आपल्या जीवनातील एखादी जुनी घटना आपल्याला आठवते. त्या घटनेस किती महिने अथवा वर्षे झाली, हे आपल्या लक्षात येते. दोन घटनांमधील अंतर म्हणजे कालमिती. आज घरोघरी कालमितीसाठी दिनदर्शिका आणि घड्याळे आहेत.
कालमापन हे पृथ्वीच्या स्वत:भोवती परिभ्रमणावर अवलंबून तर कालगणन हे पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या आणि चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या प्रदक्षिणाकालावर आधारलेले आहे. दिवस, चंद्रमास आणि सौरवर्ष या गोष्टी पृथ्वी, चंद्र आणि सूर्य यांच्या हालचाली आणि गती यावर अवलंबून आहे. पण दिवसाचे तास, मिनिट, सेकंद पाडले जातात हे संकेत आहेत. त्यांच्या पृथ्वीच्या परिभ्रमणाशी काही संबंध नाही. एक दिवस हे एकक. पृथ्वीच्या एका परिभ्रमणाशी निगडीत आहे. त्यामुळे आपण त्यात काही बदल करू शकत नाही, पण एका दिवसाचे किती भाग पाडायचे हे संकेत आहे. प्राचीन भारताने गणित आणि गणनेसाठी दशमानपद्धती शोधली, पण ती दैनिक कालमापनासाठी वापरली नाही. अन्यथा 100 सेकंदाचे एक मिनिट, 100 मिनिटांचा 1 तास व 10 तासांचा दिवस असे म्हटले असते. मिनिट, सेकंद ही एकके नसली तरी सूक्ष्म कालमापने त्या काळीही होती. कौटिल्याने सर्वात सूक्ष्म माप म्हटले आहे ते तृटी. डोळ्याची पापणी मिटून पुन्हा उघडायला जो वेळ लागतो त्यास तृटी म्हटले आहे. दोन तृटी म्हणजे एक लव, दोन लव म्हणजे एक निमेष. या पुढेही मोठी मापने म्हणजे काष्टा, कला, नाडी, मुहूर्त वगैरे. एक मुहूर्त म्हणजे एक दिवस. मनूनेही थोड्या-फार फरकाने दिवसाच्या याच कालमापनांना मान्यता दिली होती. दिवस-रात्र हे वास्तव आहे व त्याचे भाग हे त्याचे संकेत आहेत. अर्थात त्या काळात केवळ दिवसाचे भाग होते असे नाही तर चंद्र आणि सूर्याभोवती फिरण्याच्या गतीचा विचार होऊन पक्ष, (शुक्ल आणि कृष्ण) मास, वर्ष, उत्तरायण, दक्षिणायन ही कालमानाची मोठी एकके त्यांना ज्ञात होती. यापेक्षाही मोठी एकके स्वीकारली होती. कृतयुग, त्रैतायुग, द्वापारयुग, कलियुग या कल्पना व त्यांची कोष्टकेही मांडली होती. ही युगे देववर्षांनी मोजली जातात. मनुष्याचे एक वर्ष म्हणजे देवाचा अहोरात्र एक दिवस. त्यानुसार युगे आणि ब्रह्मदेवाचा एक अहोरात्र दिवस म्हणजे मावनाची आठ अब्ज चौसष्ठ कोटी वर्षे. या सर्व एककांची कोष्टके आहेत. एवढ्या मोठ्या संख्येचे मोजमाप होऊ शकते ते विशेष. हा सर्व भारतात शोध लागलेल्या शून्याचा प्रताप. या कालमापनावर पानेच्या पाने लिहिता येतील.
आधुनिक सौर कालगणना
भारत तसा बहुभाषिक, बहुपारंपारिक, बहुधार्मिक देश असल्यामुळे इथल्या कालगणनाही विविध प्रकारच्या आहेत आणि वर्षारंभही विविध दिवशी येतात. वर्षगणनाही विविध आहेत. भारतात हल्ली सर्वाधिक वापरात असलेली ग्रेगरीयन कालगणना. त्यानुसार एक जानेवारीला वर्ष सुरू होते. त्या वेळेस अवकाशात चंद्र, सूर्याच्या पृथ्वीसंदर्भातील काही विशेष घटना घडत नाही. महिन्याचे दिवस 28, 30, 31 कितीही असू शकतात, त्याला नियम नाही. सौर वर्ष 365 दिवस सहा तासांचे असल्यामुळे दर चार वर्षांनी वर्षाचा एक दिवस वाढवायचा म्हणजे त्या वर्षी फेब्रुवारी महिन्याचे 29 दिवस. या दिवशीही अवकाशात कुठलीही घडामोड कारण नाही, पण हे सारे सौर वर्ष!
हिंदू कालगणनपद्धतीनुसार चांद्रमास मानतो व वर्ष मात्र सौर वर्ष मानतो. त्यामुळे तो मेळ बसवण्यासाठी दर चार वर्षांनी एक अधिक मास लागतो. त्याशिवाय उत्तरेला महिना पौर्णिमांत आहे, तर दक्षिणेला अमान्त. म्हणजे आपल्याकडे शुक्ल प्रतिपदेला नवीन महिना सुरू होतो, तर उत्तरेला कृष्ण प्रतिपदेला. त्यामुळे दोन्हीकडे चांद्रमास असूनही महिन्यात पंधरा दिवसांचा फरक, त्याशिवाय वर्षकालगणना म्हणजे शालिवाहन शक, विक्रम संवत, जैन संवत अशा कालगणनाही विविध आहेत. वर्षारंभही वेगळे आहेत. आपला नववर्ष दिन चैत्र शुक्ल प्रतिपदा या दिवशी शके 1932 सुरू झाले, तर जैन संवत 2537 आणि विक्रम संवत 2067 हे कार्तिक शुक्ल प्रतिपदेला. अशी कालगणनांची विविधता पाहून राष्ट्रीय पातळीवर काही एक पद्धत असावी, असा विचार विचारवंतांत सुरू झाला.
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 1956 साली मान्यवर शास्त्रज्ञ डॉ. मेघनाद सहा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून सौर कालगणना बनवून घेतली आणि इ.स. 1957 पासून ती सार्वजनिकरीत्या प्रसारात आणली. या कालगणनेची वैशिष्ट्ये म्हणजे यात चांद्रमास म्हणजे पृथ्वीच्या संदर्भात चंद्राची स्थिती अजिबात विचारात घेतली जात नाही. त्यामुळे सूर्यस्थितीवरच महिना आणि वर्ष अवलंबून असल्याने सौर दिन, सौर मास आणि सौर वर्ष म्हटले जाते. सौर कालगणना समजून घेण्यासाठी पृथ्वीच्या संदर्भात सूर्याचे स्थान, सूर्याची भासमान गती आणि पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार रेषेत फिरते आणि ती थोडी कललेली आहे, या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. अवकाशात पृथ्वी सूर्याभोवती एका लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत असते. पृथ्वीच्या या लंबवर्तुळाकार कक्षेमुळे सूर्य या कक्षेच्या केंद्रस्थानी नसून थोडा बाजुला असतो. त्यामुळे चैत्र-आषाढ-अश्विन या काळात पृथ्वी सूर्यापासून दूर असल्यामुळे तिचा वेग कमी आहे म्हणून वैशाख ते भाद्रपद या महिन्यांचे दिवस 31. इतर महिन्यांचे 30, प्लूत वर्षी म्हणजे दर चार वर्षांनी चैत्राचेही 31 दिवस असतात.
सूर्य दक्षिणेच्या मकर वृत्ताकडून कर्कवृत्ताकडे सरकत असतो हा उत्तरायणकाळ. या काळात तो ज्या दिवशी बरोबर विषुवृत्तावर येतो तो वसंत संपात दिन. याचा पुढचा दिवस राष्ट्रीय चैत्र 1 हा राष्ट्रीय वर्षारंभ दिन. सूर्य कर्कवृत्तावर आणि पुन्हा दक्षिणेकडे सरकू लागतो यास दक्षिणायन म्हणतात. या दक्षिणायन काळात तो पुन्हा विषुवृत्तावर येतो तो शरद संपात दिन. याचा पुढचा दिवस राष्ट्रीय अश्विन. या लंबवर्तुळाकार गतीमुळे पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याचा रोजचा वेगही समान नसतो. वसंत संपात ते शरद संपात हा काळ 185 दिवसांचा असतो. तर शरद संपात ते वसंत संपात हा काळ 180 दिवसांचा असतो. म्हणून भारतीय सौर वर्षात वैशाख ते भाद्रपद 31 दिवसांचे महिने आहेत, तर अन्य महिने 30 दिवसांचे केले आहेत.
पृथ्वीवरून दिसणारी सूर्याची ही भासमान वाटचाल सतत चालू असते आणि हे नवे राष्ट्रीय कालमापन सूर्याच्या पृथ्वीसंदर्भातील स्थितीनुसार असते म्हणून हे ‘राष्ट्रीय सौर वर्ष’. ही कालगणना भारत सरकारने मान्य केली आणि सौर 1 चैत्र शके 1679 (22 मार्च 1957) पासून राष्ट्रीय सौर कालगणना म्हणून अमलात आणली.
हल्ली आपल्या पारंपारिक सर्व दिनदर्शिकांमध्ये इंग्रजी तारखेबरोबर सौर दिनांक दाखवले जातात. आकाशवाणीवर हे सौर दिनांक सांगितले जातात. भारतीय रिझर्व्ह बँकेनेही सौर दिनांकीत धनादेश वैध मानण्याचे आदेश सर्व बँकांना दिले आहेत. तरी जोपर्यंत शासकीय अथवा खासगी पातळीवर सर्व व्यवहार सौर कालगणनेनुसार होत नाहीत, मासिक पगार, तसेच रेल्वेचे, बसचे, नाटक-सिनेमाचे आरक्षण आणि आर्थिक ताळेबंद या कालगणनेनुसार होत नाहीत, तोपर्यंत ही राष्ट्रीय कालगणना व्यवहारात येणार नाही. खगोलशास्त्रावर आधारीत अशी ही शास्त्रीय पाया असलेली कालगणना आहे आणि ही कालगणना भारत सरकारने मान्य केलेली आहे. या कारणास्तव ही राष्ट्रीय सौर कालगणना आपण सर्वांनी वापरली पाहिजे आणि इतरांनाही ती वापरण्याचा आग्रह केला पाहिजे.
डॉ. मनोहर मोघे
संपर्क : 022 - 2927 5389
No comments:
Post a Comment