुरोगामी विचारांचे होते. परशुरामभाऊ पटवर्धन यांच्या कन्येच्या पूनर्विवाहास त्यांनी मान्यता दिली होती. जेव्हा तिचा पती निर्वतला तेव्हा ती आठ वर्षांची मुलगी होती व ‘हे अर्भक बाल आहे. हिला दुसरा नवरा करून द्यावा असे आम्हास वाटते’, असा निर्णय त्यांनी दिला त्याचप्रमाणे ‘पूनर्विवाहाच्या बाबतीत पुरुषांनी तयार केलेले नियम स्त्रियांचे सुख-दु:खाचा विचार न करता केलेले असल्यामुळे पूर्वीच्या व चालू नियमांत विसंगती आढळते’’, असा स्पष्ट अभिप्राय त्यांनी दुसर्‍या एका प्रकरणात दिलेला आढळतो.

न्यायदानाचे आपले काम चोखपणे, निर्भीडपणे, नि:स्वार्थीपणे व नि:पक्षपातीपणे बजावत न्यायदेवतेचा हा निस्सिम भक्त 21 ऑक्टोबर 1786 रोजी मृत्यू पावला. या श्रेष्ठ न्यायधीशाबद्दल पाश्चिमात्त्य इतिहासकार ग्रँड डक म्हणतो, ‘‘न्यायााधीशांची जागा विभुषित करणारा पहिला गृहस्थ म्हणजे रामशास्त्री. यांची नेमणूक पहिल्या माधवरावांच्या काळात झाली. या बाणेदार न्यायाधीशाचे चारित्र्य फारच उच्च कोटीचे होते. माधवरावांच्या पश्चातसुद्धा न्यायाचे काम याने अतिशय अब्रुदारपणे व मानाने केले. म्हणूनच त्याची आठवण अत्यंत पूज्य मानली आहे. नाना फडणवीसाने ज्या काही चांगल्या गोष्टी केल्या त्या सर्वांचा उगम रामशास्त्र्यांच्या प्रभावात आणि आदरात आहे. लाचलुचपतीने पोखरलेल्या सरकारात अशी व्यक्ती असणे हे त्या व्यक्तीस भूषणावह आहे. म्हणूनच अशी एखादी व्यक्ती दुसर्‍या बाजीरावाच्या काळात असती, तर तिने त्याचे व दरबाराचे नैतिक अध:पतन निश्चित थांबवले असते, असे वाटल्याशिवाय राहत नाही.’’

- प्रसाद धामणकर
धामणकर निवास, रामवाडी, पेण, जि.
रायगड, पिन. 402 107

बेडेकरी प्रवास - प्रवचनकार ते उद्योजक

‘उद्योगाचे घरी रिद्धिसिद्धी पाणी भरी’, ही म्हण सर्वश्रुत आहे. माणसाने उद्योग केला, व्यवसाय केला की समृद्धीही पाठोपाठ येते, असा अर्थ या म्हणीतून ध्वनीत होतो. उद्योग आणि समृद्धी यांचा संबंध ‘उद्योगिनं पुरुषसिंहम् उपैति लक्ष्मी:’ या सुभाषितातही अधोरेखित करण्यात आला आहे. काही उद्योग-व्यवसाय हे पिढीजात चालत आलेले आहेत. पुढील पिढ्यांना आपल्या कर्तृत्वाने त्यात भर घालण्याचे काम करावे लागते.

यंदा व्यवसायाची शताब्दी साजरी करणार्‍या सुप्रसिद्ध ‘बेडेकर मसाल्यां’चे उत्पादन करणार्‍या उद्योगसमूहाच्या पूर्वसुरींना मात्र धंद्यासाठी आवश्यक असलेली कोणतीच पार्श्वभूमी नव्हती. सुमारे सात-आठ पिढ्यांपूर्वी कोकणातील राजापूर तालुक्यातील गोवळी गावी बेडेकर घराणे उत्तम प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध होते. एक प्रकारे त्या घराण्यात भाक्तिमार्गाच्या निवृत्तीपर विचारांचे महत्त्व होते. परंतु इच्छा असली की प्रगतीच्या नवनवीन वाटा सापडतात.
सागरी मार्गाने भाताच्या-तांदुळाचा व्यापार सुरू करण्याची कल्पना सूचली व ती वसंतराव बेडेकरांच्या खापरपणजोबांनी अमलात आणली. कीर्तनकार बेडेकर उद्योजक झाले. पुढे मुंबईत मसाले तयार करून विकण्याचा व्यवसाय वासुदेव बेडेकरांनी सन 1910 पासून सुरू केला. ‘व्ही.पी. बेडेकर ऍण्ड सन्स’ या कंपनीचा पूर्वेतिहास होतकरू उद्योजकांसाठी स्फूर्तिदायक आहे, प्रेरणादायी आहे. कारण उद्योग सुरू केल्यावर अनेक तरुण उद्योजकांना गरुडभरारी घ्यावीशी वाटते, परंतु त्यासाठी पंखात पुरेसे बळ निर्माण करण्यात ते काही वेळा कमी पडतात.

या कंपनीच्या इतिहासावरून आपल्याला एक लक्षात येते की, प्रगतीसाठी उद्योगाचे स्वरूप महत्त्वाचे नसते, तर उद्योग लहान असला तरी त्यातून स्वप्रयत्नाने, कल्पकतेने मोठी झेप घेता येते, आंतरराष्ट्रीय बाजारपेठही काबीज करता येते; अर्थात त्यासाठी टीकाकारांकडे दुर्लक्ष करून आपल्या उद्योगावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे असते. हा अनुभव अण्णासाहेब बेडेकरांना आरंभीच्या काळात आला. मसाला कुटणे, लोणची घालणे हा काय धंदा आहे, अशी अनेकांनी हेटाळणी केली होती, परंतु त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले व आपल्या उद्योगाकडे लक्ष केंद्रीत केले. आज या उद्योगाचा विस्तार पाहिल्यावर, तसेच याच क्षेत्रात नव्याने सुरू झालेल्या मसाला उद्योगांचे यश पाहिल्यावर आपल्या धंद्यातील बेडेकरांचा विश्वास किती सार्थ होता, हे लक्षात येते.

व्यवसाय लहान म्हटला, तरी विशेष: लोणची, मसाले, किराणा माल अशा वस्तूंच्या व्यवसायात काही वेळा ग्राहकांची उधारी ठेवावी लागते, नंतर ती वसूल करण्यासाठी मुद्दाम प्रयत्न करावे लागतात ही एक कसोटीच असते. अण्णासाहेब बेडेकरांनी धाडसाने उधारी बंद करून वसुलीचा त्रास नाहीसा केला.
बेडेकरांनी पहिल्यापासून मालाच्या दर्जाला महत्त्व दिले. मसाले, पापड, लोणची विकायला सुरुवात केल्यावर इतर किराणा वस्तूही चोख व साफ करून विकल्यामुळे खप वाढला. नफ्याचे प्रमाणही वाढले. बाजारातून मालही रोखीने आणल्यामुळे विश्वासार्हता वाढली. एखाद्या पदार्थाच्या निर्यातीसाठी कठोर नियम पाळावे लागतात. सर्व कसोट्यांना उतरल्यावरच निर्यात करता येते. हे सर्व नियम या कंपनीने डोळ्यात तेल घालून पाळले, त्यामुळे माल सदोष आहे म्हणून परदेशातून परत येण्याची, पर्यायाने आंतरराष्ट्रीय बाजारपेठ गमावण्याची नामुष्की या कंपनीवर कधी आली नाही. आज अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा या आरोग्यविषयक दक्ष असणार्‍या चोखंदळ देशांतही बेडेकरांची उत्पादने गुणवत्तेच्या कसोटीवर उतरल्यामुळे लोकप्रिय आहेत. भारत सरकार दरवर्षी भारतातील निरनिराळ्या शहरांत अखिल भारतीय फलोत्पादन प्रदर्शन आयोजित करीत असते. बेडेकरांच्या लोणच्यांनी दिल्ली, इंदूर, मुंबई, कोलकाता व इतर प्रदर्शनातून 1959 सालापासून पहिल्या व दुसर्‍या क्रमांकाने गौरवण्यात येत आहे.

सामाजिक भान महत्त्वाचे

केवळ पैसा मिळवण्यासाठी व्यवसाय करणे, हे बेडेकरांचे कधीच ध्येय नव्हते. तर समाजाचे ऋण फेडण्यासाठी सामाजिक उपक्रम राबवणे, शिक्षण संस्थांना मदत करणे, ते आपलं कर्तव्य समजतात. गिरगावात आपल्या स्वत:च्या वास्तुत अलीकडेच सुरू केलेल्या ‘व्यासपीठ’द्वारे ते दरमहा दोन कार्यक्रम आयोजित करतात. तसेच वर्षातून एकदा ‘मार्गशीर्ष महोत्सव’ हा एक आठवड्याचा सांस्कृतिक कार्यक्रमही ते आयोजित करतात. प्रा. राम शेवाळकर, वा.ना. उत्पात, किशोरजी व्यास यासारख्या अनेक विद्वानांची व्याख्याने यात झाली आहेत. या सर्वात महत्त्वाचे म्हणजे बेडेकरांनी ग्राहकांचा विश्वास मिळवला. हे ऋण कधीच विसरू शकत नाही, असे वसंतराव बेडेकर म्हणतात.
- प्रतिनिधी

23 November 2010

अरे खोप्यामंदी खोपा...


श्रावणसरींनी आज सकाळपासूनच बरसणे सुरू केले होते. ही घटना आहे 1993 सालच्या सप्टेंबर महिन्यातील. ‘श्रावणात घन निळा बरसला, रिमझिम रेशीम धारा’, असे ते त्याचे बरसणे नव्हते. ‘बरखा रानी जरा जमके बरसो, मेरा साजन जा न पाये इस तरहा बरसो’, असे हे कोसळणे होते. आकाशात काळ्या मेघांचे पुंजके, कासेमध्ये दूध जमा व्हावे तसे साकळत होते. पान्हा दाटलेल्या सहस्रावधी स्तनाग्रातून दुग्धधारा फुटाव्या तशा श्रावणधारा धरतीवर बरसत होत्या. मनातील श्रावणगाणी अलगद ओठावर येऊन पुन्हा पुन्हा मनातच गायली जात होती. बैठकीच्या छपरीत बसून मी जलधारांच्या कथ्थक नृत्याचा, दृतलयीतील तराना अनुभवत होतो. विविध पानांवर टपटपणारे पावसाचे टपोर थेंब तबल्यासारखी साथ संगत करीत होते, थडथडणार्‍या वीजेच्या टिपर्‍याचा ढगांच्या नगार्‍यावर आदळून होणारा घनगंभीर निनाद सारा आसमंत आणि धरतीला हादरवून टाकत होता. मंत्रमुग्ध होवून सारे डोळ्यात नि कानात साठवत होतो.

गाडेगाव येथील आमचा वाडा शेताला लागूनच आहे. वाड्याला लागूनच आमचा खाजगी रस्ता आहे. रस्त्याच्या पलीकडे 25-30 माणसे बसू शकेल अशी बैठकीची खोली आहे. बैठकीत दोन गाद्या खाली टाकल्या. त्यावर तकीये आणि लोड ठेवलेले. गाद्या समोर मोठी सतरंजी अंथरलेली. बैठकीच्या समोर कौलारू छप्पर असलेल्या, पण दोन बाजूंनी भिंती नसलेल्या भागाला आम्ही छपरी म्हणतो. तिचे तोंड शेताकडे आहे. छपरीमध्ये भिंतीला लागून मोठा आणि जड तीन फूट उंचाचा तक्तपोस, त्यावर गादी आणि तकीये, त्याच्यासमोर एक लाकडी बेंच. तक्तपोसाच्या डाव्या बाजूला जनावरांचा गोठा. त्याच्या पाठीमागे गायवाडा आहे. छपरीच्या समोर मोठं अंगण. अंगणाच्या एका टोकाला मोठी विहीर. विहिरीला लागूनच पाणी साठवण्याकरिता असलेले 15 फूट लांब, 10 फूट रूंद आणि 5 फूट उंच असे सिमेंटचे टाके. पूर्वी पिठाच्या गिरणीकरिता व विहिरीतून पाणी काढण्याकरिता जे डिझेल इंजिन होते त्याला थंड करण्याकरिता या टाक्यातील पाणी इंजिनमधून फिरवल्या जात होते. सध्या हे निरुपयोगी होते. अंगणाच्या सभोवताली, सावरी, नीलगिरी, रामफळ, सिताफळ, कडुनिंब, डाळिंब, पेरूची झाडे लावलेली. पुढे दहा एकराचे शेत. घराच्या छपरीतूनच सारे शेत दृष्टीपथात येते. शेतात या वर्षी संकरीत ज्वारी आणि ईरवा म्हणून बाजरी पेरली होती. कणसे निसवून दाणे भरायला सुरुवात झाली होती. आजच्या पावसाने वातावरण धुसर झाले होते. खुर्चीवर बसल्या अवस्थेत कंटाळून डोळे जड झाले होते.

इतक्यात तो पक्षी शेताच्या आणि अंगणाच्या सीमेवर असलेल्या डाळिंबाच्या झाडाच्या फांदीवर येऊन बसला. मी एकदम सजग झालो. पाण्याने तो नखशिखांत भिजला होता. काही क्षणातच तेथून तो उडाला आणि छपरीजवळ 20 फूटांवर असलेल्या नीलगिरीच्या झाडाच्या खालच्या डहाळीवर येवून बसला. माझ्यापासून जवळच असल्याने त्याचे समग्र निरीक्षण करणे शक्य होते. तो चिमणीच्या आकाराच डोक्यावर आणि पोटाखाली पिवळाजर्द रंग ल्यालेला सुगरण नर (बाया) पक्षी होता. त्याच्या बळकट चोचीमध्ये कोणत्यातरी वनस्पतीचा सोललेला धागा होता. नक्कीच तो घरटे (खोपा) बांधीत असावा! पण कोठे? लवकरच त्याचे उत्तर मला मिळाले. नीलगिरीच्या डहाळीवरून उडाला तो थेट अंगणातल्या विहिरीच्या आत उगवून आता विहिरीच्या दहा फूट वर आलेल्या फेफरी किंवा पाखर आणि पिंपळाच्या एकमेकात गुंतलेल्या झाडावर जावून बसला. विहिरीच्या आत असलेल्या फेफरीच्या झाडाच्या फांद्यावर सुगरण (बाया) पक्षाचे तीन खोपे (घरटे) मला दिसले. खोपे विणण्याची नुकतीच सुरुवात झाली होती. सुगरण पक्षाला आमच्याकडे ‘देवचिमणी’ म्हणतात. या पक्षांची घरटी (खोपे) नदी किनारी पाण्याकडे झुकलेल्या झाडांच्या फांद्यावर विणलेली असतात. त्याचप्रमाणे पडीक किंवा मोठ्या विहिरी ज्यांच्या दरडीमध्ये फेफरी, पिंपळ, औदुंबर यांसारखी झाडे निघाली असतात, या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने हा आपली घरटी विणतो. यामुळे साप, शिकारी पक्षी; तसेच मांसाहारी प्राण्यांपासून यांच्या पिल्लांना संरक्षण मिळते. अशा ठिकाणी त्यांच्या जीवनचक्राचे निरीक्षण करणे अत्यंत कठीण असते, परंतु आज अशी दुर्मिळ संधी घरीच चालून आली होती. या संधीचा फायदा घेण्याचा मी मनसुबा केला.

दुसर्‍या दिवशी सकाळी माझे मित्र डॉ. मनोहर खोंडे यांना भेटण्यास गेलो. त्यांना काल घडलेला सर्व घटनाक्रम सांगितला व सुगरण पक्षाच्या प्रजननकाळाच्या क्रियाकलापाचे जवळून निरीक्षण तथा फोटो घेण्याची संधी चालून आल्याचे सांगितले. डॉक्टरांनी ताबडतोब संमती दिली व उद्यापासून सूक्ष्मनिरीक्षणाला सुरुवात करावयाचे ठरले, तरी ही आजचा दिवस फुकट घालवण्याची माझी इच्छा नव्हती. दुपारी जेवण झाल्यावर मी छपरीला येवून बसलो. आज पाऊस थांबला होता. पिंजलेल्या कापसासारखे काही ढग सूर्यासोबत लपाछपीचा खेळ खेळत होते. काल पाऊस पडून गेल्यामुळे धूलीकणांमुळे मुक्त झालेले आकाश, स्वच्छ निळेशार दिसत होते. भरपूर सूर्यप्रकाशाने विहिरीतील तीनही खोपे स्पष्ट दिसत होते, पण अजूनही तो नर सुगरण मला दिसत नव्हता.

थोड्या प्रतिज्ञेनंतर चोचीमध्ये धागा घेवून तो आला आणि सरळ खोप्यावर जावून विणू लागला. मी छपरीतून बाहेर आलो. त्या खोप्याचे जवळून निरीक्षण करता यावे म्हणून हळूहळू विहिरीच्या दिशेने जावू लागलो. वीसेक फूट गेल्यावर मी थबकलो, त्याचे लक्ष माझ्याकडे गेले होते, आणलेला धागा त्याने खोप्याला विणला होता. आपले पंख नृत्यमुद्रेत हलवत तो खोप्यावर इकडून तिकडे, तिकडून इकडे, शीळ वाजवत फिरत होता. मी एक पाऊल पुढे टाकताच, शीळ वाजवत व पंख फडकावीत शेताच्या दिशेने तो उडून गेला. कदाचित मी त्याच्या सुरक्षा वर्तुळाच्या आत शिरलो असेन. त्याचे खोपे पाहण्याकरिता मी विहिरीच्या काठापर्यंत गेलो.

खोपे माझ्या नजरेपासून दहा फूटांच्या आत होते. झाडाच्या वरच्या डहाळीवर त्याने पहिला खोपा बांधला असावा, कारण त्याचा हिरवा रंग, फिक्कट पिंगट झाला होता. या खोप्याचे विणकाम त्याने अर्धवट सोडून दिले होते. दुसरा खोपा वरच्या खोप्याच्या खाली, पहिल्या खोप्याच्या डहाळीपेक्षा जाड आणि मजबूत फांदीला विणणे सुरू होते. या खोप्याचे विणकाम सुरू असल्याचे संकेत त्याच्या ताज्या हिरव्या रंगांच्या धाग्यांवरून मिळत होते. याचे विणकाम अर्ध्यापर्यंत होत आलेले होते. तिसरा खोपा विहिरीच्या आत खोल गेलेल्या डहाळीवर विणणे सुरू होते. मात्र या विणकामात पहिल्या दोन खोप्यांच्या विणकामाची सफाई आणि कला दिसत नव्हती. या खोप्याचे असे ओबडधोबड विणकाम कुणी केले असावे? हा प्रश्‍न मनात येवून गेला. माझे प्राथमिक निरीक्षण संपले होते. तेथून मी सरळ छपरीत येवून आरामखुर्चीत विसावलो व निरीक्षणांच्या नोंदी डायरीत लिहायला सुरुवात केली.
दुपारी चहा घेवून नुकताच मी छपरीत येवून बसलो होतो. इतक्यात आमचे जुने आवारी (शेतीचे काम मजूरांकडून करवून घेणारे) रामराव काका मटरे आले. त्यांची मुले कमावती झाली आणि उतारवयाला सुरुवात झाल्याने काका आता कामावर येत नव्हते, तरीही आमच्या घरी त्यांची दिवसातून एक फेरी असायचीच. हा मोठा बिलंदर आणि धाडसी माणूस, कुस्तीच्या आखाड्याचा शौक केलेला होता. गावाला व शेतीला त्रास देणार्‍या जनावरांना हुसकावण्यात त्याच्या तरुणपणातील काळात तो पटाईत होता. वनवासी असल्याने निसर्गाच्या अंगाखांद्यावर खेळलेला हा माणूस अशिक्षित असूनही अत्यंत सूक्ष्मनिरीक्षक होता. जंगलांचे तसेच जंगली प्राण्यांचे त्यांनी केलेले अवलोकन व विस्मयकारी अनुभव जेव्हा ते सांगत तेव्हा अंगावर रोमांच उभे राहत.

काकांनी पानाची चंची बाहेर काढली आणि पान बनवायला सुरुवात करताकरता मला म्हणाले, ‘‘बटा (बेटा), काय पाहून राह्यलारे तिकडे?’’
मी म्हणालो, ‘‘काका, आपली विहीर आहे ना, तिच्यातल्या झाडावर देवचिमनी खोपा करून राहली ते पाहतोय!’’
काका गालातल्या गालात हसला व म्हणाला, ‘‘भल्लं बिलंदर पाखरू आहे ते! पह्यले एक खोपा करते, बायको धुंडून आनते, लाग करते, मादी आंड्यावर बसलीरे बसली, का दुसरा खोपा बांधाले सुरू!’’
‘‘काका, दुसर्‍या खोप्यात तो राहतो काय?’’ माझा पोरकट प्रश्‍न.
काका गडगडाटासारखा हसला आणि म्हणाला, ‘‘अरं लेका माह्या, दुसर्‍या खोप्यासाठी दुसरी बायको धूंढाले जाते तो, अन् पह्यलीसाठी सवत घेवूनच येते. मंग तिसर्‍या खोप्याच्या तयारीला लागते.’’
‘‘काका, त्याला तिसरी मादी मिळते काय?’’ माझा उत्कंठापूर्वक प्रश्‍न.
काका विचारपूर्वक म्हणाला, ‘‘मले खरंच माहीत नाही गळ्या (गड्या).’’
रामरावकाकाने सांगितलेली ही माहिती माझ्याकरिता अगदी अनपेक्षित आणि नवीनच होती, परंतु पुढील काळात वाचलेल्या पक्ष्यांवरील पुस्तकांवरून काकाने खरे तेच सांगितल्याची पुष्टी झाली. रामरावकाकाने सांगितलेल्या वन्यप्राणी, पक्ष्यांचा बहुतेक कहाण्या पुढील 25-30 वर्षाच्या जंगलभ्रमणात व पक्षीनिरिक्षणात खर्‍या ठरल्या.

माझी नजर शेतावर दूरवर भिरभिरत होती. ज्वारीपेक्षा उंच असलेल्या बाजरीच्या कणसांवर चिमणीच्या आकाराचे काही पक्षी बसलेले होते. त्यातील दोन हळूहळू विहिरीकडे येत होते. शेताच्या आणि अंगणाच्या सीमेवरील डाळिंबाचं झाड त्यांचे प्रथम स्थानक असावे. तेथे येवून ते दोघे अलग अलग फांद्यावर विसावले. ते दोघेही सुगरण पक्षीच होते. मला वाटले नरासोबत मादी आली असावी. पण नाही! दुसराही नरच होता, परंतु याचा रंग धोपटून धोपटून धुतलेल्या कापडासारखा फिक्कट होता. रंग आणि किरकोल बांधा यावरून तो नुकताच तारुण्यात पदार्पण करणारा नर सुगरण होता. पाच मिनिटातच छोटा नर तेथून उडाला आणि विहिरीच्या आतील अव्यवस्थित व ओबडधोबड विणकाम केलेल्या तिसर्‍या खोप्यावर जावून बसला. मी मनात म्हटले, ‘‘असे आहे तर!’’ हा खोपा त्या नवतरुणाचा होता. कदाचित हा त्या मोठ्या नराचा प्रशिक्षणार्थी उमेदवार असावा.

या लहान नरापाठोपाठ, तो मोठा नर आपल्या दुसर्‍या नवीन विणकाम सुरू असलेल्या खोप्यावर जावून त्याच्यावर सफाईचा हात फिरवू लागला. थोड्या वेळातच ते दोघे एका पाठोपाठ खोप्यावरून निघून गेले. अर्धा तास वाट बघूनही ते दोघे परत न आल्याने मी छपरीतून वाड्याकडे निघून गेले.
दिवस तिसरा... दुर्बीण आणि पेन-डायरी घेवून छपरीतील खुर्चीवर जावून बसलो होतो. डोळ्यांना दुर्बीण लावली अन् शेताच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत नजर टाकली. शेताच्या शेवटच्या सीमेवरील ज्वारी आणि बाजरीची कणसे अगदी दहा फूटावर असल्यागत दिसत होती. अचानक पक्षांचा एक थवा दुर्बिणीच्या टप्प्यात आला. नर आणि मादी पक्ष्यांचा तो संयुक्त थवा होता. त्या समुहात पंधरा ते वीस पक्षी असावेत. कदाचित आपला नवरदेव सुगरण त्या स्वयंवरात नवरी मिळवण्याकरिता सामील झाला असावा. आता तो एखादी माती घेवून खोप्यावर येईल, या आशेने मी हाताला थकवा येईपर्यंत दुर्बीण त्या थव्यावर केंद्रित करून होतो. तो थवा विखरायला लागला. पक्षी विविध दिशांनी पांगले. माझे हात शक्तिपात झाल्याने आपोआपच दुर्बिणीसहित खाली आले. नजर मात्र थकली नव्हती, ती अजूनही त्याच दिशेने होती.

दूर अंतरावरून दोन पक्षी अंगणाच्या दिशेने येताना दिसले. काही क्षणातच ते डाळींबाच्या झाडावर येवून बसले. पण हाय रे दुर्दैव! ते दोघेही नर होते. मोठा नर काही क्षणांसाठी खोप्यावर गेला, अगदी घाई असल्यासारखी आकाशात झेप घेवून दृष्टीआड झाला. छोट्या नराने डाळींबांच्या झाडावरूनच आपले प्रस्थान शेताकडे केले. मी घड्यळावर नजर टाकली व वेळेची नोंद मनात केली. दुर्बीण मांडीवर ठेवून त्यांच्या आगमनाची प्रतीक्षा करीत बसलो. इतक्यात माझ्या पाठीमागे हालचाल जाणवली. मागे वळून बघतो तर, सौ. मंजू (पत्नी) हातात चहाचा कप घेवून उभी होती. मला आश्चर्याचा धक्का बसला. प्रश्‍नार्थक नजरेने मी तिच्याकडे पाहिले.

मंजू म्हणाली, ‘‘तुम्हाला चहाची गरज असावी म्हणून चहा आणला. मला बघायचा आहे तो खोपा. बहिणाबाईंची कविता आम्हाला शाळेत होती. तेव्हापासूनची इच्छा होती. तुमच्या त्या देवचिमन्या आणि त्यांचा खोपा पाहण्याची.’’
मी मनात म्हणालो, ‘‘चला हिची बालपणाची इच्छा पूर्ण करू, आणि चहाची परतफेडही करू’’ तिला बाजूच्या खुर्चीवर बसवले व काही सूचना दिल्या. हातात दुर्बीण दिली. तिला दुर्बिणीचा सराव होता. आम्ही दोघेही त्यांची वाट पाहू लागलो. तो मोठा नर चोंचीत हिरवा धागा घेवून आला. माझी नजर घडाळ्यावर गेली. बरोबर चौदा मिनिटानंतर तो आला होता आणि दुसर्‍या खोप्यावर बसून विणकाम करू लागला.

एक-दोन मिनिटातच तो उडाला. बारा मिनिटांत पुन्हा घरट्यावर आला. तिसर्‍या फेरीत तो दहा मिनिटातच चोंचीत हिरवा धागा घेवून आला. आजच्या निरीक्षणात आढळले की हिरवा धागा आणल्यानंतर त्याला ज्यास्तीत जास्त एक ते दोन मिनिटे व कमीत कमी पंधरा सेकंद धागा विणायला लागतात. त्याच्या तीन फेर्‍यांनंतर तो छोटा नर हिरवा धागा घेवून आला. म्हणजेच धागा आणण्याचा छोट्याचा वेळ बराच कमी होता.

साडेअकरा व्हायला आले होते. डॉ. खोडे यायची वेळ झाली होती. मंजू घरात निघून गेल्यानंतर, तो मोठा सुगरण कसा विणकाम करतो याचे दुर्बिणीतून बारकाईने निरीक्षण केले. हिरवा धागा आणल्यानंतर त्याने फेफरीच्या फांदीला ज्या ठिकाणी खोपा लटकवण्याची सुरुवात होते, त्या ठिकाणी आणलेला धागा लपेटला. वारंवार तो धागा आणायला जायचा आणि फांदीवरची खोप्याची गाठ मजबूत करायचा, कारण सरळ होते पाऊस, वारा वादळाने किंवा इतर कोणत्याही कारणाने ती फांदी अथवा ते अख्खे झाड जरी हादरले, तरी त्याची मादी आणि पिलांसहित त्याचा खोपा विहिरीच्या पाण्यात पडायला नको याची तो काळजी घेत होता. तो तितका निश्चितच बुद्धिमान होता.

त्याच्या खोप्याचे बांधकाम अर्धे झाले होते. अंडे उबवण्याचा कप्पा ऊर्फ बाळंतिणीचा खोली तयार झाली होती. तिचा खोलगट आकार दुर्बिणीतून स्पष्ट दिसत होता. प्रवेशद्वार अथवा खोप्याच्या आत येण्या-जाण्याचा बोगदा तयार करण्याची सुरुवात झाली होती. तो अविश्रांत फेर्‍या मारीत होता. त्याची चोच गालीच्या विणणार्‍या कसबी कारागिराच्या हातासारखी सराईतपणे विणकाम करीत होती. हातातून दुर्बीण ठेवून काही क्षण डोळे मिटले. कानात डॉक्टरांच्या स्कूटरचा आवाज कानी पडला. आल्या आल्या डॉक्टरांनी विचारले, ‘‘सकाळपासून काय काय दिसले?’’
मी त्यांना सविस्तर माहिती दिली. डॉक्टर म्हणाले, ‘‘आपण या घरट्याचे, तसेच पक्षाचे प्रत्येक स्टेजचे फोटो घेवू. अगदी पिल्ले खोप्यातून बाहेर येवून उडून जाईपर्यंत.’’
कल्पना एकदम मस्त होती. पण एक मोठी अडचण होती. डॉक्टरांच्या कॅमेर्‍याला टेली लेन्स (दुरून फोटो काढण्याचे भिंग) नव्हते. त्याकरिता डॉक्टरांना खोप्याच्या जवळ जावे लागणार होते, पण मोठा सुगरण 25-30 फूटाच्या आत आल्याबरोबर उडून जात होता. हा मला आलेला अनुभव मी डॉक्टरांना सांगितला.
डॉक्टर म्हणाले, ‘‘एक आयडिया आहे, मी विहिरीजवळच्या पाण्याच्या टाक्यात कॅमेरा घेवून लपून बसतो. बैठकीत अंथरलेली मोठी सतरंजी तू टाक्यावरून झाकून टाक. फोटो काढून झाले की मी तुला आवाज देईन तेव्हा सतरंजी काढून घे.’’
दुर्बिणीतून खोप्याचे निरीक्षण सुरू केले. अर्ध्या तासातच मोठ्या सुगरणाच्या चार फेर्‍या होऊन गेल्या होत्या. त्याला नक्कीच कशाची तरी घाई झाली होती. छोटा सुगरण मात्र दोनदाच धागा घेवून आला होता. पुढील एक तास यांचे जाणे-येणे सुरूच होते. हे पक्षी हिरवा धागा कशाचा व कोठून आणतात हा प्रश्‍न माझ्या मनात पिंगा घालू लागला. याचे उत्तर कसे शोधावे याचा मी विचार करीत होतो. पाठीला कळा यायला लागल्याने छपरीतून उठून बैठकीच्या आतील गादीवर डोळे बंद करून लोळलो. तरीही डोक्यात हिरवा धाग्याचा विचार सुरूच होता.

दुपारचे 4 वाजले असावेत कुणाच्या तरी पावलांच्या आवाजाने माझी तंद्री भंगली व मी डोळे उघडले. रामरावकाकांना बैठकीच्या दारातून आत येताना मी पाहिले आणि विचारले, ‘‘काका, तो देवचिमना हिरवा धागा कोठून आणतेगा?’’ माझी भाषा अजूनही पूर्ण शहरी झाली नव्हती.
‘‘बटा, ते पाखरू लयं हुशार हाये. शिंदीच्या लहान झाडावर जाते, कोवया पानचोई ले चोचीन फाळते, तेचा धागा काढून खोपा विनते. वावराच्या धुर्‍यावर केतकीचं झाड राह्यते, तेच्यापासून नरम धागा काढून खोपा अंदरून विनते. गवताचे धागे, नदीतल्या लव्हाळीचा धागाही ह्या आनते. म्या सौता नजरने पाह्यल हाये. झालं त्वाल समाधान!’’ काका माझ्याकडे पाहत म्हणाला.
‘‘काका या देवचिमण्यांनी अशा वर्दळीच्या जागी खोपा का केला असेल?’’ माझ्या मनात प्रश्‍न विचारला. ‘‘बटा, गोस्ट असी आहे, या वर्षी या वावरात जवारीच्या सोबत बाजर्‍याचा ईरवा आहे. या पाखराले बाजर्‍याचे दाणे लय आवडते. चरासाठी ज्यास्त दूर जा लागत नाही, म्हणून या ईहरीत खोपा केला.’’ असे म्हणून काकाने माझ्या हातात पानाचा विडा दिला व बैठकीच्या बाहेर पडला.
हातात दुर्बीण घेवून बाहेर आलो. खोप्यावर नजर टाकली, खोप्याच्या आत जाण्या-येण्याचा बोगदा किंवा प्रवेशद्वार अर्धा फूट लांब झाले होते. मोठ्या नर सूगरणाच्या फेर्‍या सुरू होत्या.

चवथ्या दिवशी डॉक्टर सकाळी 8 वाजताच आपला कॅमेरा घेवून माझ्या घरी हजर होते. मीही आज तयारीत होतो. मदतीकरिता रामरावकाकाला बोलावून घेतले होते. डॉक्टरांनी पाण्याच्या टाक्याचे निरीक्षण केले. टाक्याचे आतील गवत काकाने कापून बाहेर काढले. टाक्यात पायाच्या घोट्याएवढे पाणी साचले होते. ते काढण्याचा काही इलाज नव्हता. टाक्यात लाकडी स्टूल ठेवून डॉक्टर त्यावर विराजमान झाले. डॉक्टरांनी कॅमेरा विहिरीकडील भागाच्या टाक्याच्या भिंतीवर ठेवला व आपले तोंड विहिरीकडे केले. मी आणि रामरावकाकाने ती बैठकीतील सतरंजी आणून टाक्यावर झाकली. आम्ही परत छपरीत जावून बसलो. मोठा नर धागा घेवून आला होता. क्षणभर तो विहिरीकडे गेला व खोप्यावर न जाता डाळींबाच्या झाडावर जावून बसला. तो सतत विहीर व डाळींबाच्या झाडादरम्यान चकरा मारीत होता. या काळात छोटा नर खोप्यावर जावून परत उडून गेला होता. 35 मिनिटे चकरा मारून झाल्यानंतर एकदाचा तो आणलेला धागा घेवून खोप्यावर गेला. सूर्य बराच वर आला होता, वातावरण गरम होत चालले होते. मोठ्या नराच्या नेहमीसारख्या धागा आणण्याच्या फेर्‍या सुरू होत्या. फेफरीच्या झाडावर दहा एक वेळा कॅमराचा फ्लॅश चमकलेला दिसला.

डॉक्टरांना टाक्यात बसून एका तासापेक्षा ज्यास्त वेळ झाला. ठरल्याप्रमाणे डॉक्टरांनी मला आवाज दिला. आम्ही टाक्यावरून सतरंजी काढली. डॉक्टरांकडे आम्ही दोघेही आश्चर्याने बघत होतो. ते नखशिखांत घामाने भिजले होते. सर्व कपडे घामाने चिंब ओले झाले होते. डोक्यातून व चेहर्‍यावरून घामाच्या धारा वाहत होत्या. डॉक्टरांना आधार देवून टाक्यातून बाहेर काढले व छपरीत नेले. लिंबू, मीठ पाण्याच्या सरबताने डॉक्टरांना टवटवी आली.
डॉक्टर म्हणाले, ‘‘विलक्षण अनुभव घेतला मी. अक्षरश: स्टरिलायझेशनच्या कुकरमध्ये असल्यासारखे वाटत होते. पंधरा मिनिटातच ठरवले की या पुढे टाक्यात बसणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त फोटो काढून घेतले. हा बाया लेकाचा अजिबात स्थिर राहत नव्हता त्यामुळे किती फोटो चांगले येतील यात शंका आहे. तुझे निरीक्षण चालू ठेव व मला सांग..’’ असे म्हणून डॉक्टर निघून गेले. काही वेळाने रामरावकाकाही निघून गेला.

छपरीत आता मी एकटाच होतो. दुर्बीण डोळ्याला लावून त्याची शिवणकला न्याहाळत होतो. त्या खोप्याचे अजून एक वैशिष्ट्य माझ्या लक्षात आले की धाग्याचे टोक तो वर येवू देत नाही. आलेले दिसले तर जाणीवपूर्वक आत टोचतो. अचानक त्याने चमत्कारिक हालचाल केली. तो खोप्यावरून उडून त्याच्या विणणे सोडून दिलेल्या खोप्यावर जावून बसला. त्या खोप्याचे धागे काढण्याचा प्रयत्न केला. तेही सोडून तो उडाला आणि छोट्या नराच्या खोप्यावर जावून त्याचे धागे काढून स्वत:चा खोपा विणू लागला. त्याला खोपा विणण्याची विलक्षण घाई झाली होती. काय कारण असावे बरे? मी विचार करीत जेवायला निघून गेलो.

दुपारी 2 वाजता मी पुन्हा दुर्बीण घेवून निरीक्षण सुरू केले. खोपा पूर्ण व्हायला आला होता. त्याचा प्रवेशद्वाराच्या बोगद्याची नळी अंदाजे एक फूट इतकी लांब झाली होती. छोटा नर नसतानाच तो त्याच्या खोप्याचे धागे काढून आपल्या खोप्याला लावत होता. त्याने आपल्या खोप्यावर गोल चालत जावून प्रदक्षिणा घातली व शेताच्या दूरच्या सीमेकडे उडत निघून गेला. बराच वेळ वाट पाहूनही त्याचा पत्ता नव्हता म्हणून मी डोळे मिटून आरामखुर्चीवर लोटलो. पंधरा-वीस मिनिटांतच सुगरण पक्ष्यांच्या तोंडातून निघालेल्या विविध आवाजांनी (कॉलस) माझे लक्ष वेधून घेतले. खोप्यावर नजर टाकली तर बघतो, दोन सुगरण माद्या फेपरीच्या डहाळीवर बसून आहेत आणि आपले दोन्ही नर आपआपल्या खोप्यावर बसून पंख हालवत नृत्य करीत विविध आवाज काढून त्या माद्यांना आपल्या खोप्यावर बोलावीत आहेत. बराच वेळ त्यांची विनवणी ऐकून त्यातील एक मादी, किंचित गुलाबी रंग ल्यालेली, चिकण्या पिसांची गुबगुबीत, क्यूट अशी ती सुगरण मोठ्या नराच्या जुन्या खोप्यावर येवून बसली. एक-दोन वेळा तिने त्या खोप्याचे धागे चोचीने ओढून पाहिले. तेथून ती त्याच्या पूर्ण झालेल्या खोप्यावर आली. या खोप्याचे तिने आत जावून तसेच बाहेरून संपूर्ण खोपा फिरून चोचीच्या साहाय्याने परीक्षण केले. थोडा वेळ खोप्यावर थांबली. तेथून उडून त्या छोट्या सूगरणाच्या खोप्यावर गेली. ते त्याचे ओबडधोबड विणकाम पाहून कदाचित तिची निराशा झाली असावी. ताबडतोब तेथून उडून ती पुन्हा फेफराच्या झाडाच्या शेंड्यावर जावून बसली.

दुसरी मादी पहिल्या मादीचे निरीक्षण करीत असावी. तिनेही तिच प्रक्रिया रिपीट केली. काही वेळाने पहिली मादी मोठ्या नराच्या पूर्ण झालेल्या खोप्यावर येवून बसली व आपले पंख हलवू लागली. ताबडतोब तो मोठा नर तिच्याभोवती पिंगा घालू लागला. लगेचच संधी साधून तिच्यावर आरूढ होवून लागला. प्रणयक्रीडा करू लागला. 10 ते 15 वेळा ही क्रिया घडत होती. शेवटी ती मादी खोप्याच्या आत जावून बसली. मोठा नर आपल्या खोप्याला अजून व्यवस्थित करू लागला. फेपरीच्या शेंड्यावर बसलेली दुसरी मादी सरळ त्या ओबडधोबड खोप्यावर जावून बसली. दोन-चार वेळा तिने त्या खोप्याचे विणकाम तपासून पाहिले. तिचे तिलाच माहीत दोन मिनिटातच तो खोपा सोडून ती शेताच्या दिशेने उडून गेली. तिच्या पाठोपाठ तो छोटा नरही गेला.
मोठ्या नराने, छोट्या नराच्या खोप्याला सुटणे सुरू केले होते. तेथून तो धागा पळवायचा आणि स्वत:च्या खोप्याला लावायचा थोड्या वेळातच त्याच्या स्वत:च्या खोप्याचे प्रवेशद्वार विणून पूर्ण झाले होतेे. अंधार पडायला लागला होता, म्हणून मीही आजचे निरीक्षण आटोपते घेतले.

पाचव्या दिवसांची सकाळ उजळली ती मनात उत्सुकता घेवूनच. त्यामुळे झटपट तयार होवून साधारणत: 9 वाजता मी छपरीत जावून बसलो आणि दुर्बिणीने खोप्यांचे निरीक्षण करू लागलो. तेथे एकही पक्षी हजर नव्हता. छोट्या नराचा विस्कटलेला खोपा जशाच्या तसाच होता. अर्ध्या तासानंतर मोठा नर आणि त्याची मादी खोप्यावर आली. नर मादीसोबत प्रणयक्रीडा करू लागला. थोड्या वेळातच मादी खोप्याच्या आत गेली. नर खोपावर बसला, चोंचीने खोपा तपासला आणि उडून गेला. आज छोट्या नराचे दर्शन झाले नाही. वीस मिनिटांनंतर मोठा नर चोचीत पांढरा धाग घेवून आला व खोप्यावर बसला. मी दुर्बिणीतून बघत होतो. मला त्याच्या चोचीतला पांढरा मुलायम धागा स्पष्ट दिसत होता. तो बहुतेक कातीनीच्या (कोळी, स्पायडर) जाळ्याचा असावा. मादी घरट्यातून बाहेर पडली व शेताकडे उडून गेली. ती निघून जाताच नर खोप्याच्या आत गेला. दुपारी 1 वाजेपर्यंत त्याचे पांढरा धागा आणणे व खोपाच्या आत जाणे सुरूच होते.

छोटा नर तसेच काल उडून गेलेली मादी अजूनपर्यंत आली नव्हती. बहुतेक त्याने त्याच्या ओबडधोबड खोप्याचा कायमचा त्याग केला होता.
मला माझ्या कामानिमित्त काही आठवड्यांकरिता आजच बाहेरगावी जायचे असल्याने तयारी करण्याकरिता वाड्यात गेलो. जेवण करून आणि बॅग घेवून मी छपरीत आलो. सोबत मंजू होती. तिला या खोप्यावर लक्ष ठेवायची सूचना केली व खोप्यावर नजर टाकली. तो खोप्यावर बसला होता त्याची मादी आत अंडे देत असावी. त्याला किंवा मला पुढे घडणार्‍या अकल्पनीय घटनांची जाणीव नव्हती. बॅग घेवून मी बसस्थानकाच्या दिशेने चालू लागलो.
बाहेरगावी जावून मला तेरा-चौदा दिवस झाले होते. सुगरणीच्या खोप्याची आठवण येत होती. अंडे उबवून पिल्ले तयार झाली असावी असा माझा अंदाज होता. काकाने सांगितल्याप्रमाणे तो नर पक्षी दुसर्‍या नवीन खोप्याच्या तयारीला लागला असावा. मनात इच्छा होती की खोप्यातील सुगरणीचे पिल्ले माझ्यासमोर आकाशात उडावीत.

पुण्याहून मी अमरावतीला आणि तेथून वरूडला पोहोचलो. रात्रीचे 8 वाजून गेले होते. गाडेगावची शेवटची बस निघून गेल्याने डॉ. खोडे साहेबांकडे मुक्काम करावा म्हणून 9 वाजता राजूराबाजारला पोहोचलो. तेथून मी घरी फोन केला. मंजूने फोन उचलला, दोन-तीन वेळा हॅलो हॅलो केल्यावर तिच्या तोंडावून हलकासा हॅलोचा घूसमटलेला आवाज आला. काही तरी नक्कीच बिघडले होते.
मी, विचारले, ‘‘सर्वांच्या तब्बेती ठीक आहे ना?’’
तिने होय म्हणून म्हटले.
‘‘मग तुझा आवाज रडल्यासारखा का येत आहे? टेलिफोन खराब आहे काय? किंवा काही वाईट बातमी आहे काय? उद्या घरी येतो आता मी डॉक्टरांकडे आहे.’’ मी.
‘‘नाही हो!’’ तिचा आवाज आणखीच रडका झाला.
‘‘मग काय भानगड आहे? मला लवकर सांग माझा जीव टांगणीला लागला आहे.’’ मी काळजीच्या स्वरात म्हणालो.
‘‘अहो, आपल्या विहिरीतले सुगरणीच्या खोप्याचे झाड, आपल्या कामावरच्या माणसांनी आज सकाळी तोडून टाकून फेकून दिले. दुपारपासून येथे पाऊस सुरू आहे. त्यात असलेले पिल्ले मरून गेली असतील.’’ ती फोनवरच स्फूंदू लागली. मला दु:खद धक्का बसला. मी एकदम सुन्न झालो.
काय करावे काही सुचेना. माझ्या हातात काहीच करण्यासारखे नव्हते. डॉक्टरांना घडलेली हकीगत सांगितली. डॉक्टर उदास झाले. कसे तरी दोन घास पोटात ढकलून मी बिछान्यावर अंग टाकले. सुगरणीच्या खोप्याचा सारा चित्रपट माझा डोळ्यासमोरून झरझर सरकत होता. परंतु झाड तोडनू खोपा नष्ट करण्याचे दृश्य मात्र डोळ्यासमोर येत नव्हते. कदाचित ही घटना माझ्या मनाने स्वीकारली नसावी. रात्री कधी झोप लागली ते कळलेच नाही.
सकाळी 9 वाजता डॉक्टरांच्या स्कूटरवर बसून गाडेगावला गेलो. मला माझ्या घरासमोर उतरवून डॉक्टर दवाखान्याकडे निघून गेले. मी उदास मनाने घरात प्रवेश केला. सपरीमध्ये (ड्रॉइंग रूम) मंजू खिन्न मुद्रेने उभी होती. मी अबोलपणे बंगईवर (लाकडाचा मोठा पाळणा) जावून बसलो. पाणी पिवून थोडं शांत झाल्यावर तिने स्वत:हून काल सकाळी घडलेली घटना सांगितली. विहिरीच्या आणि अंगणाच्या आसपास पावसामुळे गवत तसेच रानटी झुडपे निघाली होती. सततच्या पाण्याने ती खूपच वाढली होती. त्या सकाळी माझ्या लहान भावाला त्या झुडपे आणि गवतात एक साप वावरताना दिसला. म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने त्याने कामावरील माणसांना ताबडतोब परिसराची साफसफाई करण्यास सांगितले. त्यांनी ती तत्परतेने केली. पण ‘तक्षकाले नम: स्वाहा. इंद्राये नम: स्वाहा’ या न्यायाने सुगरणीची खोपे असलेली विहिरीमधील झाडेसुद्धा तोडण्यात आली.

मी मनात विचार केला. एक आठवण म्हणून तो खोपा घरी नेवूया. मी खोप्याची फांदी टाक्यातून बाहेर काढली आणि खोपा फांदीपासून अलग करण्यास सुरुवात केली. माझ्या हाताचा हलकासा धक्का खोप्याला लगाला, काय चमत्कार! काय आश्चर्य! खोप्यातून पिलांचा चिवचिवाट सुरू झाला. त्यांची ती किलबिल ऐकून माझ्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. मी टाक्यावरून उतरताना फांदीला मोठा धक्का बसला. पिल्ले एकदम चिडीचूप झाली. फांदीसहीत खोपा घेवून मी छपरीत आलो. खोपा जमिनीकडे लटकत राहील अशारीतीने फांदी तक्तपोसावर ठेवली व फांदीवर वजन ठेवले. फांदीला इतके झटके बसूनही पिल्ले एकदम चिडीचूप होती. मी खोप्याला हळूच धक्का दिला. पुन्हा आश्‍चर्य! पिलांचा चिवचिवाट सुरू झाला. ‘अस्से आहे तर!’ मी मनात म्हणालो. मला त्यांचे संकेत समजायला लागले होते. फांदीला झटके म्हणजे शतू आला आहे. सावध व्हा आणि चूप बसा. खोप्याला हळूच धक्का किंवा स्पर्श म्हणजे आई-बाबा जेवण घेवून आले. आता त्यांची चिवचिव थांबली होती.

माणसांनी चारलेल्या अन्नाने चिमणीची पिल्ले मरतात हा आमचा अनुभव होता. दोन वर्षांपूर्वी, एका फोटोफ्रेमच्या मागे चिमणीची पिल्लं होती. चिमणा-चिमणी त्यांचे संगोपन करीत होते. एके दिवशी चिमणी बाहेर गेली ती परत आलीच नाही. दुसर्‍या दिवशी चिमणा ही पिल्लं सोडून निघून गेला. भुकेने व्याकुळ झालेली पिल्लं फोटोफ्रेमच्यावर येवून वाट पाहत होती. मला त्यांची तगमग पाहली न गेल्याने पोळीचे भिजवलेले छोटे तुकडे, भाताची शिते चिमट्याने त्यांना चारले. त्यांनीही ते खाल्ले. चिमण्यांना जे खातांनी मी पाहिले होते तेच त्यांना मी भरवले होते. तरीही तिसर्‍या दिवशी तीनही पिल्लं त्यांच्या खोप्यात मरून गेली होती.

या पिलांच्या बाबतीत तसे करणे प्राणघातक ठरू शकले असते. आम्ही एक प्रयोग करून पाहावयाचं ठरवलं. तो खोपा फांदीपासून वेगळा केला. ज्या डाळींबाच्या झाडावर तो सुगरण पक्षी बसायचा त्याच्या एका फांदीला हा पिल्लं असलेला खोपा बांधला. आम्ही ठरवलं की या पिल्लांचे मायबाप येतात काय याची दिवसभर वाट पाहायची. जर ते आले नाहीत तर अळ्या, ओल्या बाजरीचे दाणे असं जेवण खोप्याला छिद्र पाडून नोजप्लायरने त्यांना भरवायचे मग काहीही होवो. कारण गेल्या 30-32 तासात ते उपाशीच होते. नाही तरी भुकेने ते मरणारच होते. संजय, ओल्या बाजरीची कणसे आणण्याकरिता शेतात निघून गेला. अर्धा पाऊण तास वाट पाहून आम्ही घरी निघून आलो.

दुपारचे 4 वाजले होते. ओल्या बाजरीचे दाणे आणि नोजप्लायर घेवून मी छपरीत आलो व खुर्चीत बसलो. अजूनपर्यंत कोणताही पक्षी खोप्यावर आला नव्हता. मी निराश झालो होतो. खोप्यापर्यंत जावून त्याची नजरेनेच तपासणी केली. तो व्यवस्थित होता. मग हळूच त्याला धक्का दिला. पिलांची चिवचिव सुरू झाली. पिलं सुरक्षित व जीवंतही होती. माझ्या मनात धर्मयुद्ध चाललं होतं. पिलांना खावू घालावे की थोडी वाट पाहावी. खावू घालण्याचे परिणाम मला माहीत होते. डॉक्टरांच्या संकटातूनही ते वाचले होते. ते खोप्याबाहेर पडले असते तर निश्चितच ते मेले असते. त्या खोप्याच्या नळीतून त्यांना आत घालणे अशक्य होते. खोप्याबाहेरच्या पिलांना आई-बापाने कधीच स्वीकारले नसते. ते काही असो पिलांचे नशीब बलवान होते. आतापर्यंतचा घटनाक्रम पाहता काही तरी मार्ग निघेल असा विश्वास वाटू लागला. लवकरच त्याचा अनुभव आला. शेताच्या दूर वर छोट्या पक्षांचा थवा मला दिसला. तसाच मी छपरीत जावून बसलो. दुर्बीण हातात घेतली. तो थवा सुगरणांचाच होता. त्यातील एक पक्षी हळूहळू ज्वारीच्या एका कणसावरून दुसर्‍यावर येत येत डाळींबाजवळ असलेल्या रामफळाच्या झाडावर येऊन बसला. त्याच्यात आत्मविश्वासाचा अभाव होता. तसाच तो भेदरलेला होता. बराच वेळ तो त्या झाडावरच थांबला. तेथून उडून तो डाळींबाच्या एका फांदीवर जाऊन बसला. त्याची नजर सारखी भिरभिरत होती. कदाचित कालचा अनुभव त्याच्या खोलवर कोरला गेला असावा. थोड्या वेळातच तो त्याच्या खोप्यावर येऊन बसला. पिलांचा चिवचिवाट सुरू झाल्याचा क्षीण आवाज माझ्या कानी पडला. काही सेकंदातच तो त्या थव्याकडे निघून गेला. तो खोप्यात आत न जाताच निघून गेल्याचे पाहून मी अत्यंत निराश झालो. तरीही धीर धरून काही तरी घडण्याची मी वाट पाहत राहिलो. संधिप्रकाश हळूहळू कमी होत होता. अंधाराने आपले हातपाय पसरणे सुरू केले होते.

अकस्मात दोन पक्षी येवून रामफळाच्या झाडावर बसले. तेथून ते डाळींबाच्या झाडावर गेले, दुर्बिणीतून पाहिले तर ती नर-मादीची जोडी होती. बापाने आपल्या लेकरांकरता परागंदा झालेली त्यांची आई शोधून आणली होती. नर झाडावरच थांबला, मादी खोप्यात आत गेली व ताबडतोब बाहेर येऊन उडून गेली. पाठोपाठ नरही उडून गेला. काही मिनिटांतच ती दोघेही पिलांकरिता चारा घेऊन आली. घुप्प अंधार होईपर्यंत त्यांचे चारा घेऊन येणे व चार्‍याला जाणे सुरूच होते.

त्यांचे पिलांवरचे प्रेम पाहून त्या दोन्ही पक्षांबद्दल आदर, सन्मान निर्माण झाला. मनोमन त्या सुगरण पक्ष्याच्या जोडप्याला अभिवादन केले. अत्यंत आनंदाने व प्रसन्न मनाने मीही माझ्या पिलांना आणि त्यांच्या आईला पाहण्यास माझ्या खोप्यात निघून गेलो.

- शिरीषकुमार पाटील
19, ‘बनाई’, आय.टी.आय. कॉलनी,
कांतानगर कॅम्प, अमरावती - 444602
भ्र. : 9421818695







बिजवराच्या पत्नीच्या खुनाचं प्रकरण

4 ऑगस्ट 2005. हरकिशन लखानी आदल्याच रात्री आपल्या बिझनेस टूरवरून भारतात परतले होते. एक रात्र मुंबईत काढून दुसर्‍या दिवशी सकाळीच त्यांनी आपल्या खंडाळ्याच्या बंगल्याचा रस्ता धरला होता. गाडी पार्क करतेवेळी त्यांना बंगल्यात जरा जास्तच वर्दळ दिसली. खाकी वर्दीतील चार-पाच हवालदार इथे-तिथे फिरत होते. कसली तरी मोजमापे घेत होते. हरकिशनभाई विचार करतच गाडीतून उतरले आणि त्यांची भेट इन्स्पेक्टर तावड्यांशी झाली.
‘‘तुम्ही श्री. लखानी का?’’ तावड्यांनी विचारले.
‘‘हो. काय भानगड काय आहे इन्स्पेक्टर?’’
‘‘आय ऍम एक्स्ट्रीमली सॉरी मि. लखानी, आपल्या पत्नी श्रीमती सुनंदा यांचा काल रात्री खून झाला आहे.’’
‘‘ओह नो!’’ हरकिशनभाई मटकन खालीच बसले. तावड्यांनी एकाला पाणी आणावयास पाठवले. नंतर ते हरकिशनभाईंना सावकाश घरात घेऊन गेले. ‘‘लखानीजी, माफ करा. आपल्यासाठी हा एक फार मोठा धक्का आहे, हे आम्ही समजू शकतो. तरी गुन्ह्याचा तपास शक्यतो वेगाने व्हावा म्हणून आम्हास काही गोष्टी करणे भाग आहे. आम्ही सुनंदाबाईंचे प्रेत ताब्यात
घेतले आहे. ते तुम्हाला शवविच्छेदनानंतर साधारण दोन दिवसांनी मिळेल. तुम्ही कृपया घरातील सर्व वस्तूंचा एकदा हिशोब घेऊन काही सामान गहाळ झाले आहे काय ते पाहा. आमची या ठिकाणाची बरीचशी पाहणी पूर्ण झाली आहे. मी उद्या संध्याकाळी परत येईन. तेव्हा मला मिसिंग मालमत्तेची यादी द्या. काही जबान्यासुद्धा घ्याव्या लागतील. मी उद्याच तपशीलवार सांगेन.’’ तावडे पंचनामा पूर्ण करून निघून गेले.

हरकिशन लखानी हे मुंबईतील एक बडे प्रस्थ होते. ‘लखानी उद्योगसमूह’ हे एक प्रख्यात नाव होते. हरकिशनभाई त्याच लखानी कुटुंबातील कनिष्ठ बंधू. जरी प्रमुख अधिकारी हे त्यांचे ज्येष्ठ बंधू, स्वरूपकिशन यांच्या हातात असले तरी हरकिशनभाईंच्या शब्दालाही उद्योगसमूहात मोठा मान होता. विशेष करून तयार कपड्यांच्या
उद्योगाच कारभार हरकिशभाई एकहाती सांभाळत असत. याकरिता त्यांची महिना-दोन महिन्यात एखादी परदेशवारी होतच असे.
हरकिशनभाई साधारणत: पन्नाशीतील गृहस्थ होते. पण त्यांचा कामाचा उरक पाहून लोक त्यांना चाळीशीतीलच समजत. त्यांच्या समाजातील प्रथेप्रमाणे त्यांचे लग्न वयाच्या बावीसाव्या वर्षीच कलावतीदेवींबरोबर झाले. चोवीस वर्षे संसार केल्यावर कलावतीदेवी साध्याशा आजाराच्या निमित्ताने वारल्या. औषधांची अकल्पनीय रिऍक्शन असे निदान डॉक्टरांनी सांगितले. पत्नीच्या निधनानंतर वर्षाच्या आत हरकिशनभाईंनी सुनंदाबरोबर लग्न केले. सुनंदा त्यावेळी अठ्ठावीस वर्षांची होती आणि लखानी ग्रुपमध्येच वरिष्ठ पदावर कार्यरत होती. लग्नानंतर सुनंदा नोकरी सोडून घरीच राहू लागली.
हरकिशनभाईंना कलावतीदेवींपासून नेत्रा नावाची एक मुलगी होती. आईच्या मृत्युच्या वेळी नेत्रा सतरा वर्षांची होती. नेत्राला आपली सावत्र आ
ई कधीच आवडली नाही. या लग्नानंतरच हरकिशनभाईंनी खंडाळ्याची प्रॉपर्टी घेतली होती. सुनंदाबाई बरेचदा खंडाल्यासच असत. त्या जेव्हा मुंबईस येत, नेत्रा काकांकडे राहण्यास जात असे. नेत्राने नुकतेच शिक्षण पूर्ण करून आपल्याच उद्योगात उमेदवारी सुरू केली होती.

सुनंदा या लग्नापूर्वी आपल्या भावाबरोबर बोरिवलीस राहत असे. सुनंदाचा भाऊ मनसुख दलाल एका सी.ए. फर्ममध्ये कामास होता. मनसुखचं छोटं आणि सुखी कुटुंब होतं. पत्नी निशा आणि मुलगा हरीश. सुनंदाचं हरकिशनभाईंशी झालेलं लग्न मनसुखला मान्य नव्हतं. त्यामुळे लग्नानंतर त्याने सुनंदाशी कसलाही संबंध ठेवला नव्हता, पण सहा महिन्यांपूर्वीच सुनंदाने स्वत:चा वीस लाखाचा विमा उतरवला होता ज्याचा लाभार्थी तिने हरीशला केले होते. तसे तिने आपल्या भाईला पत्राने कळवले होते.

या कथेला खरी सुरुवात त्यावेळी झाली, तेव्हा निशा दलाल आपल्या नवर्‍याची केस घेऊ माझा
मित्र देवदत्त याच्याकडे आली. 5 ऑगस्टची संध्याकाळ. शुक्रवार असल्याने मी नेहमीप्रमाणे देवदत्तकडे कॉफी आणि आठवड्याच्या गप्पा यासाठी गेलो होतो. श्रावणी पाऊस पडत होता. मी जाताना भजी घेऊन गेलो होतो. आमच्या गप्पा चालू असताना संध्याकाळी साधारणत: सातच्या सुमारास बेल वाजली. दाजीने (देवत्तचा नोकर) दार उघडले. दारात निशा दलाल या नखशिखांत भिजलेल्या अवस्थेत उभ्या होत्या. त्या अतिशय घाबरलेल्या आणि गोंधळलेल्या दिसत होत्या. दाजीने त्यांना एक टॉवेल दिला आणि जराशी कॉफी दिली. देवदत्तने त्यांना बसायला सांगितले आणि त्यांचे चित्त जरा स्थिर झाल्यावर त्यांनी आपली कैफियत सुरू केली. पण अजून मी तुम्हाला माझा आणि मुख्य म्ह
णजे देवदत्तचा परिचय करूनच दिलेला नाही. देवदत्त हा एक खाजगी गुप्तहेर आहे. खाजगी गुप्तहेर म्हटल्यावर जी प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते त्याच्या एकदम उलट व्यक्तिमत्त्व. सडसडीत बांधा. अंगात साधेसे कपडे. खांद्यावर बरेचदा शबनम. गुन्ह्याच्या ठिकाणी तपासास लागतील अशा अनेक चमत्कारिक वस्तू त्या शबनममध्ये सापडतील. नोंदवही, अनेक पेनं, भिंग, कॅमेरा, फूटपट्टी, बारीक दोरा, सुतळीचा गुंडा, चाकू, एखादं फळ आणि खोट्या दाढी-मिशासुद्धा. गुन्हेगारांच्या मागावर जाताना मात्र जरा हालचालीस सोपे पडेल असे ढगळ शर्ट पँट आणि त्याच्याजवळ एक अत्यंत आधुनिक असं पिस्तूलसुद्धा आहे. अर्थात त्याचा वापर झालेला मला फारसा आठवत नाही, पण त्याला तायक्वांडो उत्तम येतं आणि त्याचं फार भयानक प्रात्यक्षिक मी एक-दोनदा पाहिलं आहे. पण त्याचं मुख्य शस्त्र म्हणजे त्याच्या सर्व गबाळेपणावर मात करीतल असे त्याचे ते दोन भेदक हिरवट डोळे. ते जेव्हा रोखून तो पाहतो तेव्हा कोणीही त्याच्याशी खोटं बोलूच शकत नाही. पण कसे कोण जाणे एखाद्या साक्षीदाराशी बोलताना तेच डोळे अतिशय आश्वासक भाव व्यक्त करताना मी पाहिले आहेत.

देवदत्त स्वत: शक्यतो कोणत्याही गुन्हेगारास पकडावयास जात नाही. त्याची यंत्रणा मजबूत
आहे. हवे ते पुरावे गोळा करून तो पोलिसांना खबरा देतो. साक्षीपुरावे गोळा करणं आणि त्याआधारे आणि आपल्या तल्लख बुद्धिचा वापर करून गुन्हेगारापर्यंत पोहोचणं हे त्याचं काम. प्रत्यक्ष अटकेची जबाबदारी पोलिसांची. म्हणून गुन्हेगारी जगतात देवदत्तला ‘पँथर’ म्हणून ओळखलं जातं.

मी डॉ. सुलाखे. सूर्यकांत सुलाखे. सध्या जनरल फिजीशियन म्हणून काम बघतो. पण फॉरेन्सिक सायन्सची फार आवड. उच्च शिक्षणासाठी हाच
विषयही घेतला होता. काही वर्षे पोलिसात नोकरी केली. नंतर वैयक्तिक कारणांमुळे सोडावी लागली, पण अजूनही तज्ज्ञ म्हणून काही केसेससाठी जातो. देवदत्तची मैत्री तेव्हाच एका केसमुळे जुळली आणि त्याच्यासारखा स्वतंत्र झाल्यावर पक्की झाली.

तर या कहाणीची सुरुवात होती ती 5 ऑगस्टच्या संध्याकाळी. श्रीमती दलाल जेव्हा देवदत्तला भेटायला आल्या तेव्हा मी तिथेच होतो. गुन्हा 3 तारखेस घडला. त्या सकाळी मनसुख दलाल आपल्या बहिणीस भेटायला खंडाळ्यास गेले होते. तिथून ते 4 तारखेस घरी परतले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते दुपारी तिथून निघाले. पण रात्री त्यांचा निवास कुठे होता, हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. साहजिकच पोलिसांनी त्यांचाच संशय घेतला. त्यांचे आधीच बहिणीशी पटत नव्हते आणि त्या दिवशीही त्यांचे भांडण झाल्याचे नोकराने जबानीत सांगितले हो
ते. शिवाय विम्याचे पैसे हाही मुद्दा होताच. मनसुखभाईंना लगेच अटक झाली.

श्रीमती दलाल अगदी घाबरून गेल्या होत्या. देवदत्तने त्यांना शांत केले आणि त्यांच्याकडून अधिक माहिती घेण्यास सुरुवात केली. ‘‘हे बघा बाई, जर माझ्या मदतीची अपेक्षा असेल तर काही गोष्टी मला स्पष्टपणे तुम्ही सांगितल्या पाहिजेत आणि खोटं बोलण्याचा उपयोग नाही. सुलाख्यांना तुम्ही विचारू शकता की माझं हेरांचं जाळं किती मजबूत आहे. थोडीही खोटी माहिती मी लगेच पकडेन.
‘‘नाही देवदत्तसाहेब. काहीही विचारा. मला माहीत आहे ते सर्व सांगेन.’’
‘‘तर 3 तारखेच्या रात्री श्री. दलाल कुठे होते?’’
‘‘फार कठीण प्रश्‍न आहे साहेब. पण तुम्हाला म्हणून सांगते. हे एका सी.ए. फर्ममध्ये कामाला आहेत. आता सी.ए. म्हटलं की इंन्कम टॅक्सशी संबंध आलाच. क्लायंट्सच्या
विविध भानगडी असतात. कधी कधी प्रत्यक्ष जावं लागतं. तसे ते खरं तर कंपनीच्या कामासाठी लोणावळ्यास गेले होते. दोनलाच गेले होते. तीन तारखेस जरा वेळ मिळाला म्हणून सुनंदाला जरा समजवायला गेले होते की आम्हाला तुझे पैसे नकोत.
आता हे काम पोलिसांना सांगितलं तर नस्ती भानगड उभी राहायची. पण यांच्याबरोबर कंपनीचा ड्रायव्हर होता. तो देईल साक्ष.’’ बाईंच्या चेहर्‍यावर खरेपणा दिसत होता.

‘‘मी विश्वास ठेवतो बाई तुमच्यावर.’’’ देवदत्त म्हणाला. ‘‘आता काही प्रश्‍नांची उत्तरं द्या. पहिलं म्हणजे तुमच्या यजमानांना अटक कुठे झाली आहे?’’
‘‘मुंबईला आमच्या घरीच आले होते पोलीस. पण तपासासाठी खंडाळ्यास नेलंय. मी भेटून आले तिथे.’’
देवदत्तने लगेच फोन फिरवले आणि तावड्यांशी संपर्क साधला. ‘‘हॅलो, मी देवदत्त बोलतोय. सुनंदा लखानी केसवर मी काम करतोय.’’ तावडे सुदैवाने ओळखीचे निघाले. ‘‘तावडे, मी आणि डॉ. सुलाखे उद्या सकाळी खंडाल्याला पोहोचू. मग केस तपशीलवार डिस्कर करू आणि हो, बॉडी ताब्यात दिली का? नाही? गुड. मग सुलाखे एकदा बघतील. नंतरच द्या. उद्या सकाळी भेटूच.’’

देवदत्तने फोन ठेवला आणि माझ्याकडे बघितले. ‘‘तू येशील ना रे सूर्या? मी आपला तुझ्यावतीने बोलून मोकळा झालो.’’
‘‘म्हणजे काय? तुम्ही नुसती आज्ञा करा. बंदा हजर आहे आणि खूप दिवसात प्रेत फाडायलाही मिळालेलं नाही.’’
‘‘आता सांगा बाई, तुम
चे सुनंदाबाईंशी संबंध कधीपासून फाटलेले आहेत?’’, देवदत्त अशा वेळी फारच झटकन मुद्द्यावर येई.
‘‘तिच्या लग्नापासूनच. तिच्यात आणि माझ्या यजमानांच्यात तसं बरंच अंतर आहे. त्यामुळे तिच्या लग्नाचं हेच बघत होते. त्या वेळेपासूनच हिच्याबद्दल आणि हरकिशन लखानींबद्दल काहीबाही बोललं जाई. आम्हालाही दिसत होतं. रात्री उशीरापर्यंत कामाच्या नावाखाली ऑफिसात थांबणं, पार्ट्या, टूर्स, सगळं चालूच होतं. तरी आम्ही थोडंसं दुर्लक्ष करून हिच्यासाठी स्थळ शोधलं. किशोर नावाचा मुलगा होता. चांगली नोकरी होती. एक मुंबईत आणि एक गावाकडे अशी दोन घरं होती. साखरपुडाही ठरला होता. आदल्या दिवशी ऑफिसात गेलो ती परतलीच नाही. नंतर थेट लग्न ठरल्याचं कार्ड. तेव्हापासून आम्ही तिच्याशी बोलतच नाही आणि मग सहा महिन्यांपूर्वी ते विम्याचं पत्र आलं. आम्हाला न विचारताच. आमच्या कुटुंबाला एक शापच होती. मेली तीसुद्धा स्वत:च्या भावाला अडकवून.’’
‘‘बरं. तुमचा कोणावर संशय?’’
‘‘हरकिशन लखानी. तोच. आधी सुनंदासाठी आपल्या पहिल्या बायकोला मारलं. आता आणखी कोणासाठी हिचा जीव घेतला. यामागे त्याचाच हात असणार देवदत्तसाहेब.’’
‘‘बरं. या आता तुम्ही मी उद्या खंडाळ्याला जाणारच आहे. मी तुम्हाला नंतर कळवीनच. बरं जाताना आमच्या दाजींकडे तुमचा पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक देऊन ठेवा.’’

सहा तारखेला दुपारी
आम्ही तावड्यांच्या घरी चहा पित बसलो होतो. ‘‘आता सर्व गोष्टी तपशीलवार सांगा तावडे.’’ देवदत्त म्हणाला. ‘‘आज तुम्ही खूनाची जागा पाहिलीतच देवदत्त. घटनास्थळी सर्वप्रथम लखानींची मोलकरीण पोहोचली. रखमा नाव तिचं. त्यावेळी घरात रखमा आणि सुनंदाबाई दोघीच होत्या. त्यांचा केअरटेकर गोवंडे त्या रात्री नेमका सिनेमाला गेला होता आणि त्यांचा ड्रायव्हर रजेवर होता. खंडाळ्याला एवढीच नोकर माणसं आहेत.
रात्री साधारणत: अकराच्या सुमारास रखमा तिच्या खोलीत झोपली होती. एवढ्यात तिला सुनंदाबाईंच्या ओरडण्याचा आवाज आला. म्हणून ती पटकन उठून पळाली. आवाज स्वयंपाकघराच्या दिशेने आला होता. बाई कुणाला तरी विनवत होत्या की तुला हवे तेवढे पैसे देईन पण मला मारू नकोस. रखमाने हेच शब्द ऐकले आणि बाई पुन्हा किंचाळल्या. रखमा खोलीच्या दारात पोहोचली तेव्हा बाई रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. तिने एका पुरुषाला मागच्या मोरीच्या दरवाजाने पळताना पाहिले. ती परत बाईंच्या जवळ आली. पण तोपर्यंत प्राण गेलेला होता. दहा मिनिटातच गोवंडे तिथे पोहचला. त्याने कुंपणावरून एकाला उडी मारून जातान पाहिले होते. त्यानेच आम्हाला कळवले. दीड वाजता आम्ही तिथे हजर होतो.’’
‘‘मृत्यूची वेळ आपण अकरा धरू. काय सूर्या?’’ देवदत्त.
‘‘मग बारला संपलेल्या सिनेमानंतर गोवंडे दहा मिनिटात कसा घरी पोहोचला?’’ देवदत्त.
‘‘सिनेमा थिएटर जवळच आहे. आम्ही तिकट कंफर्म केलं. आणि रखमाची वेळेची यादी पक्की नव्हती. मृत्यूची वेळ बाराच्या जवळपाससुद्धा असू शकेल.’’ तावडे म्हणाले. देवदत्त यावर काहीच बोलला नाही.
‘‘आणि हत्यार तावडे?’’. आपल्या समाधीतून बाहेर येत देवदत्तने पुन्हा विचारले.
‘‘स्वयंपाकघरात वाप
रण्याची सुरी. प्रेताच्या जवळच पडली होती. पण त्या घरातील नव्हती. रखमा आणि गोवंडे दोघांनी हाच जबाब दिला. बोटांचे कोणतेही ठसे नाहीत. पावलांचे ठसे मिळाले. बॉडी पडलेल्या ठिकाणापासून मोरीच्या दारापर्यंत दोन प्रकाराचे आणि बाहेर एकाच प्रकारचे. फक्त आतील ठसे रखमाच्या पायांशी जुळले. बाहेरील पुरुषाचे असावेत असे बुटांच्या ठेवणीवरून वाटते. रखमाचे उघड्या तळव्यांचे दुसर्‍या ठशांच्या वर उमटले होते.’’
‘‘गुड. आणखी काही?’’
‘‘एक लॉकेट मिळालं. अर्ध्या हृदयाचं. कुणाचं आहे त्याचा तपास लागला नाही.’’
‘‘मनसुख दलालला तुम्ही पकडलंच आहे. काय वाटतं त्याच्याबद्दल?’’
‘‘चौकशीसाठी धरलंय. सोडून देऊ. काही तरी त्याचं इथं लफडं आहे. पण या केसशी त्याचा संबंध नाही.’’
‘‘खरंय’’, हसून देवदत्त म्हणाला, ‘‘पण मी तुम्हाला अधिक सांगू शकत नाही. बरं इतर कोणी संशयित?’’
‘‘किशोर विरानी.’’ तावड्यांनी एक फोटो समोर टाकला. ‘‘सुनंदाबाईंशी लग्न ठरलं होतं. नंतर जमलंच नाही. काही महिन्यांपूर्वी शेअरमार्केटमध्ये बुडाला. नंतर एक-दोनदा फोन करून बाईंकडे पैसे मागितले होते. एकदा लखानींनी त्याला गुंडाकरवी ठोकलाही होता. त्याने खूनाची धमकी दिली होती. मुंबईत आहे. आमचं लक्ष आहे. वाटलं तर धरू.’’
‘‘अजून कोणी?’’
‘‘नेत्रा लखानी. बाईंची सावत्र मुलगी. 3 ऑगस्ट दुपारी इथे आली होती. बाईंशी भांडण झालं. तिच्या प्रियकरावरून. नंतर परत गेली. रात्री तिच्या प्रियकरासोबतच होती.’’
‘‘आणि ती पैसेही मागणार नाही. रखमाबाईंनी पैशाचा स्पष्ट उल्लेख केला होता.’’ मी म्हटलं.
‘‘आणि हरकिशनभाईंचं काय? त्यांच्या पहिल्या बायकोच्या मृत्यूबद्दल बर्‍याच वावड्या आहेत.’’ देवदत्तने
विचारले.
‘‘हो. पण त्यांच्याविरुद्ध पुरावा गोळा करणं कठीण आहे. मागच्या वेळचा अनुभव आहेच. पण यावेळी तसे वाटत नाही. त्यांना खरोखरच धक्का बसल्याचं जाणवत होतं.’’ तावड्यांनी त्यांचं मत दिलं.
‘‘बरं हा चोरी-दरोडेखोरीचा प्रकार असण्याची शक्यता किती? काही वस्तू गहाळ आहेत का?’’ देवदत्त.
‘‘बाईंच्या गळ्यातील रत्नहार सोडल्यास काहीच नाही.’’ तावडे.
‘‘म्हणजे सध्या किशोर हाच प्रमुख संशयित आहे तर. पण खरा खुनी कोण ते शोधल्याशिवाय मनसुख दलाल खुनी नाही, हे निर्विवादपणे सिद्ध होत नाही. त्यामुळे खुनी शोधणं या देवदत्तला भाग आहे.’’
रात्री आम्ही हॉटेलमध्ये याच प्रकरणाचा विचार करत होतो. मी शवाची पुन्हा तपासणी केली होती. हत्यारही पाहिलं होतं. रिपोर्ट्‌स सर्व बरोबर होते. तरीही मला काहीतरी खुपत होतं. मी पडल्यापडल्याच ही बाब देवदत्तला बोलून दाखवली. ‘‘म्हणजे तुला काही शंका आहेत?’’, देवदत्तने ताडकन उठत विचारलं.
‘‘म्हणजे काही फार नाहीत. असं बघ. हत्यारावर काही खुणा नाहीत. पण हातमोजे वापरल्याचं मला वाटत नाही. खुणा नंतर पुसलेल्या आहेत. त्यासाठी काही ऍसिटोनसारखं वापरल्यासारखं वाटलं. म्हणजे बघ.
सुर्‍याची मूठ प्लॅस्टिकची आहे. ती मला काही ठिकाणी खराब झाल्यासारखी वाटली. हे केमिकल्समुळे होतं दुसरं अतिशय महत्त्वाचं. शरीरावर तीन वार झाले. पोटाच्या भागात. पण मला एकही प्राणघातक वाटला नाही. माझ्या मते बाईंचा मृत्यू हा अतिरिक्त रक्तस्त्रावाने झाला.’’
‘‘म्हणजे खूनी नवखा आहे सूर्या. बहुधा स्त्री. पुरुषाचे घाव जास्त खोल जातील. म्हणजे नेत्राला सोडून चालणार नाही. पण रखमाच्या मते बाई लगेच मरण पावल्या होत्या.’’ देवदत्त.
‘‘कदाचित बेशुद्ध झाल्या असतील. नंतर गोवंडे येईपर्यंत जीव गेला असेल.’’ मी.
‘‘शक्य आहे. पण आता आपण उद्या विचार करू. उद्याला खूप कामं आहेत.’’

दुसर्‍या दिवशी तावडे सकाळी चहालाच हजर होत. ‘‘देवदत्त, न्यूज! किशोरच्या घराची आम्ही झडती घ्यायला सांगितले होते. 3 तारखेचे सिंहगडने पुण्याला गेल्याचे एक तिकिट सापडले. आम्ही लवकरच त्याला धरू.’’ तावडे चांगलेच उत्तेजित झाले होते.
‘‘उत्तम तावडे. एक दिशा मिळाली आणि सुलाख्यांकडेसुद्धा तुमच्यासाठी न्यूज आहे. खून हा सराईत व्यक्तीने केलेला नाही. खूनी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या फारशी सक्षम नसावी. एखादी स्त्री असण्याची शक्यता जास्त. किशोर जर खूनी असेल तर कोणी तरी स्त्रीसुद्धा सहभागी आहे. तिला शोधता आले तर बरीच कोडी सुटतील. बरं, एक अजून काम करा माझं. जरा रखमा आणि गोवंडे या दोघांच्याही मागे एक हवालदार लावा. त्यांची काय लफडी आहेत काय त्याची माहिती घ्या. काय आहे, यांची माहिती जरा मिळाली तर आपल्याला खूनाविषयी अजून डिटेल्स कळतील.’’
‘‘सूर्या, आज तू बंगल्यावर येणार का? काल तुझा दिवस शवागारातच गेला. आज तिथे हरकिशनदास आणि नेत्रा दोघेही असतील.’’
बंगल्याच्या दाराशीच नेत्रा लखानी भेटल्या. त्यांना दु:ख झाल्याचं अजिबात दिसत नव्हतं. त्यांच्याशी आमचं जुजबी बोलणंच झालं. तीन तारखेला दुपारी आल्याचं त्यांनी कबूल केलं. हरकिशनभाईंशी त्यांचे काही काम होते. चार तारखेला त्या बेंगळूरास जाणार असल्याने त्यांनी काही कागदपत्रे खंडाळ्यास गोवंडेंच्या हवाली करावी असा विचार केला होता. पण सुनंदाबाई भेटल्या आणि भांडण झालं. रात्री अंशुलबरोबर असल्याचे त्यांनी मान्य केलं. कदाचित वडिलांशी सर्वच बाबतीत स्पष्ट बोलणं झालं असावं.

हरकिशनभाईंशी फार काही बोलण्यासारखं नव्हतं. किशोरचे फोन साधारण किती महिन्यांपूर्वी आले हेच देवदत्तने विचारलं. त्यांच्या आठवणीप्रमाणे हे सर्व प्रकरण साधारणत: दोन महिन्यांपूर्वीचं होतं. त्यावेळी त्याने पाच-सात वेळा फोन करून त्रास दिला होता. पोलीस कंप्लेंट करून जरा हिसका दाखवल्यावर हे प्रकार थांबले होते.

नंतर देवदत्तने आपल्या शबनममधून टेप काढून अंतरे मोजण्यास सुरुवात केली. त्याने स्वयंपाकघर ते बेडरूम, नोकरांच्या खोल्या अशा अनेक चकरा मारल्या. भिंग घेऊन खुनी ज्या दाराने पळाला त्याची पाहणी केली. चांगले दोन तास घालवल्यावर त्यांचं समाधान झालं. निघताना त्याला अचानक काय आठवलं काय माहीत. त्याने एकदम रखमाला बोलावलं.
‘‘रखमा, बाई नेमकं काय ओरडत होत्या ते पुन्हा एकदा सांगशील?’’
‘‘नको, नको. मला मारू नकोस. हवे तेवढे पैसे घे पण मला सोड.’’ असं म्हणाल्या बाईसाहेब.
‘‘किती वेळा?’’ देवदत्त
‘‘एकदाच आणि मग किंकाळी ऐकू आली.’’ रखमा.
‘‘बरं जा तुम्ही आता.’’ देवदत्त म्हणाला आणि काही न बोलता एकदम निघाला. जेवायच्या वेळी आम्ही लॉजवर परत आलो होतो. दुपारी जेवणानंतर गोवंडे आले होते. थोहा माल आणि थोडा धाक दाखवल्यावर बोलायला लागले. त्यांनी किशोरची वेगळीच माहिती सांगितली. ही भानगड साधारण दोन महिन्यांपूर्वी उपटली होती. किशोरला धडा शिकवायचा प्रयत्न हरकिशनभाईंनी केला होता, पण ते परदेशी गेल्यावर सुनंदाबाई किशोरला दोन-तीनदा भेटल्या होत्या. त्यांनी त्याला काही पैसेही दिले असे गोवंडेचे म्हणणे होते.

काही महिन्यांपूर्वी का कोण जाणे बाईंना उपरती झाली होती. कदाचित हरकिशनभाईंच्या वाढत्या वयामुळे त्यांच्यात वितुष्ट आले असेल. त्यांचे एखादे लफडे असण्याचीही शक्यता होती. या सर्वांमुळे बाई जराशा वैतागलेल्या असत. ते विम्याचे प्रकरणसुद्धा यामुळेच असावे असे गोवंडेंचे मत होते, पण किशोरच्या बाबतीत काही वेगळा प्रकार असावा असे त्यांना वाटत होते. किशोर एकदा घरी आला होता तेव्हा त्यांनी अर्ध्या बदामाचे लॉकेट पाहिल्यासारखेसुद्धा त्यांना वाटत होते.

देवदत्तने त्यांना रखमाबद्दलही विचारलं. त्यांचं मत फारसं चांगलं नव्हतं. ती सतत छोट्या-मोठ्या उचल्या करीत असे, असा त्यांचा संशय होता. तिच्या कामाविषयीसुद्धा ते फार खूश नव्हते. पण या प्रकरणाबद्दल संशय घेण्यासारखं त्यांना काही वाटत नव्हतं. त्यांच्या मदतीबद्दल पुन्हा एकदा ‘विशेष धन्यवाद’ देऊन देवदत्तने त्यांची बोळवण केली.

‘‘आपलं इथलं काम संपलंय.’’ गोवंडे गेल्यावर एकदम देवदत्तने जाहीर केलं. लगोलग त्याने तावड्यांना फोन लावला. अर्धा तास बोलल्यानंतर भेटूनही आला. आल्याआल्या काही न बोलता सामान आवरायला घेतलं. आम्ही संध्याकाळी मुंबईच्या वाटेवर होतो. जाताना त्याने पुन्हा एकदा तावड्यांना फोन केला. दुसर्‍या दिवशी मुंबईस येण्याचं निमंत्रण केलं. ‘‘येताना जरा रखमा आणि गोवंडेंना आणा आणि त्या किशोरलाही बोलावणं धाडा.’’
आठ तारखेस सकाळीच उठून देवदत्त बँकेत गेला. तिथून पोलीस स्टेशनलाही गेला. संध्याकाळच्या कार्यक्रमाची जोरदार तयारी चालली होती. मी संध्याकाळी जरासा आधीच पोहोचलो. माझ्या पाठोपाठच एक अतिशय सामान्य दिसणारा असा साधारण चाळीस-बेचाळीस वर्षांचा माणूस आत आला. त्याचे डोळे खोल गेले होते आणि डोळ्यांखालील काळी वर्तुळसुद्धा दिसत होती. तो किशोर होता हे मी त्याला पाहताच ओळखलं. थोड्याच वेळात तावडेसुद्धा पोहोचले.

‘‘थोडा वेळ थांबा सर्वजण. आमचे क्लायंट येऊ देत.’’ देवदत्तबाहेर येत सर्वांना म्हणाला. इतक्यात श्री. मनसुख आणि निशा दलालही तिथे हजर झाले.
‘‘आता तरी सांगा देवदत्त कोणी खून केला ते?’’ तावडे म्हणाले.
‘‘सांगतो. पण त्यापूर्वी रखमाबाई जरा त्या रात्री काय घडलं ते पुन्हा एकदा तपशीलवार सांगा बरं. तसं मी बजाकडून माहीत करून घेतलंय. पण तुम्ही सर्वांना तुमच्या जबानीत सांगा.’’ देवदत्त.
बजाचं नाव निघताच रखमाचा धीर सुटला. ‘‘मी गुन्हा कबूल करते साहेब. बाईंचा खून मीच केला.’’ सर्वचजण अवाक् झाले.
‘‘असं नाही बाई. तपशीलवार सांगा.’’ देवदत्तने फर्मावलं.
‘‘बाईंचं या साहेबांसोबत लफड होतं साहेब. बाईंनी यांना पैसेही दिले होते. एक-दोनदा मीच हे काम केलं होतं. मग मलाही पैशाची हाव सुटली. मी बाईंकडून वेळोवेळी पैैसे उकळायला लागले. त्याच सुमारास माझी बजाशी ओळख झाली. मग आम्ही एकदाच मोठा डल्ला मारायचं ठरवलं. पण बाई राजी होत नव्हत्या. त्या दिवशी इतर कोणीही घरी नव्हतं. गोवंडेंनीही सिनेमाचा कार्यक्रम आखला होता. आम्ही तीच रात्र ठरवली. बजा अकरा वाजता येणार होता. मी त्यापूर्वी बाईंशी पुन्हा एकदा बोलले. त्यांनी नकार दिला. मी बजानं दिलेली सुरी घेऊन त्यांना धाक दाखवण्याचा प्रयत्न केला. पण त्या बधल्या नाहीत. शब्दाने शब्द वाढला आणि मी त्यांच्यावर वार केला. तेवढ्यात बजा पोहचला. मग त्यानेच हा सर्व दिखावा रचला. ते अर्ध्या हृदयाचं लॉकेटही त्याचंच.’’ रखमा पूर्ण तुटली होती.
‘‘घ्या तावडे तुमचा गुन्हेगार.’’ देवदत्त म्हणाला. ‘‘बजाला पुणे पोलिसांनी आधीच ताब्यात घेतलं आहे.’’
‘‘काय ट्रिक होती देवदत्त?’’ सर्वजण गेल्यावर मी विचारले.
‘‘सगळ्यात महत्त्वाचा क्लू तूच तर दिलास. खुनी व्यक्ती स्त्री असावी, हे तुझं मत माझ्यासाठी फारच महत्त्वाचं ठरलं. तुला आठवतं पहिल्याच भेटीत मी तावडेंना वेळामधील गोंधळाबद्दल बोललो होतो. कुठल्याही कामाला लागणारा वेळ हा या तपासात महत्त्वाचा मुद्दा ठरला.’’ देवदत्त.
‘‘समजावून सांग जरा. काहीच कळत नाही.’’ मी पुन्हा विचारलं.
‘‘पहिल्या प्रथम मी जी गोष्ट पाहिली ती म्हणजे रखमाची खोली आणि स्वयंपाकघरातील अंतर. पहिली किंकाळी ऐकल्याबरोबर रखमा लगेच धावली. ती अर्ध्या मिनिटाच्या आत घटनास्थळी पोहचली पाहिजे, पण सुनंदाबाई एक मोठं वाक्य मध्ये बोलल्या. नंतर अजून एकदा किंकाळीचा आवाज आणि मग खून. या सर्वासाठी खूप जास्त वेळ लागतो. खून्याचे एकूण तीन वार केले याचाही विचार कर.’’
‘‘याचा अर्थ रखमाची जबानी खोटी होती.’’
‘‘बरोबर सूर्या. पुढची गोष्ट म्हणजे मृत्यूचं कारण. जर अतिरक्तस्राव हे कारण असेल तर तो गोवंडे येण्याच्या आधी दहा मिनिटे शक्य नाही. किमान साडेअकराला खून झाला. गोवंडेनी एक पुरुष पळून जाताना पाहिला, तो बजा होता. रखमाच्या आताच्या जबानीप्रमाणे खून झाल्यानंतर बजा तसा लगेच पोहचला होता. सर्व रचना ठीक करायला त्यांना अर्धा तास लागला असणं शक्य आहे.’’
‘‘या पुढचं काम सोपं होतं. रखमाच्या मागे माणूस लावलाच होता नंतर बजामागेही लावला. बजा एका झेरॉक्सच्या दुकानात कामाला होता. तिथूनच त्याने टोनर केमिकल मिळवलं ज्याने सूरीची मूठ साफ करण्यात आली. खून झाला चुकून, पण बजा पूर्ण तयारीत होता. खूनाचं कारण कळणे आवश्यक होतं. गोवंडेंच्या साक्षीनंतर मी किशोरच्या मागे लागलो. त्यातून मला त्याचे सुंनदाबाईंशी असलेले संबंध तपशीलवार कळले. रखमाचा संबंधही लक्षात आला. बाकी रत्नहार आणि ते अर्ध्या बदामाचे लॉकेट म्हणजे दिशाभूल करण्याचा प्रयत्न होता. मग काय बजाला पकडलं आणि पुढे तू पाहिलंसच. रत्नहारही त्याच्याकडेच मिळाला.’’
‘‘म्हणजे देवदत्तच्या यादीत अजून एका केसची भर’’, मी म्हटलं. ‘‘वाईट त्या किशोरचं वाटतं. एकदा हरकिशनभाई आणि आता रखमामुळे सुनंदा त्याला दुरावली आणि दोन्ही वेळा पैसाच कारण ठरला.’’

हर्षल
भ्रमणध्वनी : 97699 23922

पोतराज

दुपारची वेळ होती. उन्ह डोक्यावरून पुढं सरकली होती. उन्हाच्या तडाख्यामुळे रस्त्यावरील वर्दळ कमी दिसत होती. चार-सहा पोरं झाडाखाली खेळत होती. गुरुजी सकाळी नऊपर्यंत पूजा आटोपून शाळेकडे निघत असत. शाळेचे नवीन बांधकाम बघून दुपारी बारापर्यंत गुरुजी घरी परतत असत. आज साडेबारा झाले तरी गुरुजी परतले नव्हते. शाळेचे नवीन बांधकाम चालू केल्यापासून गुरुजींचा कामाचा ताण वाढला होता. प्रामाणिक व निष्ठेने काम करणारे मुख्याध्यापक म्हणून गुरुजींचा लौकिक होता. शाळेत गरीब व मध्यमवर्गीय मुलांची संख्या अधिक होती. घड्याळाचा एकचा ठोका कानी पडताच रमाकाकूंची चिंता वाढली. दारात उभ्या राहून कंटाळलेल्या रमाकाकू आता आत-बाहेर करू लागल्या. थोड्या वेळानंतर अस्वस्थ होऊन त्या झोपाळ्यावर जाऊन बसल्या.

गुरुजींची वाट पाहत. त्या जुन्या आठवणीत हरवून गेल्या. रमाकाकू व गुरुजींच्या लग्नाला पंचवीस वर्षे पूर्ण झाली होती. तो प्रसंग त्यांना आठवला. लग्नाला पंचवीस वर्षे पूर्ण झाली म्हणून आई-बाबा आणि दादाही आले होते. गुरुजींचे वडील लहानपणीच वारले होेते. सासूबाई थकल्या होत्या त्या गावाकडेच भाऊजींबरोबर राहत होत्या. त्या आपल्या बहिणीला घेऊन गावाकडून आल्या होत्या. चार दिवस अगदी हसत खेळत गेले. होम-हवनाचा कार्यक्रम झाला. रमाकाकू व गुरुजींनी आपल्याला अपत्य नाही म्हणून कधी नाराजी व्यक्त केली नाही. शाळेतील मुलंच आपली मुलं, असं ते वागत असत. गुरुजींनी व काकूंनी या निमित्ताने शालेतील गरीब पंचवीस विद्यार्थ्यांना जेवण दिले. गुरुजी स्वत: वाढावयास उभे राहिले होते. सगळं अगदी शिस्तबद्धरीतीने पार पडलं होतं. दादा जाताना म्हणाला रमाबाई तुझा नवरा म्हणजे ‘रेल्वेचं टाईमटेबल आहे.’’ बरं का! सर्व गोष्टींची आठवण होऊन रमाकाकू मनातल्या मनात हसल्या. हे सर्व जरी खरं असले तरी आज गुरुजींची गाडी लेट झाली होती हे मात्र खरं!

गुरुजींचं घर आणि शाळा तसं पंधरा-वीस मिनिटांच्या अंतरावर होतं. गुरुजी शाळेतून वेळेवर निघाले होते. शाळेतून निघाल्यावर उजवीकडील वळणावर बांधकाम खात्याची वसाहत होती. त्यापुढे नवीन पोलीसलाईन होती. त्यापुढे कोर्टातील कर्मचार्‍यांची घरे होती. त्याच्या जवळच मारुतीचं एक मंदिर व मोकळी जागा होती. पुढे लागून प्राध्यापकांची घ
रे होती. गुरुजींचं घर तिथंच होतं.

गुरुजींना आज मारुती मंदिराजवळ मोठी गर्दी दिसली. सर्व लोक गोलाकार उभे होते. मधल्या जागेतून गुबूऽऽ गुबूऽऽ गुबूऽऽ, असा ढोलकीचा आवाज येत होता. काय आहे ते पाहावे म्हणून गुरुजी तेथे थांबले. गर्दीच्या मधोमध पोतराज दोन्ही पायांवर लयबद्ध नाचत उभा होता. बर्‍याच वर्षांनंतर पोतराजाचं रूप पाहावयास मिळाले म्हणून गुरुजी थांबले. ते पोतराजासमोर येऊन उभे राहिले. पोतराज तरुण, पोरसवदा दिसत होता. रंगाने काळासावळा होता. साडेपाच फूट उंचीचा त्याचा बांधा मजबूत होता. डोक्यावर काळेभोर केस खांद्यापर्यंत लाब होते. केसांना भरपूर तेल लावलेले होते व मधून भांग पाडला होता. तोंडाला तेल लावून शेंदूर फासला होता. त्यामुळे त्याचे खरे रूप दिसत नव्हते. कपाळावर लाल कुंकवाचा रुपायाच्या आकाराचा टिळा लावलेला दिसत होता. गळ्यात चार-पाच काळ्या दोराचे गंडे बांधले होते. उजव्या दंडावर कवड्याची माळ घट्ट आवळून बांधलेली होती. दोन्ही हातात मनगटावर मोठाले पितळी कंडे होते. खण-पातळाच्या पाच-सात पदराच्या घड्या एका वर एक फ्रॉकसारख्या शिवलेल्या त्याने कमरेला घट्ट बांधलेल्या होत्या. त्याची लांबी स्कर्टसारखी गुडघ्यापर्यंत होती. त्याच्या पायात पितळी तोडे होते. याशिवाय पोतराजाचं संपूर्ण शरीर उघडं-बोडकं दिसत होतं. अंगा-खांद्यावर उन्हाचा तडाखा बसत होता. त्याच्या पाठीवर, छातीवर दोन्ही हातावर घामाच्या धारा वाहत होत्या. मोकळ्या पायांना
वरून उन्हाचे व खालून जमिनीचे चटके बसत होते. पायावर मोठाले फोड आलेले दिसत होते. त्याच्या उजव्या हातामध्ये चाबूक होता. भान विसरून, सर्व सहन करीत. मरीआईचा हा पुजारी अशा स्थितीतही धरती मातेवर नाचत होता. मरीआईची शक्तीच त्याच्या पाठीशी उभी राहत असावी, असं गुरुजींना वाटलं.

गुरुजींनी बर्‍याच वर्षांनी दिसणारे पोतराजाचे हे काळेसावळे रूप डोळे भरून न्याहाळले. लोकांची गर्दी वाढली होती. काही जण छत्री घेऊन उभे होते. काही जणांनी ऊन लागू नये म्हणून डोक्यावर पेपर पकडला होता. तर काही डोक्याला रुमाल बांधून उभे होते. प्रत्येकजण आपल्याला सांभाळत होता. पोतराज तेवढा मुक्त होता. त्याला कशाचाच आधार नव्हता. मरीआईचं त्याची आई असावी. तीच त्याला सांभाळत असावी.

पोतराजासमोर एक वृद्ध स्त्री बसली होती. तिचं संपूर्ण डोकं पांढर्‍या जाळ्यांनी विणल्यासारखं दिसत होतं. अंगावर ढिगळं लावलेलं पातळ दिसत होतं. तिचं शरीर थकलेलं दिसत होतं. चेहरा भकास दिसत होता. डोळे खोलवर गेलेले होते. गालफाड आत गेलेली होती. तिचे दोन्ही हात चिपाडासारखे दिसत होते. तिच्यासमोर परडी होती. परडीमध्ये मरीआईची सहा-सात इंचाची पितळी मूर्ती होती. मूर्तीसमोर दोन टाक परडीमध्ये ठेवलेले दिसत होते. मूर्ती आणि दोन्ही टाकापुढे कुंकू-हळद पसरलेली होती. आशाळभूत नजरेनं ती सर्वत्र पाहत असलेलं जाणवत होतं. गुरुजी आपल्या नजरेत हे सर्व साठवत होते. ही बाई कोण असावी बरं? गुरुजींनी स्वत:लाच विचारलं.

तेवढ्यात ‘मरीआईचं चांगभलं!’ ‘मरीआईचं चांगभलं!’चा आवाज पोतराजाच्या तोंडून निघाला व तो स्वत:भोवती फिरू लागला. फिरता फिरता त्याने अंगावर चाबकाचे फटके मारून घ्यावयास सुरुवात केली. सप! सप! चाबकाच्या काड! काड! फटक्यांचा आवाज सर्वत्र घुमू लागला. उभ्या असलेल्या मुलांच्या तोंडून आई गं! बाप रे! चे आवाज निघाले. काही मुलांनी तोंडावर हात ठेवला तर काहींनी डोळे झाकून घेतले होते. एक छत्रीधारी उभा असलेला माणूस उद्गारला काही नाही हो, उगाच आवाज काढतात लेकाच, अंगाला काही लागत नाही त्यांच्या.

डोक्याला रुमाल बांधून उभा असलेल्याने री ओढली, ‘अहो पैसा मिळविण्याचा धंदा आहे यांचा.’ तिसरा कुणाला तरी सांगत होता, ‘अहो हे खेळ करतात आणि गर्दीत यांचीच माणसं पाकिटं मारायला उभी असतात. बघा कसा धट्टाकट्टा आहे तो.’ गुरुजी सर्व काही पाहत होते, ऐकत होते. बारा-चौदा वर्षांची निरागस मुलं हा खेळ पाहण्यास उभी होती. पोतराज त्यांचा कोणीही नव्हता. तरीदेखील त्याच्या अंगावर बसणार्‍या चाबकाच्या फटक्याने ही सर्व मुलं व्यथित झाली होती. पोतराजाचं उघड्या अंगावर चाबकाने मारून घेणं मुलांना अस्वस्थ करीत होतं. मनुष्याची दृष्टता, कठोरता पाहून गुरुजींना वाईट वाटलं. हे सर्व चालू असतानाच ती बाई उठून सर्वांसमोर परडी फिरवीत हात जोडून फिरत होती. गर्दीमध्ये डोळे अधिक दिसत होते, परंतु परडीकडे हात मात्र फारच कमी लोकांचे वळत होते. पोतराजाने पुन्हा एकदा ‘मरीआईचं चांगभलं!’ची आरोळी ठोकली आणि तो पुन्हा स्वत:भोवती फिरू लागला.
पोतराज मध्येच थांबला तसा चाबकांच्या फटक्यांच्या आवाजाला सुरुवात झाली. एक-दोन-तीन-चार फटक्यांचा पाऊस त्यांच्या शरीरावर पडत होता. पोतराजाच्या शरीरावर पडणार्‍या चाबकाच्या फटक्यांच्या संख्येवर परडीत पडणार्‍या हातांची संख्या अवलंबून असावी असा विचित्र विचार गुरुजींच्या मनात चमकून गेला.

पोतराजाचा, मनाला अस्वस्थ करणारा प्रकार, मरीआईची मूर्ती परडीत ठेवून लाचार मनाने फिरणारी स्त्री आणि बघ्या माणसांचे पोतराजाबद्दलचे मनाला टोचणारे शब्द या सर्वच गोष्टींनी गुरुजींच्या मनाची घालमेल वाढली. तेवढ्यात गर्दीमध्ये एकच गोंधळ उडाला, गुरुजींनी पाहिले पोतराजाने आपला चाबूक टाकून दिला होता. तो उजव्या हाताने डावा दंड दाबून धरत खाली बसत होता. चाबकाचा फटका त्याला वर्मी बसला होता. ती बाई परडी घेऊन वेगाने धावत त्याच्याजवळ आली. तिनं चिमूटभर हळद परडीतून घेऊन त्यांच्या दंडावर भरली. आपल्या फाटक्या लुगड्याची चिंधी तिनं घट्ट आवळून त्याच्या दंडावर बांधली.

हा प्रकार चालू असताना बघ्यांची गर्दी पांगली होती. त्यांचे काम संपले होते. जो तो आपल्या कामाला निघून जात होता. काही तुरळक माणसं जवळ येत होती. परडीत चार-आठ आणे टाकून पुढे सरकत होती. गुरुजींनी खिशात हात घातला. हाताला पाच रुपयांची नोट लागली. त्यांनी वाकून त्या माऊलीच्या परडीत ती नोट ठेवली. परडीत पडलेली पाच रुपयांची नोट पाहून पोतराजाने वर पाहिले. गुरुजी परत निघाले होते. पोतराजाने गुरुजींना ओळखले. ‘‘गुरुजी!’’ म्हणून त्याने हाक मारली. गुरुजी हाक ऐकून चपापले. कोण म्हणून त्यांनी मागे वळून पाहिले. गुरुजी, मी भिकाजी कुंभार! भिका आपल्या शाळेचा विद्यार्थी. असे भिकाजी तू...’’

भिकाजी सांगू लागला. गुरुजी, शाळेनंतर वर्ष-दीड वर्षे नोकरीच्या शोधात फिरत होतो. नोकरी कुणी देत नव्हतं. चुरमुरे फुटाणे खाऊन दिवस जात होते. माझं ठीक, पण आईकडे पाहावतं नव्हतं. ती दिवस दिवसभर भूकेने व्याकूळ होऊन पडून राहत होती. अशाही परिस्थितीत आई म्हणायची भिकू वेडंवाकडं कोणतंही काम करून पैसे मिळवू नको. मरिआई जे देईल ते खाऊ बाबा. एक दिवस ठरवलं, माझा बाप पोतराज होता. त्याला जाऊन दोन वर्ष झाली होती. आईनं त्या सार्‍या वस्तू व परडी कापडात बांधून ठेवल्या होत्या. त्या कापडातील सार्‍या वस्तू मी बाहेर काढल्या, अंगावर चढवल्या आणि आई समोर येऊन उभा राहिलो. आई मनातून चमकली होती. तिनं थोडा वेळ मला डोळे भरून बघितलं आणि तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं.

काही दिवस मी जवळपास गल्लीत पोतराज म्हणून फिरलो आणि नंतर बाहेर पडलो. ही माझी आई आहे गुरुजी, असं म्हणून भिकाजीनं त्या वृद्ध स्त्रीच्या खांद्यावर हात ठेवला. त्या स्त्रीनं भिकाजीला पुढं काही बोलू दिलं नाही. तिनं दोन्ही हात जोडले व ती बोलू लागली, ‘‘गुरुजी याचा बाप पोतराज होता. दोन वरीस झालं तो मेला. बारा-पंधरा वरीस मी त्याच्या संग फिरले. हाता-पायावर त्याच्या गोळे आले होते. पाठ चाबकाच्या फटक्यांनी गुरावानी झाली होती. पोट पाठीला लागलं होतं. उसन्या बळांनी तो नाचत होता. गुरुजी याचा बाप आता मेला, मी तर त्याच्या संग रोज मरत होतो. याचा बाप असतानाही मी रोज मेले, आता या पोरासंग पण मी रोज अशीच मरत आहे गुरुजी. मला यातून सोडवा हो. आता हे सारं बघवत नाही हो गुरुजी मला. आम्हाला यातून सोडवा नाही तर एक दिस मी याला घेऊन जीव देऊन मोकळी होईन.’’ असे म्हणत त्या स्त्रीनं हंबरडा फोडला व गुरुजींच्या पायावर डोकं टेकलं.

त्या स्त्रीचं हे बोलणं गुरुजींना अनपेक्षित होतं. गुरुजी गोंधळून गेले. त्या स्त्रीचं बोलणं गुरुजींच्या हृदयात घुसलं होतं. तिचे बोल गुरुजींच्या जिव्हारी लागले होते. एक कटू सत्य त्या माऊलीच्या तोंडावाटे बाहेर पडले होते. माणसाने माणसाची काय दशा केली आहे याचा प्रत्यय गुरुजींना येत होता. गुरुजींनी आपले पाय मागे ओढले. काहीही न बोलता गुरुजींनी घराची वाट धरली. त्यांचे पाय जड झाले होते. गुरुजी घरी पोहोचले. त्यांचा चेहरा पाहून रमाकाकूंनी त्यांना काही विचारलं नाही. गुरुजींनी टोपी व कोट काढून खुंटीवर अडकावला. आत जाऊन त्यांनी हातपाय धुतले, देवाला नमस्कार केला व ते पाटावर बसले.

त्यांचे जेवणात लक्ष नव्हतं. रमाकाकूंच्या लक्षात हे आलं होतं. अशावेळी रमाकाकू गुरुजींना प्रश्‍न करण्याचं टाळीत असतं. गुरुजींना आहे त्या विचारात ठेवण्याकडे त्यांचे कल असे. त्यांच्या दृष्टीने हा पवित्रा योग्य आहे अशी त्यांची श्रद्धा होती. गुरुजींनी जेवण आटोपले व ते झोपाळ्यावर येऊन बसले. झोपाळा विचारांना वेग देत होता. भिकाजीच्या आईचे शब्द त्यांच्या डोक्यातून जात नव्हते. त्या स्त्रिच्या तोंडातून बाहेर पडणारे सत्य नाकारण्यास त्यांचे मन तयार नव्हते. डोळ्यासमोर घडणार्‍या घटनेचं सत्य नाकारण्याचा अधिकार त्या लोकांना कुणी दिला होता. पोतराजाच्या पाठीवर उमटलेले चाबकाचे वण, पायावरील मोठाले फोड, उघड्या बोडक्या शरीरावरून वाहणार्‍या घामाच्या धारा हे सर्व या लोकांच्या नजरेला का दिसू नये? हे सर्व खोटं तर नव्हतं. दररोज आपल्या पतीच्या आणि नंतर मुलाच्या दिवसभराच्या खेळाने ती स्त्री रोज होरपळून निघत होती. मरणयातना भोगत होती. गुरासारखा हंबरडा फोडून तिनं कटू सत्य आपल्या पुढे मांडलं होतं. हे सर्व या लोकांच्या दृष्टीला व कानाला का दिसू नये. देवाचे प्रतिक म्हणून असलेली गणपतीची मूर्ती दूध पिऊ लागली म्हटल्याबरोबर याच मंडळींनी वाटी, कप, ग्लासमध्ये दूध भरून देवळासमोर मोठाल्या रांगा लावल्या होत्या. देवाला घाम फूटला असे ऐकल्यावर पंढरीच्या देवळासमोर हीच मंडळी घाम फूटेपर्यंत उभी होती. देव-देवता काहीही मागत नसताना दही-दूधाच्या अभिषेकाकरिता शेकडोंची रांग लावणार्‍या भक्तगणांची गुरुजींना आठवण झाली. दही-दूध घेऊन देवळात जाताना देवळाबाहेर बसलेल्या आंधळ्या-पांगळ्या, रोगांनी पछाडलेले असंख्य हात वाटीभर दही-दूध मागत असताना त्यांच्या वाटीत काहीही पडत नव्हतं. वृक्षाची वाढ होत असताना झाडाच्या खोडाला काही आकार मिळाला तर तेथे कोणाला पिंड दिसू लागते तर कोणाला गणपती तर कोणाला साक्षात शंकराचा अवतार दिसू लागतो. बघता बघता शेकडो नारळ तेथे फोडले जातात. उदबत्तीचा धूर निघू लागतो. परमेश्वराचं प्रतिक असणारं परमेश्वराचं रूप या मंडळींना मान्य होतं, परंतु परमेश्वरकृपेने प्राप्त झालेला मनुष्य देह या मंडळीच्या मनाला का शिवत नसावा? यालाच भक्तांची परमेश्वरावरील श्रद्धा समजायचे काय!

पोतराजाकडे लोक त्याचा खेळ पाहण्यासाठी येत असतात. त्यांना त्यातून आनंद हवा असतो. मनुष्याचा आनंद दुसर्‍याशी एकरूप होण्यात आहे म्हणतात, आपल्या भावनांशी समरस होणारा कोणीच नसेल तर... आज भिकाजीच्या आईने हंबरडा फोडून आपल्या पायावर डोके ठेवले ते कशापायी?
घड्याळातील चारच्या ठोक्यांनी गुरुजींची विचारशृंखला थांबली. गुरुजी लगबगीनं उठले त्यांनी अंगात कोट चढविला, डोक्यावर टोपी घातली आणि पत्नी रमाला आम्ही शाळेत जाऊन येतो म्हणून ते बाहेर पडले. रमाकाकू बराच वेळ त्यांच्या जाण्याकडे डोळे लावून उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यात विश्वास होता, जणू काय घडणार आहे, याची त्यांना आधीच ओळख झाली असावी. गुरुजी शाळेत आले त्यांनी सर्व शिक्षकांना बोलावून घेतले. गुरुजींच्या अचानक बोलवण्यामुळे सर्वचजण संभ्रमात होते. गुरुजींनी दुपारची भिकाजीची हकीगत सर्व शिक्षकांना सांगितली. भिकाजीने शाळेला कब्बडीत राज्यस्तरीय पारितोषिक मिळवून दिलेले होते. जिल्ह्यातून ‘बेस्ट कॅडेट’ म्हणून त्याने शाळेचा मान वाढविला होता. सर्व शिक्षकांना याची जाणीव होती. आपल्या शाळेचा हा विद्यार्थी शाळेजवळ पोतराज म्हणून जीवन जगत आहे, सोबत त्याची वृद्ध आई दारोदर फिरत असल्याचं सांगतांना गुरुजींचा कंठ दाटून आला. आपल्या नवीन शाळेत त्याला नोकरीवर सामावून घ्यायचा प्रस्ताव मी आपल्यासमोर मांडत आहे. त्याचा निर्णय तुम्हीच घ्यावा, असे म्हणून गुरुजींनी नाकावरचा चष्मा काढून आपले डोळे रुमालाने टिपले.

थोडा वेळ सर्वत्र शांतता पसरली. प्रस्ताव घेऊन सर्वजण बाहेर पडले. त्यांनी बराच वेळ चर्चा केली. सर्वजण प्रस्ताव घेऊन गुरुजींकडे आले. गुरुजी डोळे बंद करून बसले होते. सर्वांच्या येण्याने गुरुजींनी डोळे उघडले सर्वांनी प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला. एकमताने सर्वांनी प्रस्तावास मान्यता दिली होती. भरलेल्या डोळ्यांनी गुरुजींनी सर्वांना हात जोडले. संध्याकाळची वेळ होती. रमाकाकूंनी घराची झाडलोट केली. देवाजवळ समई लावली सारं घर प्रकाशानं उजळल्यासारखं वाटत होतं. दारात गुरुजी उभे होते.

- प्र.बा. घायलोद
163/3, रेल्वे लाईन,
व्यंकटेश अपार्टमेंट, सोलापूर 413001
दूरध्वनी : 2316316

मुंबई ते अमेरिका


सन 1996 पासून वेगवेगळे कंन्सल्टंट पाठी लागले होते की बंगळुरू नाही तर डायरेक्ट अमेरिकेला जॉब देतो. कॉलेजमधले अर्धेअधिक मित्र त्याच मार्गावर होते, पण चक्क अमेरिकेत जाऊन जॉब करायचा इतके मला अमेरिकेचे आकर्षण नव्हते. कदाचित तितका उत्साह, जिद्द किंवा धाडसही नव्हते.

‘नेकलो’ कंपनी बुडीच्या मार्गावर असल्यामुळे 1998 साली ‘एल.टी.टी.एल.’ ही कंपनी जॉइन केली. तिथेसुद्ध कम्युनिकेशन ग्रुपला लोक उठसूठ फॉरेनलाच जात असत. पाच-सहा महिन्यांनी मीही अमेरिकेला काम करण्यासाठी ऍप्लिकेशन दिले. काम करण्याची परवानगी मिळालीही, पण मला मिळणारा प्रोजेक्ट बहुधा ऑफ शोअर म्हणजे भारतात चालणाराच होता. 1999 साली ‘एल.टी.’ने कहरच केला. अमेरिकेच्या आशा दाखवून बंगळुरूमधील ‘मोटोरोला’ कंपनीत कामाला धाडले. बंगळुरूमध्ये एक-दोन महिने काम काढल्यावर पुन्हा इंटरव्हू द्यायला सुरुवात केली आणि लगेचच ‘एम.बी.टी.’ची ऑफर मिळाली. बंगळुरूच्या दोन महिन्यांच्या वास्तव्यात काही नाही तर दक्षिणेकडील म्हैसूर, उटी, तिरुपती अशी प्रेक्षणीय व तीर्थस्थळे बघून घेतली.

‘एम.बी.टी.’मध्ये पहिले दोन-तीन महिने काहीच काम नव्हते, पण अचानक 1999 च्या ऑगस्ट महिन्यात लंडनला तीन महिन्यांच्या असाइन्मेंटवर जाण्याचा योग आला. थोडक्यात पहिला परदेश दौरा अमेरिकेत न होता, लंडनला झाला. पुढे 2000 साली एक वर्षभर त्याच असाइन्मेंटसाठी लंडनला राहणे झाले. लंडनमध्ये वास्तव्य असताना स्कॉटलंड, इंग्लंडमधील काही भाग, युरोपमधील काही देश फिरणे झाले. साधारणत: वर्ष-दीड वर्षांचा काळ काढल्यामुळे युके व युरोपच्या लोकांचे चालणे, बोलणे, राहणीमान, त्यांच्या समस्या यांचे आकलन झाले. तिथे असताना अमेरिकेतल्या मित्रांशी बर्‍याचदा गप्पा व्हायच्या. त्यात असे लक्षात यायचे की अमेरिका काही तरी वेगळे प्रकरण आहे.

भारतात परत आल्यावर एक-दोन वर्ष कुठे परदेशात जायचे नाही, असे सांगून टाकले होते, पण मनात एक विचार यायचा की अमेरिकेला जायचा चान्स मिळाला पाहिजे म्हणजे त्या ऐकीव गोष्टी अनुभवता येतील.

मला अमेरिकेला जायचे आहे हे आमच्या सीसी चीफला माहीत होते. म्हणून तिने एकदा बोलावले; अशी अशी असाइन्मेंट आहे, ‘‘बट यू हॅव्ह टू बी विथ ब्रिफकेस. जाशील का?’’ थोडक्यात कुटुंबाबरोबर जाता येणार नाही. लगेच नकार दिला.

माझे कंपनीत कन्फर्मेशन झाले. ठरल्याप्रमाणे प्रमोशन मिळावे म्हणून चंद्रशेखर, डॉ. द्विवेदी अशांशी बराच भांडलो. प्रमोशनची चिन्हे दिसत होती. चंद्रशेखर म्हणाला एक काम करूया, तू अमेरिकेत जाऊन दोन महिने प्रोडक्ट ट्रेनिंग घेऊन ये आणि इथे आल्यावर पुढच्या बॅचेसना ट्रेनिंग दे, म्हणजे मग तुझे प्रमोशनपण जस्टिफाइड राहील. विचार केला दोन्ही गोष्टी साध्य होत आहेत अमेरिका बघणे पण होईल आणि प्रमोशनपण! तरी एकदा अर्धांगिनीची परवानगी घेतली आणि दोन दिवसात ऑफिसला होकार कळवला. या असाइन्मेंटला माझी निवड होण्यापूर्वी तीन-चार जण क्लाइंट इटरव्ह्यूमध्ये फेल झाले होते, त्यामुळे सतत तीन दिवस सुनिल आनंदने सतत तीन दिवस आमची इंटरव्हूची तयारी करून घेतली. तयारी नाही रिहर्सलच म्हणा! प्रत्यक्ष इंटरव्ह्यूसुद्धा चांगला झाला. नेमका त्याच दिवशी माझ्याबरोबर आणखी दोन मुलींचा इंटरव्ह्यू झाला आणि आम्ही सगळेच जण त्यांना आवडलो. त्यांनी कोणाला पाठवायचे हा निर्णय कंपनीवर सोपवला. कंपनीने तो चान्स प्रिया सुतार या मुलीला द्यायचे ठरवले आणि आमच्या तोंडचा आलेला घास पळवला. अमेरिका दौरा नाही तर प्रमोशन तरी पदरात पडले. एकीकडे प्रमोशन, पण दुसरीकडे प्रमोशन नाही, म्हणून एके दिवशी अरविंद पांडेंनी मला बोलावले आणि पुढील सहा महिने तू ‘कॅनॉन’ प्राजेक्टवर काम करायचे अशी ऑर्डर काढली.

अमेरिका दौरा इतक्यात तरी आपल्या नशिबात नाही असे वाटू लागले. पाहिजे तेव्हा मिळाले तर स्ट्रगल काय करणार? ‘कॅनॉन’ प्रोजेक्टवर जवळजवळ दहा महिने सरले. मी संजयला मध्ये मध्ये हिंट देत होतो की माझ्यासाठी काही बघा. पण काही होईल अशी चिन्ह नव्हती. 11 मेला मी कॉम्प्युटर बंद करून घरी निघालो इतक्यात संजयने मला बोलावले, ललिथालाही (बंगळुरूला मी जास्त काळ राहिलो असतो तर मीही अजिथ झालो असतो) बोलावले आणि म्हणाला, ‘‘अजित, उद्यापासून तुला दुसरे प्रोजेक्ट पाहायचे आहे; अर्थातच त्यामुळे तू तुझे काम हिच्याकडे हॅण्डओव्हर कर. एक आश्चर्य वाटले की अचानक काय झाले, पण थोडी कळीपण खुलली, कारण संजय आणि कॅनॉन दोघांच्या चक्रव्युहातून सुटका होणार होती. 12 मेला आमचे डिलिव्हरी हेड सतीश राव यांना भेटलो आणि प्रोजेक्ट काय आहे हे समजून घेतले. तिथून निघता निघता त्याने बॉम्ब टाकला, अरे तुझा अमेरिकेचा व्हिजा आहे ना? पहिले दोन आठवडे क्लाइंट व्हिसिट आहे. व्हिसा नाही म्हटल्यावर तोही विचारात पडला. तातडीने पेपर सबमीट कर असे सांगितले. दुसर्‍या दिवशी मी प्रोजेक्ट किक-ऑफचे प्रेझेंटेशन दिले. पुन्हा किक-ऑफमध्ये प्रश्‍न निर्माण झाला की अजितचा व्हिसा नाही. म्हणजे क्लाइंटला दिलेल्या शब्दाप्रमाणे व्हिसीट होणार नाही. दुसरीकडे सतीशने मला व्हिसा ऍप्लिकेशन भरायला सांगितले. पहिल्या आठवड्यात अमेरिकास्थित कोणीही माणूस क्लाइंटला भेटेल आणि मग आठ-पंधरा दिवसांनी व्हिसा आल्यावर अजित जाईल, असा तोडगाही काढला आणि पहिला क्लाइंट कॉल 14 मेला नक्की झाला. 14 ला मी माझ्या तयारीनिशी सतीशकडे गेलो. बघतो तर काय, टेलिकॉन ग्रुपमधील आणखी एक मुलगा आलेला. क्लाइंट तयार नसेल तर माझ्याऐवजी त्याला पाठवायचे, असे कंपनीच्या टॉप बॉसेसने निर्णय घेतले होते. मला अगदी मनापासून वाटू लागले की बहुधा अमेरिका आपल्या नशिबातच नाही. सतीश मात्र या मतावर ठाम होता की मीच हे प्रोजेक्ट बघायचे. त्याने क्लाइंटला पटवले की आठ-पंधरा दिवसांनी अजित आला तर उलट चांगले, कारण तो पूर्ण तयारीनिशी येईल. देव पावतो तसा क्लाइंट पावला आणि त्यांनी सतीशच्या म्हणण्यावर शिक्कामोर्तब केला. थोडक्यात अमेरिकावारीवर आलेले काळे ढग दूर झाले आणि पुन्हा अमेरिकेचे आभाळ दिसू लागले.

दिनांक 9 रोजी व्हिसा इंटरव्ह्यूची डेट निश्चित झाली. 9 तारीख लांब होती, पण हळूहळू नवीन बूट, जीन्स अशा एक-एक गोष्टी बघायला सुरुवात केली. मूड बन रहा था। एक टेम्पो था। पण तब्येत थोडी साथ देत नव्हती. मानदुखी आणि युरीन इन्फेक्शन, त्यात नवीन प्रोजेक्टमुळे कामाचाही ताण वाढत होता. अमेरिकेचा व्हिसा कधी नाकारला जाईल हे सांगता येत नाही. देहानेही सत्त्वपरीक्षा बघायचे ठरवले की काय? नेमकी रात्री आजी पडली आणि पायाचे हाड मोडले. डॉक्टरांनी ऑपरेशनशिवाय गत्यंतर नाही असेच निदान केले. आजीचे वयही इतके होते की लगेच निर्णय घेणे शक्य नव्हते. निर्णय होत नव्हता. आत्या, काका, काकू सगळे आले. अखेर ऑपरेशन करायचे ठरले. देवाच्या कृपेने ऑपरेशन यशस्वी झाले.

दि. 9 ला इंटरव्ह्यू म्हणून 8 ला ऑफिसमध्ये अर्धा अधिक वेळ त्याच्याच तयारीत गेला. जन्मापासून ते आतापर्यंतची सगळी कागदपत्रे गोळा करायची होती. प्रत्यक्ष 9 ला सकाळी 8.30 ची अपॉइन्टमेंट होती. बरोबर 8.15 ला अमेरिकन एम्बसीमध्ये पोहोचलो. 8.30-8.40 पर्यंत टोकन मिळाले आणि 8.50 ला विंडो क्र. 3 वर मला इंटरव्ह्यूसाठी बोलावले.
‘‘गुड मार्निंग’’
‘‘गुड मॉर्निंग, हाऊ आर यू?’’
‘‘आय एम फाईन, थँक्स.’’
‘‘व्हाय डिड यू ट्रॅव्हेल यु.एस. फर्स्ट टाइम?’’
‘‘आय डिडन्ट ट्रॅव्हेल अक्चुली. आय जस्ट हॅड हाय स्टँडेड.’’
‘‘व्हिच इज युअर क्लाइंट?’’
‘‘रेडिएंट एसएमएस हॅण्ड्स’’
‘‘डू यू हॅव्ह बिझनेस कार्ड?’’
‘‘हिअर यू गो...’’
‘‘थँक्स मि. वर्तक, युअर व्हिसा विल बी कॅरिड टू सेड ऍड्रेस.’’
हा! सुटकेचा निश्वास टाकला. केवळ मोजक्या तीन-चार प्रश्‍नात व्हिसा मिळाला, विश्वासच बसत नव्हता. लगेच कंपनीत आलो. सीमा व सतीश यांना सांगितले की व्हिसाचे काम झाले आहे. आता ठरल्याप्रमाणे 11 ला उड्डाण करतो.

मेलवीनला आधीच विनवणी करून ठेवल्यामुळे (फ्री) करन्सीपण त्याच दिवशी मिळाली. पहिल्यांदा यु.एस. डॉलर हातात पडले. आता फक्त पासपोर्ट आणि तिकीट बाकी, मी अमेरिकेला नक्की येतो आहे, असे मित्रांना कळवले आणि विकेंडला कुठे फिरायचे याची चक्र सुरू झाली.
दि. 9 व 10 घाईगडबडीत गेले. एअरपोर्टला जायचे म्हणून गाडीची डागडुजी करून दाना-पानी (पेट्रोल) भरून ठेवले. माझा मित्र नरेंद्र सोडायला येणार होता 10 तारखेला रात्री 10 वाजता.

मध्यरात्री 1.55 चे फ्लाइट होते. 1.30 झाला तरी सेक्युरिटी चेक इनसाठी बोलावले नाही. मीच कंटाळून सेक्युरिटी चेक करून घेतले. बसलो तर शेजारचा माणूस विचारू लागला ‘‘कुठे जाणार?’’
म्हटले ‘‘ऍटलंटा.’’
‘‘वाह छान! नोकरी का?’’
‘‘हो. तुम्ही कशासाठी?’’
‘‘माझा वायरिंगचा व्यवसाय आहे.’’

काही वर्षांपूर्वी मी यु.एस.च्या फक्त सेनिमारला गेलो होतो आणि तिथे एकाने पार्टनरशीपची ऑफर दिली होती. खरंच भारतीय जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचली आहेत. त्याच्याबरोबर गप्पा मारण्यात बराच वेळ गेला एवढ्यात डेल्टाची अनाऊंसमेंट झाली की विमान थोडे उशिरा आल्यामुळे दिलगिरी व्यक्त करत आहोत. डेल्टामध्ये खाण्याची सरबराईच होती. मुंबई ते पॅरीस साडेनऊ तासांचे अंतर होते. विमान पॅरीसच्या ‘चालसडी गोल्फ’ विमानतळावर उतरले. पॅरीसहून अमेरिकेला जाणारे बरेच प्रवासी होते. फोटोग्राफीची आवड असल्यामुळे विमानतळावर काही फोटो काढले.

11.30 ला पॅरीस अटलांटाच्या कनेक्टींग फ्लाइटमध्ये शिरलो. बोईंग 777 विमान होते. शेजार्‍याने विचारले ‘‘आर यू फ्रॉम इंडिया?’’ ‘‘येस.’’ हळूहळू गप्पा वाढू लागल्या. बेसिकली तो अमेरिकेत शिकत होता. अमेरिकेत सिटीझनशीप मिळवण्याच्या मागे होता तो. त्याच्याशी गप्पा मारता मारता वेळ छान गेला. तेवढ्यात पेयपानाची वेळ झाली. त्याने ‘टॉमेटो स्पाईसी’ मागितले. मी बघतच बसलो. टॉमेटो सूप माहीत होते, पण ज्यूस नवीनच होते. मी आपले ऍपल ज्यूस घेतले. थोड्या वेळाने हवाईसुंदरी ग्लास उचलायला आली. बघितले तर शेजारच्या रवीचे ‘स्पाईसी टॉमेटो’ हललेही नव्हते. तिने विचारले, ‘‘डू यू वॉन्ट एनिथिंग एल्स?’’ एवढा प्रोऍक्टीव्हपणा बघून मी थक्कच झालो.

-----
आज अमेरिकेतील पहिला दिवस... क्लाइंट व्हिसिट कशी राहील याची उत्कंठा होती. हॉटेल मॅनेजरला सांगून टॅक्सी बुक केली. 9.30 ऐवजी 10 ला ऑफिसला पोहोचलो. सिक्युरिटी गार्डकडे कार्ड दिले आणि कॉलिन शोडरला भेटायचे आहे. तो म्हणाला थांब मी त्याला घेऊन येतो. थोड्या वेळाने एक साडेसहा फूटी माणूस ट्रॉली ओढत आला. मला कळेना हा कोण? त्यानेच ‘हाय अजित!’ केल्यावर लक्षात आले हा कॉलिन असावा. त्याची वेशभुषा कुठल्याही अँगलने वाटले नाही की हा कॉलिन आहे.

कॉन्फरन्स रूममध्ये माझ्या कॉम्प्युटरची सोय केली होती. मुंबई ऑफिसला कळवले. दुपारी लंचमध्ये व्हेज काही नसल्यामुळे शेजारच्या हॉटेलमध्ये जाऊन व्हेज सॅण्डविच खाल्ले. 4.30 वाजता कॉलिन निघून गेला. इतक्या लवकर जाऊन काय करणार म्हणून मी प्रोडक्ट इन्स्टॉलेशन स्टेप्स मेल केल्या. सकाळी टॅक्सीने येताना साधारण रस्ता पाहिला असल्यामुळे चालत जाण्याचा प्लान केला.
अमेरिकेला जाण्याचा 1996 सालापासून सुरू झालेला हा प्रवास... आज अमेरिकेत नोकरीचा पहिला दिवस संपूवन मी अमेरिकेच्या ‘फ्री वे’वरून (हायवे) चालत हॉटेलवर येऊन संपवत होतो.

- अजित वर्तक
जयस सोसायटी, जयप्रकाश नगर,
गोरेगाव (पू.) मुंबई - 400 063
भ्रमणध्वनी :99678 99049

22 November 2010

शब्दांकित प्रतिभा दिवळी अंक - २०१०

कला संघटक ‘संस्कार भारती’


साहित्य, ललित आणि रंगमंचावरील उच्च दर्जाच्या अभिरूचीसपन्न असलेल्या कलांच्या सादरीकरणाच्या माध्यमातून संपूर्ण समाज संघटित करण्याचे आणि संघटित समाज संस्कारीत करण्याचे काम ‘संस्कार भारती’ करत आहे. ‘संस्कार भारती’ कला क्षेत्रात काम करणारी, कलाकारांचे संघटन करणारी, कौटुंबिक भावना असलेली राष्ट्रव्यापी संघटना आहे. संपूर्ण देशात राज्या-राज्यांत ‘संस्कार भारती’चे संघटनात्मक काम मोठ्या प्रमाणात यशस्वीरीत्या सुरू आहे.

समाजातील ज्येष्ठ, श्रेष्ठ, व्यावसायिक, अव्यवसायिक नवोदित कलाकारांना एकत्र आणून, त्या त्या कलाकारांच्या कलेच्या सादरीकरणातून; कलेच्या माध्यमातून समाजमनावर संस्कार घडवण्याचे काम आणि त्यातून थोर मानवी मूल्यांचे संवर्धन करणारा समाज घडवण्याचे काम ‘संस्कार भारती’ करत आहे. ‘संस्कार भारती’ कलांचे शिक्षण देणारी शिक्षण संस्था नाही. तसेच मनो
रंजनाचे कार्यक्रम करून अर्थोत्पादन करणारी संस्थाही नाही. ‘संस्कार भारती’चा मुख्य उद्देश कलेच्या माध्यमातून समाजातील व्यक्ती व्यक्ती संस्कारीत करणे, संस्कारक्षम व्यक्तींचा चारित्र्यसंपन्न समाज घडवणे व त्यातून शक्तिशाली, वैभवसंपन्न राष्ट्र घडवणे.

‘संस्कार भारती’ची स्थापना 11 जानेवारी 1981 रोजी लखनऊ येथे झाली. पद्मश्री डॉ. हरीभाऊ वाकणकर (जगद्विख्यात पुरातत्त्वज्ञ, नाणकशास्त्रज्ञ, पुराभिलेख तज्ज्ञ आणि कला शिक्षक) यांनी संस्थापक महामंत्री म्हणून काम पाहिले. ‘सा कला या विमुक्तये’ हे ‘संस्कार भारती’चे बोधवाक्य आहे आणि तेराव्या शतकात बांधल्या गेलेल्या प्रसिद्ध कोणार्कच्या सूर्यमंदिरातील रथाचे चाक हे बोधचिन्ह आहे. सर्व कलांची देवता म्हणून ज्याला मानतात, तो नटराज ‘संस्कार भारती’चे आराध्य दैवत, तर आद्य नाट्यशास्त्रकार भरतमुनी यांना गुरूस्थानी मानले आहे.

‘संस्कार भारती’चे रांगोळी रेखाटन (भू-अलंकरण) हे मनाला भावणारे, प्रसन्न करणारे सादरीकरण आहे. अनेकांनी एकत्र येऊन योजनापूर्वक रांगोळी काढल्याने एक टीमवर्क उभे राहते. रांगोळीसोबत चित्रकला, साहित्य, संगीत, नृत्य, नाट्य या कला विषयांच्या माध्यमातून, समाजातील सर्व वर्गातील लोकांवर लोकशिक्षणाद्वारे निरनिराळ्या ललित कलांच्या माध्यमातून संस्कार करून राष्ट्रीय भावनेची जागृती आणि राष्ट्रीय भावात्मक एकता वाढीस लागते.

या उद्दिष्टपूर्तीसाठी विविध उपक्रम हाती घेतले जातात. ते खालीलप्रमाणे :
ा आपल्या समिती क्षेत्रातील व्यावसायिक व नवोदित कलाकारांचा शोध घेऊन त्यांना एका
व्यासपीठावर आणणे. विषयवार सूची तयार करणे.
ा चित्र प्रदर्शन, स्लाईड शो आणि स्पर्धात्मक कार्यक्रमांचे आयोजन करणे.
ा व्याख्यानमाला, कीर्तन, भजन, कथाकथनाचे कार्यक्रम घडवून आणणे.
ा लोकशिक्षणार्थ लोककलांची कार्यशाळा आयोजित करणे.
ा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संघटित करून समाजप्रबोधनासाठी पथनाट्यांचे आयोजन करणे.
ा ज्येष्ठ कलाकारांकडून नवोदित कलाकारांना त्या त्या कलेविषयी मार्गदर्शनपर अभ्यासवर्गांचे आयोजन करणे.
ा कला क्षेत्रातील विस्कळीतपणा, आपपर भाव दूर करून निकोप आनंदाचे साधन म्हणून लोकांनी पाहावे यासाठी प्रयत्न करणे.
ा पारंपारिक आणि आधुनिक कलांचे संशोधन-संवर्धनात्मक अभ्यास करणे व प्रसार करणे.
ा कला सादरीकरणाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर समाजातील सर्व थरातील जाती, पंथ, धर्म भेदभाव दूर ठेवून आपण या समाजाचे घटक आहोत, देशाचे नागरीक आहोत, राष्ट्राचे पायीक आहोत, ही राष्ट्रीय भावना जागृत करणे व देशाची भावात्मक एकता वाढीस लावणे.

गोरेगाव समिती

दिनांक 7 ते 9 नोव्हेंबर 1997 या काळात संभाजी नगर येथे ‘संस्कार भारती-महाराष्ट्र प्रांता’चा तृतीय ‘कला साधक संगम’ संपन्न झाला. गोरेगावातील काही कलाकार व रसिक या संगमाला गेले होते. ‘कला साधक संगम’च्या मंचावर अभिरूची संपन्न संगीत, नृत्य, नाट्य, गायन, चित्रकला यांचे सादरीकरण व मुख्य म्हणजे विविध रंगांच्या भव्य रांगोळ्या हे त्या कार्यक्रमाचे आकर्षण होते. हे सर्व पाहून ऐकून गोरेगावातून उपस्थित राहिलेल्या कलाकारांनी आपणही गोरेगावात ‘संस्कार भारती’चे काम सुरू करायचे असे निश्चित केले. भरतमुनी जयंतीच्या दिवशी, 21 फेब्रुवारी 1998 रोजी संवादिनीवादक पंडीत चिमोटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व नटराजपूजनाने ‘संस्कार भारती-गोरेगाव समिती’ची औपचारिक स्थापना झाली.

पांडुरंगवाडी मसुराश्रम येथे 24 मे 1998 रोजी पहिला रांगोळी प्रशिक्षण वर्ग संपन्न झाला. गोरेगाव समितीने आयोजित केलेल्या या पहिल्या शिबिरात 75 महिला व पाच पुरुष सहभागी झाले. या शिबिरानंतर सन्मित्र मंडळ विद्यामंदिर येथे साप्ताहिक रांगोळी प्रशिक्षण वर्ग नियमितपणे सुरू झाले व आजपर्यंत सुरू आहेत. आजपर्यंत या वर्गांतून 1 हजारहून अधिक महिलांनी व पुरुषांनी रांगोळी रेखाटनाची कला आत्मसात केली आहे. या वर्गांमुळे अनेक कार्यकर्ते ‘संस्कार भारती’शी जोडले गेले व त्यांच्या जोरावर समितीने अनेक लहान-मोठे उपक्रम-कार्यक्रम गेल्या काही वर्षांत यशस्वीपणे राबवले आहेत.

‘संस्कार भारती-गोरेगाव समिती’ने मोठे कार्यक्रम केले त्यात प्रामुख्याने उल्लेख करावा असे कार्यक्रम म्हणजे, ‘वेद मंत्राहून वंदनीय वंदे मातरम्’ हा राष्ट्रभक्तीपर गीतांचा कार्यक्रम, ग.दि. माडगुळकररचित संपूर्ण ‘गीतरामायणा’चे सादरीकरण, स्व. सुधीर फडके यांना आदरांजली वाहणारा ‘ज्योतीने तेजाची आरती’ हा कार्यक्रम, पु.ल. देशपांडेंच्या ‘वार्‍यावरची वरात’ तसेच ‘नारायण’चे सादरीकरण, रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांची प्रकट मुलाखत, स्वा. सावरकरलिखित ‘1857 चे स्वातंत्र्यसमर’चे नाट्यरूपांतर, ‘स्वरप्रभात पहाट राग’ असे अनेक प्रासंगित, तसेच मासिक कार्यक्रम आहेत. शिवाय रामनवमी, गुरुपौर्णिमा, कृष्ण जन्माष्टमी, दिवाळी परिवार मेळावा, प्रजासत्ताक दिन व भरत मुनी जयंती हे सहा अनिवार्य कार्यक्रम घेतले जातात.


अशा अनेक उपक्रमांतून ‘संस्कार भारती’ समाजमनावर समाजसंघटनेचा संस्कार घडवण्याचा सातत्याने प्रयत्न करत असते.

- अरविंद जोशी
(लेखक बरेच वर्ष ‘संस्कार भारती-गोरेगाव समिती’चे कार्यवाह होते
व सध्या पश्चिम मुंबई विभागाचे प्रमुख आहेत.)
99691 96626