24 November 2010

असे होते बाणेदार रामशास्त्री प्रभुणे!


नि:स्वार्थीपणा, निर्भीडपणा, न्याय निष्ठुर व नि:पक्षपातपणा या गुणांचा समुच्चय ज्या एका अधिकारी व्यक्तीमध्ये एकवटला होता, अशी एक व्यक्ती पेशवाईत होऊन गेली. या व्यक्तीने आपल्या कर्तव्यात मोठा आणि लहान आपला व परका असा आपपर भाव कधीच केला नाही. त्यामुळेच आज इतकी वर्षे झाली तरी त्या व्यक्तीचे नाव उच्चारल्या बरोबर मन एकदम भारावून जाते व माणूस नतमस्तक होतो. ती व्यक्ती म्हणजे पेशव्यांचे मुख्य न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे!

रामशास्त्री यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथभट व आईचे नाव पार्वतीबाई. त्यांचा जन्म 1720 मध्ये झाला. वयाच्या वीस वर्षापर्यंत त्यांना विद्येचा गंध नव्हता. ते प्रथम समोरच्या अनगळ सावकाराकडे शागीर्द होते. एकदा या सावकराकडे एका जवाहिर्‍याने दागदागिने तपासणीसाठी आणले होते. त्याच वेळी लहानग्या रामाचे लक्ष दागिन्यांच्या तेजामुळे आकृष्ट झाले व त्याच्या हातून सावकाराच्या पायावर पाणी नीट न पडता ते बाजूला पडू लागले, म्हणून सावकाराने त्याला विचारले, ‘‘तुझे कामात लक्ष का नाही?’’ तेव्हा रामाने उत्तर दिले की, ‘‘या जवाहिरांनी माझे लक्ष विचलित केले आहे.’’ अर्थात् त्याचे हे सरळ उत्तर सावकाराला पसंत न पडून तो रागाने त्यांना म्हणाला, ‘‘असल्या गोष्टी फक्त रणगाजी व विद्वान लोकांसाठीच असतात. या तुझ्यासारख्या भिकारड्या मुलाला कशा मिळतील?’’

सावकाराच्या या उद्गारानंतर रामाने आपल्या आयुष्यातील पहिली बाणेदार वाणी उच्चारली. तो म्हणाला, ‘‘तुम्ही आपल्या खोचक व बोचक शब्दांनी मला मार्ग दाखविला व त्यामुळे तुम्ही माझे गुरू झाला आहात. हाती तलवार धरणे हा काही माझा धर्म नाही. माझा धर्म म्हणजे वेदविद्या व शास्त्रे यांच्या अभ्यास. या विषयात नावलौकिक व मानमरातब मिळवीन तेव्हाच राहीन.’’ याप्रमाणे लहान वयातच रामशास्त्र्यांनी आपल्या बाणेदारपणाची चुणूक सर्वांना दाखवून दिली.

वरील प्रसंगानंतर रामशास्त्र्यांनी मार्ग धरला तो म्हणजे वेदविद्येचे माहेरघर असलेल्या काशी नगरीचा. या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी बाळभट पायगुडे यांच्या पाठशाळेत विद्याभ्यास करण्यास प्रारंभ करून व अत्यंत श्रम घेऊन विद्या मिळविली आणि थोड्याच दिवसात त्यांची धर्मशास्त्री म्हणून ख्याती झाली. महाराष्ट्रात ते परत आले ते महान शास्त्री म्हणूनच. 1751 मध्ये त्यांनी नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत धर्मखात्यात नोकरी धरली व नंतर 1759 मध्ये ते मुख्य न्यायाधीश झाले. त्यांना प्रथम रोजमुरा दीडमाही 40 रुपये मिळकत असे व श्रावण मासाची दक्षिणा 500 व कापड 551 रुपये इतके मिळत असे. पुढे त्यांना पेशव्यांनी घोडा बक्षीस दिला आणि त्याबद्दल 15 रुपये दरमहा जास्त वाढविला.

रामशास्त्र्यांची प्रतिष्ठा थोरले माधवराव पेशवे यांच्या कारकिर्दीत वाढली. माधवरावांनी त्यांना न्यायाधीशांचे काम सांगितले व पालखी दिली. पालखीच्या नेमणूकीबद्दल त्यांना 1 हजार रुपये अधिक मिळू लागले. माधवराव स्वत: कडक वृत्तीचे होते. तरीसुद्धा ते शास्त्रीबुवांना वचकून असत व त्यांच्याच तंत्राने वागत असत. एके दिवशी शास्त्रीबुवा माधवरावांना भेटावयास सकाळी गेले होते. त्यावेळी शिपायाने सांगितले की, श्रीमंत मौन धरून जप करीत आहेत. असा प्रकार एक दोन वेळा झाला. तेव्हा आपले सर्व सामान घेऊन ते श्रीमंताकडे आले व निरोप मागू लागले की, ‘‘काशीस जाण्यास रजा द्यावी’’, तेव्हा पेशव्यांनी विचारले, ‘‘असे विचारण्याचे कारण काय?’’ त्यावर शास्त्रीबुवा उत्तरले, ‘‘प्रभू जपास लागले तर प्रजेची व्यवस्था बिघडेल. याकरिता येथे ठीक नाही आणि जाते समयी आपणास इतकेच सांगणे आहे की, आपण ब्राह्मण असून क्षत्रिय धर्म अंगिकारला आहे. तरी तो सोडून देऊन ब्राह्मणाचा धर्म घ्यावयाचा असेल तर माझेबरोबर चलावे. आपण उभयंता गंगेचे काठी बसून स्नानसंध्या करू, परंतु क्षत्रियाचा व ब्राह्मणाचा हे दोन वर्णधर्म करू म्हणाल, तर दोन्ही बिघडतील. जशी मर्जी असेल तसे करावे.’’ यावर श्रीमंतांनी सांगितले की, ‘‘आपण जाण्याचे कारण नाही, आम्ही आपली स्नानसंध्या आजपासून सोडली.’’ तेव्हा शास्त्रीबुवा म्हणाले, ‘‘आपली स्नानसंध्या हीच की हजारो प्रजेस दाद द्यावी. त्याचे गार्‍हाणे ऐकावे हाच आपला धर्म आहे.’’
1772 मध्ये थोरले माधवराव मृत्यू पावले व त्यांच्यानंतर नारायणराव हा गादीवर आला. परंतु चुलत्याच्या म्हणजे राघोबादादांच्या कारस्थानामुळे त्याचा 1773 मध्ये खून झाला व महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. या प्रकरणात मुख्य आरोपी होता राघोबादादा. खून करणारी व्यक्ती एवढी मोठी होती, तरी रामशास्त्री यांनी आपल्या न्यायाच्या कामात मुळीच कसूर केली नाही. त्यांनी रोघाबास स्पष्ट बजावले की, ‘‘नारायणरावांच्या खुनाबद्दल तुम्हांस देहांत प्रायश्चित्त घेतले पाहिजे.’’ याप्रमाणे रोकडा जबाब देऊन व इतपर पुण्यात राहावयाचे नाही, असे ठरवून त्यांनी पुणे सोडले व वाईजवळ पांडववाडी म्हणून गाव आहे तेथे वास केला.

नारायणरावांच्या हत्येनंतर पुण्यात बारभाईचे राजकारण सुरू झाले. अशा वेळी रामशास्त्री यांच्यासारख्या न्यायनिपुण व्यक्तीची पुण्यात अत्यंत जरूरी होती. म्हणून नाना फडणवीसांनी त्यांना पुन्हा पुण्यात आणले व त्यांची पूर्वीची मुख्य न्यायाधीशांची जागा त्यांना दिली. या नेमणुकीबद्दल ऐतिहासिक पुरावा उपलब्ध असून ते साल 1774 होते. हा पुरावा म्हणजे नाना फडणवीस, सखारामबापू व मोरोबादादा यांनी 4 जुलै 1774 या रोजी लिहिलेले पत्र. ते याप्रमाणे आहे :
‘‘जा बल सु॥ खमस सब्वैन’’
॥ श्री ॥
राजश्री नारी अप्पाजी स्वामी गोसावी यास विनंती उपरी. वेदशास्त्रसंपन्न राजश्री रामशास्त्री पुण्यात आले आहेत. त्याजकडे न्यायाधीशाचा अधिकार पहिल्यापासून चालत होता. त्याप्रमाणे चालता करून व्याजकडे माणसे वगैरे पूर्ववतप्रमाणे नेमून देऊन तुम्हांपासी मनसुबीचे कामकाज पडेल ते दरोबस्त यांचे हाते घेत जाणे, पहिल्याप्रमाणे घेणे जाणिजे. छ. 24 सु॥ सन खमस सबैन मया व उलफ बहुत काय लिहिणे, हे विनंती.’’

या नेमणुकीनंतर 1780 मध्ये त्यांच्या पगारात व मानमरातबातपण पुष्कळच वाढ झालेली आढळते. कारण त्यांना रुपये 2 हजार जातीस तनखा, रुपये 1 हजार पालखी खर्च, शिवाय 1 हजार रुपये श्रावण मासाची दक्षिणा व दसर्‍याचा पोशाख इतके मिळत असे.
न्यायदानाच्या कामात रामशास्त्री अत्यंत कर्तव्यदक्ष होते. त्यामुळे त्यांच्या कामात कोणीही ढवळाढवळ केलेली त्यांना पसंत पडत नसे. नाना फडणवीस व सखारामबापू हे दोघेही उत्तर पेशवाईत सर्वाधिकारी होते, तरी त्यांनी न्यायाच्या कामात कधीच हस्तक्षेप केला नाही. त्याचप्रमाणे त्यांनी शास्त्रीबुवांना लेखी पत्राद्वारे कळविले होते. 26 सप्टेंबर 1774 चे ते पत्र येणेप्रमाणे आहे -
‘‘वेदशास्त्रसंपन्न राजश्री शास्त्रीबुवा स्वामीचे सेवेसी -
विनंती उपरी. सांप्रत मनसुब्या होतात, यात आपणास चौघांचा उपरोध होतो. याजमुळे शेवटास जात नाही. ऐशास आम्ही आपलेतर्फेने शपथपूर्वक हे पत्र आपणास लिहिले आहे. येविसी संशय न धरिता आपणही शपथपूर्वक ईश्वर स्मरोन आमची अगर दरबारात च्यार मातबर आहेत त्यांची भीड न धरिता न्याय करून विल्हेस लावीत जावे. या उपर आलस करू नये. सा.छ. 19 रजब लोभ असो दिजे, हे विनंती.’’

न्यायात काटेकोरपणा असूनसुद्धा काही वेळेला शास्त्रीबुवांबद्दल थेट पेशव्यांच्या कानापर्यंत गवगवा झालेला आढळतो. अशा प्रसंगी दरबारातील मुत्सुद्यांना शास्त्रीबुवांवर पक्षपाताचा निष्कारण आरोप येऊ नये म्हणून मध्यस्थी करणे भाग पडले. या विषयी पुरावा 2 ऑगस्ट 1764 च्या एका पत्रात सापडतो तो असा -
‘‘पैत्रग्ती छ 3 सफर
सु॥ स्वमस सितैन
सेवेसी विज्ञापना. मोरो अनंत व चिमणाजी बलाल खोत मौजे वाटदतर्फे सेतवड सुभा राजापूर याचा व कवठेकर याचा खोतीचा कजिया आहे. त्यासी शास्त्री पक्ष धरून मनसुफी करितात. त्यास दुसर्‍याकडे सांगावी म्हणोन. मोरो अनंत व चिमणाजी बल्लाळ यांना विनंती केली... शास्त्रीबाबा पक्ष धरून मनसबी करणार नाहीत. यास्तव त्याचकडेच करावयाची आज्ञा करावी हे विज्ञापना.’’

शास्त्रीबुवा पक्षपातीपणा करीत नसत, याबद्दल आणखी एक मनोरंजक गोष्ट उपलब्ध आहे. सवाई माधवरावांच्या कारकिर्दीत रामशास्त्री यांच्याकडे रमण्यात दक्षिणा वाटण्याचा अधिकार होता. एकदा त्यांचा सख्खा वडीलभाऊ दक्षिणा घेण्यास आला. तेव्हा जवळ बसलेल्या नानांनी सांगितले की, ‘‘वीस रुपये द्यावे.’’ यावर रामशास्त्री म्हणाले, ‘‘यास विद्या नाही, तेव्हा सर्वांप्रमाणेच दोन रुपये द्यावे, कारण मला पक्षपात केल्याचा दोष लागेल. याकरिता जास्ती देणे शिरस्त्यांबाहेर आहे. माझे भाऊ आहेत तर मीच काय ते देईन, पण दक्षिणेच्या अधिकारात पक्षपात नसावा.’’ या दक्षिणावाटपात ते इतके कडक व काटेकोर होते, की त्याबद्दल संस्कृतमध्ये एक श्‍लोक रचण्यात आला.
वृषिविना पंचकहो विचित्रं,
स्थलद्वषे तिष्टतिते सर्व कालं।
दानांबमिर्माधवताय मंदिरे,
विप्रस्यबाष्पै: खलु रामशास्त्रीणाम्‌॥
याचा अर्थ, ‘पावसाशिवाय चिखल तयार होतो, किती विस्मयकारक घटना आहे ही. हा चिखल बाराही महिने दोन ठिकाणी आढळतो. एक म्हणजे श्रीमंतांच्या वाड्यात दक्षिणेवर सोडलेल्या पाण्यामुळे व दुसरे म्हणजे रामशास्त्र्यांच्या वाड्यात ब्राह्मणांच्या डोळ्यातून वाहणार्‍या अश्रुंमुळे.’ शास्त्रीबुवा दक्षिणा घ्यावयास येणार्‍या प्रत्येक ब्राह्मणाची अगदी कसून परीक्षा घेत.

रामशास्त्री यांची राहणी अत्यंत साधी होती. त्यांची पत्नी काशीबाई यासुद्धा त्याचप्रमाणे वागत असत. डामडौलाचा शास्त्रीबुवांना तिटकारा होता. एकदा पेशव्यांच्या घरी हळदीकुंकू समारंभ होता. त्यावेळी काशीबाई तिथे गेल्या होत्या, पण त्यंाच्या अंगावर दागदागिने काहीच नव्हते. म्हणून समारंभ झाल्यावर पेशव्यांच्या पत्नीने दागिन्यांनी मढवून व पालखीत बसवून त्यांची घरी बोलवण केली. घराच्या दरवाज्यात त्या शिरणार इतक्यात रामशास्त्री यांनी त्यांना विचारले, ‘‘बाई आपणास कोण पाहिजे? आपण घर चुकला नाहीत ना? हे घर तर रामशास्त्र्यांचे आहे.’’ काशीबाई अत्यंत ओशाळल्या आणि त्यांनी शास्त्रीबुवांचे पाय धरले.

वेदशास्त्र पारंगत असूनसुद्धा रामशास्त्री हे पुरोगामी विचारांचे होते. परशुरामभाऊ पटवर्धन यांच्या कन्येच्या पूनर्विवाहास त्यांनी मान्यता दिली होती. जेव्हा तिचा पती निर्वतला तेव्हा ती आठ वर्षांची मुलगी होती व ‘हे अर्भक बाल आहे. हिला दुसरा नवरा करून द्यावा असे आम्हास वाटते’, असा निर्णय त्यांनी दिला त्याचप्रमाणे ‘पूनर्विवाहाच्या बाबतीत पुरुषांनी तयार केलेले नियम स्त्रियांचे सुख-दु:खाचा विचार न करता केलेले असल्यामुळे पूर्वीच्या व चालू नियमांत विसंगती आढळते’’, असा स्पष्ट अभिप्राय त्यांनी दुसर्‍या एका प्रकरणात दिलेला आढळतो.

न्यायदानाचे आपले काम चोखपणे, निर्भीडपणे, नि:स्वार्थीपणे व नि:पक्षपातीपणे बजावत न्यायदेवतेचा हा निस्सिम भक्त 21 ऑक्टोबर 1786 रोजी मृत्यू पावला. या श्रेष्ठ न्यायधीशाबद्दल पाश्चिमात्त्य इतिहासकार ग्रँड डक म्हणतो, ‘‘न्यायााधीशांची जागा विभुषित करणारा पहिला गृहस्थ म्हणजे रामशास्त्री. यांची नेमणूक पहिल्या माधवरावांच्या काळात झाली. या बाणेदार न्यायाधीशाचे चारित्र्य फारच उच्च कोटीचे होते. माधवरावांच्या पश्चातसुद्धा न्यायाचे काम याने अतिशय अब्रुदारपणे व मानाने केले. म्हणूनच त्याची आठवण अत्यंत पूज्य मानली आहे. नाना फडणवीसाने ज्या काही चांगल्या गोष्टी केल्या त्या सर्वांचा उगम रामशास्त्र्यांच्या प्रभावात आणि आदरात आहे. लाचलुचपतीने पोखरलेल्या सरकारात अशी व्यक्ती असणे हे त्या व्यक्तीस भूषणावह आहे. म्हणूनच अशी एखादी व्यक्ती दुसर्‍या बाजीरावाच्या काळात असती, तर तिने त्याचे व दरबाराचे नैतिक अध:पतन निश्चित थांबवले असते, असे वाटल्याशिवाय राहत नाही.’’

- प्रसाद धामणकर
धामणकर निवास, रामवाडी, पेण, जि.
रायगड, पिन. 402 107

2 comments:

  1. खूप चांगली अभ्यासपूर्ण व सप्रमाण माहिती दिलीत. धन्यवाद.

    ReplyDelete
  2. नसमस्ते, इतिहास साची खरी माहिती, न्यादानाचे महत्व. वाचून मन भरून आले धन्यवाद

    ReplyDelete