22 November 2010

रस्त्यावरची कला


रस्त्याने चालले होते. फूटपाथच्या एका कोपर्‍यावर एक गरीब असा दिसणारा सर्वसामान्य माणूस चित्र काढण्यात मग्न दिसला. त्याच्या आजूबाजूला छोटी छोटी सुंदर चित्रं होती. त्याच प्रकारचं एक नवीन चित्र तो रंगवत होता. ती चित्रे इतकी आकर्षक होती की त्यांच्यावरून माझी नजर हटेना. मी पाहतच राहिले आणि पाहता पाहता भोवतालची परिस्थिती आणि स्वत्वही विसरले. त्या चित्राने जणू मला या जगातून अलग करून एका नवीन सुंदर सुखावह आनंददायी अशा जगात नेले. चित्राने जो काही आनंद दिला, तोच स्वर्गीय आनंद असे वाटले. कारण स्वर्ग म्हणजे जेथे सुखच सुख असते अशी आपली कल्पना आणि नेमके तेच सुख या चित्राने दिले. मी कोठेही न जाता त्या
चित्राने माझ्या करता त्या फूटपाथवरच जणू स्वर्ग निर्माण केला.

ती चित्रं पाहून माझ्या मनात अनेक प्रश्‍न निर्माण झाले. ही एवढी सुंदर चित्रे काढणारा हा कलाकार असे फूटपाथवर बसून चित्र का काढत बसला आहे? एवढी सुंदर निर्मिती करणारा हा चित्रकार इतक्या गरीब अवस्थेत का दिसत आहे? याच्यापुढे कोणत्या समस्या असतील? असे एक ना अनेक प्रश्‍न माझ्या मनामध्ये निर्माण झाले.
या प्रश्‍नांनी माझ्या मनाला अस्वस्थ केले आणि त्या चित्रकारांसंबंधी अधिक माहिती जाणून घेण्याची अनिवार इच्छा झाली. त्याच्या कामामध्ये अडथळा आणण्याची खरोखर इच्छा होईना, परंतु त्याच्यासंबंधी अधिक माहिती घेण्याची इच्छाही मला स्वस्थ बसू देईना आणि अखेर त्याला बोलते केलेच.

फूटपाथवरच्या त्या कोपर्‍यावर बसून अशी सुंदर चित्रे रंगवण्याचे काम गेली सुमारे आठ वर्षे करत असल्याचे त्याने सांगितले. त्याच्या कलेचा प्रत्येक दिवस नवीन असतो. प्रत्येक दिवशी मनामध्ये निराळं निर्माण होणारं चित्र तो कागदावर उतरवत असतो. संपूर्ण निसर्ग हेच त्याचे विषय. निसर्गातील ज्या दृश्याने मनाचा ठाव घेतला तो विषय चित्राच्या स्वरूपात उमटतो.

माझ्याजवळ बोलत असतानाच त्याचं चित्र काढण्याचं काम चालू होतं आणि थोड्याच वेळात त्याच्या कुंचल्याने ते चित्र पूर्णही केलं. चित्रं पूर्ण झाल्याबरोबर त्याचे माझ्याजवळ बोलणं थांबलं आणि त्याची कलाकार नजर त्या चित्रावर फिरू लागली. त्याच्या चेहर्‍यावर आनंद उमटला. त्या आनंदात माझं अस्तित्वही विसरला.
एवढा मोठा कलाकार अतिशय साधे कपडे घालून असा फूटपाथवर का बसावा हा माझा प्रश्‍न होता. म्हणून त्यालाच विचारले, रस्त्यावरून फिरणारे लोक हेच त्याचं गिर्‍हाईक. त्यामध्ये रसिकता असलेले फार थोडे. कलेची जाण आणि कदर करणारे त्याचे गिर्‍हाईक. यामध्ये देशी लोकांची संख्या अत्यल्प, नव्हे... त्यांचे या गोष्टीकडे दुर्लक्षच. मात्र परदेशी प्रवासी त्याच्या कलेचा आस्वाद घेतात. कदर करतात आणि कलेतून मिळणार्‍या आनंदाकरता पैसाही खर्च करण्यास तयार असतात. म्हणूनच परदेशी प्रवाशांचा वर्दळीचा फूटपाथचा कोपरा त्याने आपल्या कलेकरता निवडला.

परदेशी प्रवाशांची वर्दळ ही अनिश्चित असल्याने त्या चित्रकाराची मिळकतही अनिश्चितच. मला हाही प्रश्‍न होता की परदेशी जाणकारही त्याच्या कलेची दखल घेतात, तर आपल्या लोकांनी त्या कलाकाराची दखल घेऊन त्याच्या कलेला अधिक वाव देऊन स्वत: अधिक आनंद का मिळवू नये? त्या चित्रकाराच्या अनुभवाप्रमाणे आपल्या समाजामध्ये कलाकारची ओळख त्याच्या कलेवरून होत नाही, तर त्याच्या श्रीमंतीमुळे होते. म्हणजेच समाज कलेची कदर न करता पैशाची कदर करतो. कलाकाराच्या गरीबीमुळे त्याला योग्य व्यासपीठ मिळत नाही आणि योग्य व्यासपीठ नसल्याने त्याची गरीबी हटत नाही. यामुळेच कला आणि गरीबी यांनी एकमेकांना घट्ट पकडून ठेवलं आहे. या दुर्बल परिस्थितीतून त्या कलेला वर आणण्याचे काम फक्त समाजातील सुखवस्तू आणि धनिक लोकच करू शकतील. त्यांनी याकडे लक्ष देऊन अशा कलाकारांना मदत केल्यास त्या कलाकाराच्या कलेतून त्या धनिकालाही स्वर्गीय आनंद मिळेल.

जितेंद्र राठोडने म्हणजेच या कलाकाराने निवडलेली कलासाधनाची जागा म्हणजे मुंबई म्युझिअमच्या बाजच्या फूटपाथचा एक कोपरा. मुंबईचा ‘काळा घोडा’ परिसर. त्याच्याप्रमाणेच त्याच्या आजूबाजूला फूटपाथवर असेच कलाकार आपल्या साधनेत गर्क होते. एक चित्रकार एका परदेशी पर्यटक सुंदरीला समोर बसवून तिचं चित्र रेखाटत होता.

जितेंद्र साधारण तिशीतला. चित्रकलेची डिग्री घेतलेला. पण योग्य व्यासपीठ न मिळाल्याने रंगाचा संसार फूटपाथवर मांडलेला. कलेबद्दलचा स्वाभिमान त्याच्या बोलण्यातून जाणवत होता. योग्य व्यासपीठ मिळालं नाही, तरीही असे होतकरू कलाकर स्वत:च्या कलेमध्ये आणि स्वत:मध्येच मग्न आणि म्हणूनच समाजापासून थोडे अलग राहिलेले, हे त्याच्या बोलण्यातून जाणवत होतं. कलाकारचा मूडीपणा हेही एक कारण असू शकेल. जितेंद्रच्या कलाकार मनाला असं आवर्जून वाटतं की, चित्रकाराने रेखाटलेल्या चित्रातील भावनांचा विचार करून आणि त्या प्रती असणार्‍या आस्थेमुळे लोकांनी चित्र खरेदी करावं. निव्वळ पैसा आहे म्हणून खरेदी करू नये आणि रसिकांनी आपली प्रतिक्रिया जाणवून द्यावी.

बाजूलाच असलेल्या ‘आर्ट प्लाझा’ या संस्थेचे शेणॉयसर यांच्या मनस्वी सहकार्य आणि मार्गदर्शन मिळाल्याबद्दल जितेंद्र शेणॉयसरांचे शतश: आभार मानतो.
जितेंद्रसारख्या कलाकारची मी प्रत्यक्ष पाहिलेली कहाणी, पण मुंबईमध्ये अनेक ठिकाणी रस्त्याचा कॅनव्हास करून चित्र काढणारे आणि त्यावर आपला उदरनिर्वाह करणारे अनेक कलाकार पाहण्यात येतात. चौपाटीवर वाळूचे निरनिराळे मुखवटे बनवणारे हेही असेच कलाकार. या दुर्लक्षितांकडे समाजाने आणि शासकीय यंत्रणेने स्वत:चे कर्तव्य म्हणून पाहण्याची जरूरी आहे.

समाजाने दुर्लक्षित केलेले आणखीही कलाकार आहेत ते म्हणजे वाघ्या-मुरळी, जोशी, वासुदेव, पोतराज, गोंधळी, भराडी, शकुनी, भालदार, चोपदार, बहुरूपी, शाहीर, तमासगीर या सर्वांनी मनोरंजनाबरोबरच समाजाला सदाचाराने धडे दिले.

कालमानानुसार करमणुकीची साधने आणि प्रकार बदलले. परिणामी हे कलाकार आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागे पडले. या कलाकारांची कला अस्तित्वात राहणे, हीसुद्धा गरज आहे. हे सर्व कलाकार असंघटीत असून सर्वत्र विखुरलेले आहेत. या सर्वांचे संरक्षण, शिक्षण, समृद्धी जतन करण्याची जरूरी आहे. हे कार्य कोणाही एका माणसाच्या सामर्थ्याने होणार नाही आणि म्हणून सरकारी यंत्रणेने याची जबाबदारी उचलणे आवश्यक आहे.

- प्राची निम्बकर
भ्र. : 97694 55349
ईमेल : prn_india89@rediffmail.com

No comments:

Post a Comment