22 November 2010

माझी महत्त्वकांक्षा


‘तू पुढे कोण होणार?’, असा स्वाभाविक प्रश्‍न माझ्या वयाच्या सर्वच मुलांना विचारला जातो. मला कोणाचे अनुकरण करून, पावलावर पाऊल ठेवून, गुरुशिष्यत्व पत्करून काही होण्याची ईच्छा नाही, कारण माझी महत्त्वाकांक्षा वेगळी आहे. माझ्या स्वत:जवळच्या नातेवाईकांबद्दल असलेली माझी कर्तव्ये पूर्ण करता-करता माझ्या अवतीभवतीच्या समाजात वावरत असलेल्या दीनदुबळ्यांना आधार द्यावा, त्यांना समाजात मानाने उभे राहण्यासाठी तन-मन-धन वेचण्याची माझी महत्त्वाकांक्षा आहे.

‘परोपकार जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती’, ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले। तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा॥ या उक्तींचा माझ्यावर प्रभाव आहे. म्हणूनच माझी आद्यकर्तव्ये सांभाळत मला या उक्तींचा अनुभव घ्यायचा आहे. हं! साधू-संत नक्कीच व्हायचं नाही, कारण त्यासाठी लागणारी समाजाची ओढ, प्रयत्नांचा डोंगर मी निर्माण करू शकेन वा नाही याबाबत आज तरी मी साशंक आहे. नाही म्हटलं तरी सध्या कलियुग आहे. कोणतेही कृत्य करताना सावधता बाळगावी लागते. आजच्या धावपळीच्या युगात सर्वांनाच कुणाची तरी मदत घ्यावी लागतेच. अशा प्रसंगानुरूप मदतीच्या हाकेला ओ द्यावी, असे मला मनापासून वाटते. त्यासाठी कोणत्याही दर्जाचे काम करण्याची मी तयारी ठेवणार आहे. माझ्या मनाने हा चंगच बांधला आहे. मला ठाऊक आहे, निश्चयाचा महामेरू अवघड काम विनासायास सुलभ करतो. म्हणतात ना, 'If there is a will, there is a way'

माझ्या शेजार्‍यांपासून माझे प्रयत्न सुरू झाले आहेत. म्हणून तर माझ्या शेजारच्या आपटेकाकूंना मी हवीहवीशी वाटते. पलीकडच्या बंगल्यात राहणारे माझे प्रभाकरआजोबा आणि नानी यांच्या घरी दुसरे कोणीच नाही. त्यांच्या होकेसाठी मी आसुसलेली असते. त्यांची बारीक-सारीक कामे करताना मला समाधान मिळते. माझ्या शाळेतील दामलेबाईंसाठी तर दररोज पाण्याचा तांब्या भरून ठेवणे, खडूच्या पेटीत खडू ठेवणे, फळा स्वच्छ करणे, टेबल-खूर्चीला फडका मारणे, यांसारख्या जबाबदार्‍या पार पाडण्यात मला अभिमान वाटतो. लगबगीने शाळेत 20-25 मिनिटे लवकर येताना जी धावपळ मी करते, त्यामागे बाईंची शाबासकी मिळवण्याचा आनंद असतो.

या बालवयातच मी माझ्या आकांक्षापूर्तीचा श्रीगणेशा घालू इच्छिते. व्यसनाधीन कुटुंबातील मुले आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित होतात. आमच्या गावात असलेल्या आदीवासी पाड्यात मी संध्याकाळी जाते. तेथील मुलांबरोबर बागडण्याचे हुबेहूब सोंग उभे करते. मात्र त्यांच्याशी संवाद साधताना न शिकण्याचे दु:ख त्यांच्या मनावर बिंबवते. म्हणूनच की काय राम्याच्या आईने राम्याचा हट्ट पूर्ण करत सरकारी शाळेत त्याचे नाव घातले. बारक्यालासुद्धा शाळेत जावेसे वाटू लागले आहे, तर छोटी यमी माझ्याबरोबर पाड्याच्या परिसरातच्या स्वच्छतेच्या कामात मदत करू लागली आहे. पार्वतीबाईने तर मी सांगितले म्हणून विडी प्यायची बंद केली आहे.

या वयात माझ्या घराच्या दरवाज्यावर एक छोटी पाटी लावायची असे मी ठरवले आहे. त्यावर मी लिहिणार आहे की ‘मी आपणासाठी चोवीस तास मोकळी आहे.’ कदाचित माझा हा प्रयत्न गरूडझेपेऐवजी बेडुकउडी असू शकेल, कारण बेडूक हा प्राणी ज्याला आवडते अशी व्यक्ती दुर्मिळच.

परमेश्वराने मला धैर्य द्यावे, माझ्या हातून समाजकार्य व्हावे, शेवटपर्यंत मी समाजाचीच राहीन. दुसर्‍यांसाठी जगण्याच्या माझ्या महत्त्वाकाक्षेचा परमोच्च आनंद मला मिळेल. आपणाला काय वाटते मला यश मिळेल का?

- ऒवती नाईक
भ्र : 99220 17555 / 98508 43036

No comments:

Post a Comment