22 November 2010

एकाकी वैभव


दो दिल मिल रहे है...
मगर चुपके चुपके....

शाहरुख खानच्या तोंडी हे सुंदर गाणं, महिमा चौधरीची शालीन अदा, फिल्म परदेसचं हे गीत. आठवलं ना? एकदम रोमँटिक मूडमध्ये नेणार; एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाणारं. या गाण्याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ते जिथं शुट केलंय ते ठिकाण फतेहपूर सिक्री! लाल दगडातल्या भव्य इमारती आणि महाल, नक्षीदार कमानी, जाळीदार खिडक्या भिंतीवरची लाजवाब चित्रसंपदा, साध्या-सुंदर मशिदी, श्वेतवर्णी दर्गा आणि झाडांची अधूनमधून दिसणारी हिरवाई! परदेसंच हे गाणं हिट होण्यात या फतेहपूर सिक्रीचा, इथल्या जादूई परिसराचाही मोलाचा वाटा आहे.

ताजमहालाच्या तुलनेत दुर्लक्षित राहिलेल्या या शहराचं वर्णन करताना अनेकजण त्याला ‘जगातील सगळ्यात अलौकिक भुतिया वाडा’ (Ghost citiy), ‘ओसाडबाग’ असं वर्णन करतात. असं बिरुद लावतात. आग्रा तालुक्यातलं हे छोटंसं गाव, आजही फारसं गजबजलेलं नाही. आग्राहून 37 किमी दूर पश्चिम दिशेला, 400 वर्षांपूर्वी वसवलेलं हे शहर. तिसरा मोगल बादशहा मोहम्मद जलालुद्दीन अकबर याने सिक्रीच्या ओसाड माळरानावर एक संपूर्णपणे नवीन विचार आणि आयाम असलेलं शहर वसवण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. तेव्हा उभारलं गेलं ते फतेहपूर सिक्री-फतेह अर्थात विजयाचं शहर! हे शहर पाहताना तुम्हाला त्यांच्या सौंदर्यग्रह
णासाठी डोळ्यांचा जास्त प्रमाणात वापर करावा लागतो.

सिक्रीचा इतिहास-अकबराच्या पूर्वीचा

फतेहपूर सिक्रीची निर्मिती जरी अकबराने केली तरीही सिक्रीचा इतिहास अकबराच्या अगोदरचा आहे. सिक्री हे बाराव्या शतकापासून ‘सिकरवार राजपुतांच्या’ अधिपत्याखाली होतं आणि सिकरवारांवरून या ठिकाणाला सिक्री हे नाव पडलं. नंतर आलेल्या तुर्की आणि मोगल बादशहांना आणि सरदारांना सिक्रीचं हे पठार मोहिमेच्या आधी सैन्य गोळा करणर्‍यांसाठी आणि त्यांच्या छावण्यांसाठी योग्य वाटलं.
तसंच अकबर काही पहिला मोगल बादशहा नव्हे, ज्याचं लक्ष सिक्रीकडे गेलं. मोगल साम्राज्याचा संस्थापक बाबर यानेदखील सैन्यासाठीच सिक्रीला हेरून ठेवलं होतं, शिवाय बाबराने जवळच्याच एका नदीच्या प्रवाहावर बांध घालण्याचं काम सुरू करण्याचे आदेश दिले. जेणे करून तिथे एक तळं निर्माण होईल आणि सिक्रीची पाणीपुरवठ्याची गरज भागेल. उतारांवर बगीचेही लावण्याची सोय केली. हे सगळं मनुष्यवस्तीसाठी सिक्री अधिक सोयीची ठरावी म्हणून बाबरचा हा दूरदर्शीपणा पुढे वरदान ठरला.

कहाणी जोधा-अकबरची

1568 पर्यंत अकबर भारतातील सर्वांत मोठा सम्राट बनला होता आणि त्याची कीर्ती आणि दबदबा सर्वदूर पसरला होता; मात्र त्याने उभारलेलं एवढं मोठं साम्राज्य स्वत:नंतर सांभाळण्यासाठी त्याला मुलं आणि गादीला वारस नव्हता. अनेक पवित्र धामांना, तीर्थक्षेत्रांना भेटी देऊन, दानं देऊन झालं, अनेक साधू-संत, मौलवी यांचे आशीर्वाद झाले, पण काही गुण आला नाही. शेवटी असंच सिक्रीच्या शेख सलीमउद्दीन चिस्ती, या सुफी संतांची कीर्ती अकबर बादशहाला सिक्रीपर्यंत रणरणत्या उन्हातून, तप्त वाळवंटातून अनवाणी खेचून घेऊन आली.

शेख सलीमउद्दीन चिस्ती यांनी अकबराला आशीर्वाद दिला की तुला तीन मुलं होतील आणि काही महिन्यातच हे भाकीत खरं ठरलं. अकबराची पहिली बायको जोधाबाई हिने एका मुलाला जन्म दिला आणि शेख चिस्तींचा आशीर्वाद खरा ठरला. म्हणून या नवजात मुलाचं नाव ठेवलं गेलं सलीम! (हाच पुढे जहांगीर म्हणून ओळखला गेला) पुढे आणखी काही महिन्यांतच अकबराच्या अजून दोघा बायकांनी गोड बातमी दिली आणि दोघींनाही मुलगे झाले.

पुत्रांच्या जन्माच्या आनंदात हरखून गेलेल्या बादशहा अकबराने निश्चय केला की सिक्रीच होईल त्याच्या साम्राज्याची नवी राजधानी! मात्र इतिहासकारांच्या मते, वारस मिळण्याचा आनंद हे फतेहपूर वसवण्यामागचं एकमेव कारण नसावं, तर ही नवी राजधानी मोगल साम्राज्याचं राजनैतिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक केंद्र बनू शकलं असतं, कारण फतेहपूर सिक्री अशा ठिकाणी होतं की ते मोगलांची राजकीय राजधानी आग्रा आणि कौटुंबिक श्रद्धास्थान असलेलं अजमेर (मोईनुद्दीन चिस्ती यांचा दर्गा) या दोघांत दुवा साधू शकलं असतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक नवं शहर, नवी राजधानी बादशहाची सत्ता केंद्रीत करण्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची ठरू शकली असती.

मूर्तिमंत अलौकिक वास्तुशिल्पकला

फतेहपूर सिक्रीत हिंदू-मुस्लीम स्थापत्त्यकला एकत्र नांदतात. फतेहपूर सिक्रीत हिंदू-मुस्लीम वा
स्तुकला समरस होऊन गेल्या आहेत. फतेहपूर सिक्रीचं नाव काढलं की डोळ्यांसमोर सर्वप्रथम येथं ते जामा मशीद, शेख सलीमउद्दीन चिस्तीचा दर्गा आणि बुलंद दरवाजा.

फतेहपूर सिक्रीत सर्वप्रथम कुठली इमारत बांधली गेली असेल, तर ती म्हणजे जामा मशीद. पूर्वेकडून बादशाही दरवाजातून आत आल्यावर मध्यभागी भव्य मोकळा परिसर आणि चारही बाजूंनी मोकळ्या खोल्या. कमानी आहेत. जिथे चिस्ती आपल्या अनुयायींना शिकवत असत. मधल्या मोकळ्या परिसरातच शेख सलीमउद्दीन चिस्ती यांचा दर्गा आणि नवाब इस्लाम खान यांची कबर आहे.

संपूर्णपणे लाल दगडात उभारलेल्या फतेहपूरमध्ये शेख सल्लीमउद्दीन चिस्तींचा दर्गा ही एकमेव श्वेतवर्णी संगमरवरी दगडातील वास्तू आहे. जहांगीर बादशहाचं या वास्तुला खरी शोभा आणली आहे. ती चारी बाजूला महीरपी संगमरवरी जाळीमुळे दूरदूरहून लोक दर्ग्यात येतात. दर्ग्याच्या संगमरवरी जाळ्यांना लाल भगवे धागे बांधतात, अशा दृढ श्रद्धेने की सलीमउद्दीन चिस्तींच्या आशीर्वादाने तेदेखील निपुत्रिक, राहणार नाहीत. दर्ग्यातील अंतर्गत नक्षीकाम, संगमरवरी जाळ्या; स्तंभ हे केवळ अप्रतिम! संगमरवरी जाळ्यांमुळे प्रकाशाचे होणारे परावर्तन पाहून डोळ्यांचे पारणे
फिटते.

जामा मशिदीचं बांधकाम पूर्ण झाल्यावर काही वर्षांनीच बादशहा अकबराने रणथंबोरचा महाकाय गड काबीज केला आणि या विजयाचा प्रतिक म्हणून फतेहपूर सिक्रीला ‘बुलंद दरवाजा’ बांधला. बुलंद दरवाजा जणू अकबराचं प्रतिदर्शन घडवितो. जवळजवळ 50 फूट रुंद आणि 100 फूट उंच हा दरवाजा एका मजबूत आणि भव्य पायथ्यावर उभारलाय, जो जमिनीपासून 42 फूट उंचीवर आहे. दरवाजावर बसवलेल्या संगमरवरावर कुराणातील अनेक कलमं कोरली आहेत. दरवाजाच्या चौकटीवर आपल्याला तांबड्या आणि पांढर्‍या रंगाच्या संगमरवर दगडाचे मिश्र बांधकाम दिसेल! या वास्तुचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या वास्तुंची प्रमाणबद्धता व डौलदारपणा असा हा भव्यदिव्य ‘बुलंद दरवाजा’ मैलोन् मैल दूरदेखील अकबर बादशहाच्या बुलंद साम्राज्याचं प्रतिक बनून चमकत राहतो.

खरं सांगायचं तर इथली प्रत्येक वास्तू, प्रत्येक इमारत हिचं स्वत:चं वेगळेपण आणि सौंदर्य आहे. ‘दिवाण-ए-खास’ पाहून तर प्रेक्षक स्तंभित होतात. बाहेरून दुमजली दिसणारी ही वास्तू आतून एकमजलीच आहे. ‘दिवाण-ए-खास’मधील मध्यभागी उभा असलेला खांब सुरुवातीला चौकोन, मध्यभागी अष्टकोन व वर बहारदार शिल्पकृतीने भरलेला असून त्याच्या वर असलेल्या बैठकीला पेलून धरतो. त्या बैठकीपर्यंत जाण्यासाठी तीन बाजूंनी फरसबंदी असलेले कठडे आहेत. इतिहासकार म्हणतात त्याचा उपयोग अकबर सल्लामसलत करण्यासाठी करत असे. तर काही इतिहासकारांच्या मते तिथे तो आपला खजिना ठेवत असे. इथल्या ‘दिवाण-ए-खास’मधील गोलाकार वेदी आणि भव्य, पण अत्यंत कुशल कलाकुसर असलेला स्तंभ डोळ्यांचं पारणं फेडतात.

फतेहपूर सिक्रीचा अस्त!

एवढं अलौकिक शहर, एवढे कष्ट करून बांधलेलं अमाप पैसा खर्च करून उभारलेला, पण उभारल्यावर पंधरा वर्षांतच संपूर्ण दरबार, सर्व माणसं, सारे व्यापार-धंदे, सगळ्यांनी गाशा गुंडाळला आणि निघून गेले.
कुणी म्हणतं तळं आटलं आणि पाण्याची कमतरता भासू लागली म्हणून; तर कुणी म्हणतं आग्रा आणि सिक्री इथे दोन्हीकडे व्यवहार सांभाळणं कठीण गेलं म्हणून; तर कुणी म्हणतं उत्तरेकडून होणारी आक्रमणं रोखण्याकरिता बादशहाने तळ हलवला. अनेक कारणं दिली जातात, पण खरं काय ते इतिहासालाच ठाऊक.

चंद्रेच्या कलेप्रमाणे फतेहपूर सिक्रीच्या वैभवाने पौर्णिमा गाठली. पण त्याच चंद्रेच्या कलेप्रमाणे याच सिक्रीच्या वैभवाला ओहोटी लागून अमावस्या गाठली. आज मात्र तिथले सोनेरी नक्षीकाम ओसरलं, रंगीत चित्र धुसर झाली आहेत. इमारतींची पडझड झाली, तलाव आटलाय, गुलाबं, सुकली आहेत आणि मागे राहिलंय ती अकबराची औट घटकेची राजधानी फक्त लाल दगडातलं चिरेंबदी पण एकाकी वैभव!

- श्वेता सावंत (B.A. in History)
सी-702, सोनी पॅराडाईज को-ऑप., टी.व्ही.एस.-घ्घ्घ्
वजिरा नाका, बोरिवली (प.), मुंबई - 400 091.
भ्र. 99694 93873

- नितेश राव (B.A. in History)
आरे कॉलनी, युनिट नं 31,
माळी नगर, गोरेगाव (पू.), मुंबई - 400 065
भ्र. : 99670 83129

No comments:

Post a Comment