दुपारची वेळ होती. उन्ह डोक्यावरून पुढं सरकली होती. उन्हाच्या तडाख्यामुळे रस्त्यावरील वर्दळ कमी दिसत होती. चार-सहा पोरं झाडाखाली खेळत होती. गुरुजी सकाळी नऊपर्यंत पूजा आटोपून शाळेकडे निघत असत. शाळेचे नवीन बांधकाम बघून दुपारी बारापर्यंत गुरुजी घरी परतत असत. आज साडेबारा झाले तरी गुरुजी परतले नव्हते. शाळेचे नवीन बांधकाम चालू केल्यापासून गुरुजींचा कामाचा ताण वाढला होता. प्रामाणिक व निष्ठेने काम करणारे मुख्याध्यापक म्हणून गुरुजींचा लौकिक होता. शाळेत गरीब व मध्यमवर्गीय मुलांची संख्या अधिक होती. घड्याळाचा एकचा ठोका कानी पडताच रमाकाकूंची चिंता वाढली. दारात उभ्या राहून कंटाळलेल्या रमाकाकू आता आत-बाहेर करू लागल्या. थोड्या वेळानंतर अस्वस्थ होऊन त्या झोपाळ्यावर जाऊन बसल्या.
गुरुजींची वाट पाहत. त्या जुन्या आठवणीत हरवून गेल्या. रमाकाकू व गुरुजींच्या लग्नाला पंचवीस वर्षे पूर्ण झाली होती. तो प्रसंग त्यांना आठवला. लग्नाला पंचवीस वर्षे पूर्ण झाली म्हणून आई-बाबा आणि दादाही आले होते. गुरुजींचे वडील लहानपणीच वारले होेते. सासूबाई थकल्या होत्या त्या गावाकडेच भाऊजींबरोबर राहत होत्या. त्या आपल्या बहिणीला घेऊन गावाकडून आल्या होत्या. चार दिवस अगदी हसत खेळत गेले. होम-हवनाचा कार्यक्रम झाला. रमाकाकू व गुरुजींनी आपल्याला अपत्य नाही म्हणून कधी नाराजी व्यक्त केली नाही. शाळेतील मुलंच आपली मुलं, असं ते वागत असत. गुरुजींनी व काकूंनी या निमित्ताने शालेतील गरीब पंचवीस विद्यार्थ्यांना जेवण दिले. गुरुजी स्वत: वाढावयास उभे राहिले होते. सगळं अगदी शिस्तबद्धरीतीने पार पडलं होतं. दादा जाताना म्हणाला रमाबाई तुझा नवरा म्हणजे ‘रेल्वेचं टाईमटेबल आहे.’’ बरं का! सर्व गोष्टींची आठवण होऊन रमाकाकू मनातल्या मनात हसल्या. हे सर्व जरी खरं असले तरी आज गुरुजींची गाडी लेट झाली होती हे मात्र खरं!
गुरुजींचं घर आणि शाळा तसं पंधरा-वीस मिनिटांच्या अंतरावर होतं. गुरुजी शाळेतून वेळेवर निघाले होते. शाळेतून निघाल्यावर उजवीकडील वळणावर बांधकाम खात्याची वसाहत होती. त्यापुढे नवीन पोलीसलाईन होती. त्यापुढे कोर्टातील कर्मचार्यांची घरे होती. त्याच्या जवळच मारुतीचं एक मंदिर व मोकळी जागा होती. पुढे लागून प्राध्यापकांची घ
रे होती. गुरुजींचं घर तिथंच होतं.
गुरुजींना आज मारुती मंदिराजवळ मोठी गर्दी दिसली. सर्व लोक गोलाकार उभे होते. मधल्या जागेतून गुबूऽऽ गुबूऽऽ गुबूऽऽ, असा ढोलकीचा आवाज येत होता. काय आहे ते पाहावे म्हणून गुरुजी तेथे थांबले. गर्दीच्या मधोमध पोतराज दोन्ही पायांवर लयबद्ध नाचत उभा होता. बर्याच वर्षांनंतर पोतराजाचं रूप पाहावयास मिळाले म्हणून गुरुजी थांबले. ते पोतराजासमोर येऊन उभे राहिले. पोतराज तरुण, पोरसवदा दिसत होता. रंगाने काळासावळा होता. साडेपाच फूट उंचीचा त्याचा बांधा मजबूत होता. डोक्यावर काळेभोर केस खांद्यापर्यंत लाब होते. केसांना भरपूर तेल लावलेले होते व मधून भांग पाडला होता. तोंडाला तेल लावून शेंदूर फासला होता. त्यामुळे त्याचे खरे रूप दिसत नव्हते. कपाळावर लाल कुंकवाचा रुपायाच्या आकाराचा टिळा लावलेला दिसत होता. गळ्यात चार-पाच काळ्या दोराचे गंडे बांधले होते. उजव्या दंडावर कवड्याची माळ घट्ट आवळून बांधलेली होती. दोन्ही हातात मनगटावर मोठाले पितळी कंडे होते. खण-पातळाच्या पाच-सात पदराच्या घड्या एका वर एक फ्रॉकसारख्या शिवलेल्या त्याने कमरेला घट्ट बांधलेल्या होत्या. त्याची लांबी स्कर्टसारखी गुडघ्यापर्यंत होती. त्याच्या पायात पितळी तोडे होते. याशिवाय पोतराजाचं संपूर्ण शरीर उघडं-बोडकं दिसत होतं. अंगा-खांद्यावर उन्हाचा तडाखा बसत होता. त्याच्या पाठीवर, छातीवर दोन्ही हातावर घामाच्या धारा वाहत होत्या. मोकळ्या पायांना
वरून उन्हाचे व खालून जमिनीचे चटके बसत होते. पायावर मोठाले फोड आलेले दिसत होते. त्याच्या उजव्या हातामध्ये चाबूक होता. भान विसरून, सर्व सहन करीत. मरीआईचा हा पुजारी अशा स्थितीतही धरती मातेवर नाचत होता. मरीआईची शक्तीच त्याच्या पाठीशी उभी राहत असावी, असं गुरुजींना वाटलं.
गुरुजींनी बर्याच वर्षांनी दिसणारे पोतराजाचे हे काळेसावळे रूप डोळे भरून न्याहाळले. लोकांची गर्दी वाढली होती. काही जण छत्री घेऊन उभे होते. काही जणांनी ऊन लागू नये म्हणून डोक्यावर पेपर पकडला होता. तर काही डोक्याला रुमाल बांधून उभे होते. प्रत्येकजण आपल्याला सांभाळत होता. पोतराज तेवढा मुक्त होता. त्याला कशाचाच आधार नव्हता. मरीआईचं त्याची आई असावी. तीच त्याला सांभाळत असावी.
पोतराजासमोर एक वृद्ध स्त्री बसली होती. तिचं संपूर्ण डोकं पांढर्या जाळ्यांनी विणल्यासारखं दिसत होतं. अंगावर ढिगळं लावलेलं पातळ दिसत होतं. तिचं शरीर थकलेलं दिसत होतं. चेहरा भकास दिसत होता. डोळे खोलवर गेलेले होते. गालफाड आत गेलेली होती. तिचे दोन्ही हात चिपाडासारखे दिसत होते. तिच्यासमोर परडी होती. परडीमध्ये मरीआईची सहा-सात इंचाची पितळी मूर्ती होती. मूर्तीसमोर दोन टाक परडीमध्ये ठेवलेले दिसत होते. मूर्ती आणि दोन्ही टाकापुढे कुंकू-हळद पसरलेली होती. आशाळभूत नजरेनं ती सर्वत्र पाहत असलेलं जाणवत होतं. गुरुजी आपल्या नजरेत हे सर्व साठवत होते. ही बाई कोण असावी बरं? गुरुजींनी स्वत:लाच विचारलं.
तेवढ्यात ‘मरीआईचं चांगभलं!’ ‘मरीआईचं चांगभलं!’चा आवाज पोतराजाच्या तोंडून निघाला व तो स्वत:भोवती फिरू लागला. फिरता फिरता त्याने अंगावर चाबकाचे फटके मारून घ्यावयास सुरुवात केली. सप! सप! चाबकाच्या काड! काड! फटक्यांचा आवाज सर्वत्र घुमू लागला. उभ्या असलेल्या मुलांच्या तोंडून आई गं! बाप रे! चे आवाज निघाले. काही मुलांनी तोंडावर हात ठेवला तर काहींनी डोळे झाकून घेतले होते. एक छत्रीधारी उभा असलेला माणूस उद्गारला काही नाही हो, उगाच आवाज काढतात लेकाच, अंगाला काही लागत नाही त्यांच्या.
डोक्याला रुमाल बांधून उभा असलेल्याने री ओढली, ‘अहो पैसा मिळविण्याचा धंदा आहे यांचा.’ तिसरा कुणाला तरी सांगत होता, ‘अहो हे खेळ करतात आणि गर्दीत यांचीच माणसं पाकिटं मारायला उभी असतात. बघा कसा धट्टाकट्टा आहे तो.’ गुरुजी सर्व काही पाहत होते, ऐकत होते. बारा-चौदा वर्षांची निरागस मुलं हा खेळ पाहण्यास उभी होती. पोतराज त्यांचा कोणीही नव्हता. तरीदेखील त्याच्या अंगावर बसणार्या चाबकाच्या फटक्याने ही सर्व मुलं व्यथित झाली होती. पोतराजाचं उघड्या अंगावर चाबकाने मारून घेणं मुलांना अस्वस्थ करीत होतं. मनुष्याची दृष्टता, कठोरता पाहून गुरुजींना वाईट वाटलं. हे सर्व चालू असतानाच ती बाई उठून सर्वांसमोर परडी फिरवीत हात जोडून फिरत होती. गर्दीमध्ये डोळे अधिक दिसत होते, परंतु परडीकडे हात मात्र फारच कमी लोकांचे वळत होते. पोतराजाने पुन्हा एकदा ‘मरीआईचं चांगभलं!’ची आरोळी ठोकली आणि तो पुन्हा स्वत:भोवती फिरू लागला.
पोतराज मध्येच थांबला तसा चाबकांच्या फटक्यांच्या आवाजाला सुरुवात झाली. एक-दोन-तीन-चार फटक्यांचा पाऊस त्यांच्या शरीरावर पडत होता. पोतराजाच्या शरीरावर पडणार्या चाबकाच्या फटक्यांच्या संख्येवर परडीत पडणार्या हातांची संख्या अवलंबून असावी असा विचित्र विचार गुरुजींच्या मनात चमकून गेला.
पोतराजाचा, मनाला अस्वस्थ करणारा प्रकार, मरीआईची मूर्ती परडीत ठेवून लाचार मनाने फिरणारी स्त्री आणि बघ्या माणसांचे पोतराजाबद्दलचे मनाला टोचणारे शब्द या सर्वच गोष्टींनी गुरुजींच्या मनाची घालमेल वाढली. तेवढ्यात गर्दीमध्ये एकच गोंधळ उडाला, गुरुजींनी पाहिले पोतराजाने आपला चाबूक टाकून दिला होता. तो उजव्या हाताने डावा दंड दाबून धरत खाली बसत होता. चाबकाचा फटका त्याला वर्मी बसला होता. ती बाई परडी घेऊन वेगाने धावत त्याच्याजवळ आली. तिनं चिमूटभर हळद परडीतून घेऊन त्यांच्या दंडावर भरली. आपल्या फाटक्या लुगड्याची चिंधी तिनं घट्ट आवळून त्याच्या दंडावर बांधली.
हा प्रकार चालू असताना बघ्यांची गर्दी पांगली होती. त्यांचे काम संपले होते. जो तो आपल्या कामाला निघून जात होता. काही तुरळक माणसं जवळ येत होती. परडीत चार-आठ आणे टाकून पुढे सरकत होती. गुरुजींनी खिशात हात घातला. हाताला पाच रुपयांची नोट लागली. त्यांनी वाकून त्या माऊलीच्या परडीत ती नोट ठेवली. परडीत पडलेली पाच रुपयांची नोट पाहून पोतराजाने वर पाहिले. गुरुजी परत निघाले होते. पोतराजाने गुरुजींना ओळखले. ‘‘गुरुजी!’’ म्हणून त्याने हाक मारली. गुरुजी हाक ऐकून चपापले. कोण म्हणून त्यांनी मागे वळून पाहिले. गुरुजी, मी भिकाजी कुंभार! भिका आपल्या शाळेचा विद्यार्थी. असे भिकाजी तू...’’
भिकाजी सांगू लागला. गुरुजी, शाळेनंतर वर्ष-दीड वर्षे नोकरीच्या शोधात फिरत होतो. नोकरी कुणी देत नव्हतं. चुरमुरे फुटाणे खाऊन दिवस जात होते. माझं ठीक, पण आईकडे पाहावतं नव्हतं. ती दिवस दिवसभर भूकेने व्याकूळ होऊन पडून राहत होती. अशाही परिस्थितीत आई म्हणायची भिकू वेडंवाकडं कोणतंही काम करून पैसे मिळवू नको. मरिआई जे देईल ते खाऊ बाबा. एक दिवस ठरवलं, माझा बाप पोतराज होता. त्याला जाऊन दोन वर्ष झाली होती. आईनं त्या सार्या वस्तू व परडी कापडात बांधून ठेवल्या होत्या. त्या कापडातील सार्या वस्तू मी बाहेर काढल्या, अंगावर चढवल्या आणि आई समोर येऊन उभा राहिलो. आई मनातून चमकली होती. तिनं थोडा वेळ मला डोळे भरून बघितलं आणि तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं.
काही दिवस मी जवळपास गल्लीत पोतराज म्हणून फिरलो आणि नंतर बाहेर पडलो. ही माझी आई आहे गुरुजी, असं म्हणून भिकाजीनं त्या वृद्ध स्त्रीच्या खांद्यावर हात ठेवला. त्या स्त्रीनं भिकाजीला पुढं काही बोलू दिलं नाही. तिनं दोन्ही हात जोडले व ती बोलू लागली, ‘‘गुरुजी याचा बाप पोतराज होता. दोन वरीस झालं तो मेला. बारा-पंधरा वरीस मी त्याच्या संग फिरले. हाता-पायावर त्याच्या गोळे आले होते. पाठ चाबकाच्या फटक्यांनी गुरावानी झाली होती. पोट पाठीला लागलं होतं. उसन्या बळांनी तो नाचत होता. गुरुजी याचा बाप आता मेला, मी तर त्याच्या संग रोज मरत होतो. याचा बाप असतानाही मी रोज मेले, आता या पोरासंग पण मी रोज अशीच मरत आहे गुरुजी. मला यातून सोडवा हो. आता हे सारं बघवत नाही हो गुरुजी मला. आम्हाला यातून सोडवा नाही तर एक दिस मी याला घेऊन जीव देऊन मोकळी होईन.’’ असे म्हणत त्या स्त्रीनं हंबरडा फोडला व गुरुजींच्या पायावर डोकं टेकलं.
त्या स्त्रीचं हे बोलणं गुरुजींना अनपेक्षित होतं. गुरुजी गोंधळून गेले. त्या स्त्रीचं बोलणं गुरुजींच्या हृदयात घुसलं होतं. तिचे बोल गुरुजींच्या जिव्हारी लागले होते. एक कटू सत्य त्या माऊलीच्या तोंडावाटे बाहेर पडले होते. माणसाने माणसाची काय दशा केली आहे याचा प्रत्यय गुरुजींना येत होता. गुरुजींनी आपले पाय मागे ओढले. काहीही न बोलता गुरुजींनी घराची वाट धरली. त्यांचे पाय जड झाले होते. गुरुजी घरी पोहोचले. त्यांचा चेहरा पाहून रमाकाकूंनी त्यांना काही विचारलं नाही. गुरुजींनी टोपी व कोट काढून खुंटीवर अडकावला. आत जाऊन त्यांनी हातपाय धुतले, देवाला नमस्कार केला व ते पाटावर बसले.
त्यांचे जेवणात लक्ष नव्हतं. रमाकाकूंच्या लक्षात हे आलं होतं. अशावेळी रमाकाकू गुरुजींना प्रश्न करण्याचं टाळीत असतं. गुरुजींना आहे त्या विचारात ठेवण्याकडे त्यांचे कल असे. त्यांच्या दृष्टीने हा पवित्रा योग्य आहे अशी त्यांची श्रद्धा होती. गुरुजींनी जेवण आटोपले व ते झोपाळ्यावर येऊन बसले. झोपाळा विचारांना वेग देत होता. भिकाजीच्या आईचे शब्द त्यांच्या डोक्यातून जात नव्हते. त्या स्त्रिच्या तोंडातून बाहेर पडणारे सत्य नाकारण्यास त्यांचे मन तयार नव्हते. डोळ्यासमोर घडणार्या घटनेचं सत्य नाकारण्याचा अधिकार त्या लोकांना कुणी दिला होता. पोतराजाच्या पाठीवर उमटलेले चाबकाचे वण, पायावरील मोठाले फोड, उघड्या बोडक्या शरीरावरून वाहणार्या घामाच्या धारा हे सर्व या लोकांच्या नजरेला का दिसू नये? हे सर्व खोटं तर नव्हतं. दररोज आपल्या पतीच्या आणि नंतर मुलाच्या दिवसभराच्या खेळाने ती स्त्री रोज होरपळून निघत होती. मरणयातना भोगत होती. गुरासारखा हंबरडा फोडून तिनं कटू सत्य आपल्या पुढे मांडलं होतं. हे सर्व या लोकांच्या दृष्टीला व कानाला का दिसू नये. देवाचे प्रतिक म्हणून असलेली गणपतीची मूर्ती दूध पिऊ लागली म्हटल्याबरोबर याच मंडळींनी वाटी, कप, ग्लासमध्ये दूध भरून देवळासमोर मोठाल्या रांगा लावल्या होत्या. देवाला घाम फूटला असे ऐकल्यावर पंढरीच्या देवळासमोर हीच मंडळी घाम फूटेपर्यंत उभी होती. देव-देवता काहीही मागत नसताना दही-दूधाच्या अभिषेकाकरिता शेकडोंची रांग लावणार्या भक्तगणांची गुरुजींना आठवण झाली. दही-दूध घेऊन देवळात जाताना देवळाबाहेर बसलेल्या आंधळ्या-पांगळ्या, रोगांनी पछाडलेले असंख्य हात वाटीभर दही-दूध मागत असताना त्यांच्या वाटीत काहीही पडत नव्हतं. वृक्षाची वाढ होत असताना झाडाच्या खोडाला काही आकार मिळाला तर तेथे कोणाला पिंड दिसू लागते तर कोणाला गणपती तर कोणाला साक्षात शंकराचा अवतार दिसू लागतो. बघता बघता शेकडो नारळ तेथे फोडले जातात. उदबत्तीचा धूर निघू लागतो. परमेश्वराचं प्रतिक असणारं परमेश्वराचं रूप या मंडळींना मान्य होतं, परंतु परमेश्वरकृपेने प्राप्त झालेला मनुष्य देह या मंडळीच्या मनाला का शिवत नसावा? यालाच भक्तांची परमेश्वरावरील श्रद्धा समजायचे काय!
पोतराजाकडे लोक त्याचा खेळ पाहण्यासाठी येत असतात. त्यांना त्यातून आनंद हवा असतो. मनुष्याचा आनंद दुसर्याशी एकरूप होण्यात आहे म्हणतात, आपल्या भावनांशी समरस होणारा कोणीच नसेल तर... आज भिकाजीच्या आईने हंबरडा फोडून आपल्या पायावर डोके ठेवले ते कशापायी?
घड्याळातील चारच्या ठोक्यांनी गुरुजींची विचारशृंखला थांबली. गुरुजी लगबगीनं उठले त्यांनी अंगात कोट चढविला, डोक्यावर टोपी घातली आणि पत्नी रमाला आम्ही शाळेत जाऊन येतो म्हणून ते बाहेर पडले. रमाकाकू बराच वेळ त्यांच्या जाण्याकडे डोळे लावून उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यात विश्वास होता, जणू काय घडणार आहे, याची त्यांना आधीच ओळख झाली असावी. गुरुजी शाळेत आले त्यांनी सर्व शिक्षकांना बोलावून घेतले. गुरुजींच्या अचानक बोलवण्यामुळे सर्वचजण संभ्रमात होते. गुरुजींनी दुपारची भिकाजीची हकीगत सर्व शिक्षकांना सांगितली. भिकाजीने शाळेला कब्बडीत राज्यस्तरीय पारितोषिक मिळवून दिलेले होते. जिल्ह्यातून ‘बेस्ट कॅडेट’ म्हणून त्याने शाळेचा मान वाढविला होता. सर्व शिक्षकांना याची जाणीव होती. आपल्या शाळेचा हा विद्यार्थी शाळेजवळ पोतराज म्हणून जीवन जगत आहे, सोबत त्याची वृद्ध आई दारोदर फिरत असल्याचं सांगतांना गुरुजींचा कंठ दाटून आला. आपल्या नवीन शाळेत त्याला नोकरीवर सामावून घ्यायचा प्रस्ताव मी आपल्यासमोर मांडत आहे. त्याचा निर्णय तुम्हीच घ्यावा, असे म्हणून गुरुजींनी नाकावरचा चष्मा काढून आपले डोळे रुमालाने टिपले.
थोडा वेळ सर्वत्र शांतता पसरली. प्रस्ताव घेऊन सर्वजण बाहेर पडले. त्यांनी बराच वेळ चर्चा केली. सर्वजण प्रस्ताव घेऊन गुरुजींकडे आले. गुरुजी डोळे बंद करून बसले होते. सर्वांच्या येण्याने गुरुजींनी डोळे उघडले सर्वांनी प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला. एकमताने सर्वांनी प्रस्तावास मान्यता दिली होती. भरलेल्या डोळ्यांनी गुरुजींनी सर्वांना हात जोडले. संध्याकाळची वेळ होती. रमाकाकूंनी घराची झाडलोट केली. देवाजवळ समई लावली सारं घर प्रकाशानं उजळल्यासारखं वाटत होतं. दारात गुरुजी उभे होते.
- प्र.बा. घायलोद
163/3, रेल्वे लाईन,
व्यंकटेश अपार्टमेंट, सोलापूर 413001
दूरध्वनी : 2316316
No comments:
Post a Comment