22 November 2010

ती रात्र तो रस्ता


त्या दिवशी दर्यापूरहून मित्राचं पत्र आलं. त्याच्या मुलीचं लग्न ठरलं होतं. त्याने लग्नाला आग्रहाने बोलावलं होतं. पुण्याला आल्यापासून तिकडे विदर्भात जाण्याचा योगच येत नव्हता. अमरावतीला बरेच वर्षे होतो. मित्रांची आठवण यायची. सुरुवातीला पत्रव्यवहार चालायचा, नंतर हळूहळू तोही थांबला. माधवने मात्र कायम पत्रव्यवहार चालू ठेवला. त्याचंच त्या दिवशी पत्र आलं होतं.

मी लग्नाला जाण्याचं अगदी नक्की ठरवून टाकलं होतं. आधी अमरावतीला जाऊन इतरांची भेट झाली नाही तरी चालेल, पण नमुन्यात जाऊन राघोबाला भेटायचं आणि गांधी
चौकातून दर्यापूरची बस पकडायची असं ठरवलं.

राघोबा आणि माझी अगदी छान मैत्री होती. खरं म्हणजे मी नोकरदार आणि राघोबा बांगड्या विकणारा कासार. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या आणि माझ्या वयात जवळजवळ वीस वर्षांचं अंतर. तरीसुद्धा त्याची आणि माझी दाट मैत्री होती. कारण तो फार गोष्टीवेल्हाळ होता. चोराची गोष्ट काढा, तो त्याच्या लहानपणाच्या डाकूंच्या चित्तथरारक गोष्टी सांगे. नाटकाची गोष्ट काढली की तो नाटकात घडलेले किती तरी गमतीदार प्रसंग सांगत असे. वाघाच्या गोष्टीच्या वेळी गावातल्या लोकांनी काठ्यांनी वाघाला कसं ठार केलं ते सांगेल. त्याची सांगण्याची पद्धत अतिशय आकर्षक असायची. ऐकताना वेळेच भानच नसायचं. रात्री अकरा-अकरापर्यंत आमच्या गोष्टी चालायच्या, तरीही त्या संपू नयेत असं आम्हाला वाटायचं.

त्याच्या या गोेष्टी माझ्या खूप उपयोगी पडायच्या. त्याच्या खर्‍या गोष्टींत काल्पनिक गोष्टी मिसळून मी मासिकांसाठी कथा तयार करायचो. म्हणूनच कथा लिहायची असली की माझी पावले आपोआप राघोबाच्या दुकानाकडे वळायची.

नमुन्याच्या गल्लीत तो बांगड्या विकायचा. एका घराच्या भिंतीला टेकवून ठेवलेला त्याच्या बांगड्यांंचा स्टँड असायचा. तो एका लाकडी स्टुलवर बसायचा. समोर गिर्‍हाईकांसाठी दोन-तीन लाकडी खोके असायचे. बसं, हेच ते दुकान! त्याच्या बडबड्या स्वभावामुळे त्याच्या दुकानात बायकांची बरीच गर्दी असायची. कॉलेजला जाणार्‍या मुलीसुद्धा लाकडी खोक्यावर बसून त्याच्याकडून बांगड्या भरून घेत. त्याच्या ‘या’ दुकानात लाईट नसल्यामुळे अंधार पडेपर्यंत गिर्‍हाईकी चालायची. अंधार पडला की मग तो आपला प्रभाकर कंदील पेटवायचा. तो पेटवून झाला की मग खिशातलं बिडीचं बंडल काढून बीडी पेटवायचा. बायकांच्या गर्दीमुळे बीडीची तलफ आली तरी ती त्याला बाजूला ठेवावी लागे. राघोबा कंदील लावून बसायचा तो आमच्यासारख्या टोळभैरवांसाठी. घरी जाण्याची त्याला कधीच घाई नसे. आमच्या गप्पा-गोष्टी सुरू असताना एक-दोनदा चहा तर कधी कधी भजीपण असायची. गुरुवारी वलगावचा आणि शुक्रवारी बडनेर्‍याचे बाजार असल्याने दोन दिवस त्याचं ‘दुकान’ बंद असायचं. या दोन दिवशी तो सकाळपासूनच बांगड्या विकायला बाजारात जायचा.

सातार्‍याहून मला रेल्वेचं रिझर्वेशन न मिळाल्याने सातारा ते पुणे य पुण्याहून अमरावतीपर्यंत बसने जावं लागलं. बसमधून उतरल्यावर चहा-नाष्ट्याच्या भानगडीत न पता जेऊन घेतलं आणि सरळ नमुन्यात आलो. राघोबाला भेटण्याची इच्छा अगदी शिगेला पोहोचली होती. अंधार झाला असल्याने आता तो कंदील लावून बसला असेल आणि कदाचित त्याच्या भोवती गोष्टीवेल्हाळांचं टोळकं बसलं असेल, असं वाटत होतं. जुन्या मित्रांपैकी कोण कोण तेथे भेटतं याचीपण उत्सुकता होतीच.

आज अगदी पोटभर बोलायचं म्हणून मी झपाझप पावलं टाकीत त्याच्या ‘दुकाना’कडे निघालो. नेहमीचा
प्रभाकर कंदील नव्हता, तरीही चंद्राच्या अस्पष्ट प्रकाशात काळी टोपी घातलेला राघोबा मला त्याच्या स्टुलावर बसलेला दिसला. इतक्या दिवसांनी त्याने मला बरोबर ओळखलं. बांगड्यांचा नेहमीचा स्टँड जवळ न दिसल्याने मी उत्सुकतेने त्याला त्याबद्दल विचारलं. तेव्हा त्याने दोन वर्षांपूर्वीच धंदा बंद केल्याचं सांगितलं. मी आणखी काही विचारायच्या आतच त्याने विचारलं, ‘‘आज काल काही लिहितोस की नाही?’’
‘‘लिहितो मधून मधून.’’ मी खरं तेच सांगितलं.
‘‘पाच वर्षांनंतर भेटला आहेस तेव्हा एक घडलेली घटनाच तुला आज सांगतो. कदाचित दिवाळी अंकासाठी तुझ्या कामी येईल.’’ तो हसत म्हणाला. त्याचे बरेचसे दात पडल्याने त्याचे हसणे मला प्रसन्न करणारे वाटले नाही.
‘‘वा! अवश्य सांग!’’ मी तयारीने बसत म्हटले.
राघोबाने अंधारातून दूरवर नजर टाकली. त्याला गंभीर असं काही सांगायचं असलं की तो असाच दूरवर पाहायचा.
‘‘माझ्या आयुष्यातीलच प्रसंग आहे हा.’’ माझी उत्सुकता वाढवत माझ्याकडे न बघता तो म्हणाला.
‘‘तुझ्या आयुष्यातला? मग अवश्य सांग’’, मी म्हटलं.
त्याने अंधारात आपली नजर खोलवर रूतवली. जणू काही अंधारात त्याला काही दिसत होतं. डोक्यावरची आपली काळी टोपी किंचीत मागून वर उचलून त्याने व्यवस्थित डोक्यावर ठेवली आणि सांगण्यास सुरुवात केली.
‘‘गुरुवारचा दिवस होता. वलगावच्या बाजारासाठी मी लवकर निघून गेलो होतो. वटपौर्णिमा शुक्रवारची असल्याने पुष्कळ बांगड्या बरोबर घेतल्या होत्या. संध्याकाळपर्यंत विक्री चांगली झाली. अंधार पडल्यावर मी बाजा
रातून मोटर स्टँडवर आलो. स्टँडवर खूपच गर्दी होती. बाजारात उरलेल्या भाज्यांची तसेच कपड्यांची व इतर सामानांची गाठोडी घेऊन दुकानदार मंडळी बसची वाट बघत होती. अचलपूर, परतवाडा, चांदुर बाजार या गावाहून येणार्‍या गाड्या थांबल्या की झुंबड उडायची. एक-दोघांना गाडी घेऊन गाडी निघून जायची. बसून बसून मी कंटाळलो. लवकर बस मिळण्याची शक्यता नव्हती. रात्रीचे नऊ वाजून गेले होते. तरीपण स्टँडवरची गर्दी कमी होण्याचं लक्षण दिसेना. शेवटी पायीच अमरावतीला येण्याचा विचार केला.’’
‘‘सात-आठ मैल पायी? आणि तेही रात्री?’’ मी आश्चर्याने विचारलं.
राघोबा हसला. डोळे बारीक करून माझ्याकडे आणि समोरच्या अंधाराकडे पाहून त्याने म्हटलं, ‘‘अरे रामभाऊ, मी दहा-बारा वर्षांचा होतो तेव्हापासून वडिलांबरोबर बांगड्यांचं टोपलं डोक्यावर घेऊन गावभर हिंडत होतो. असे मैल मोजत बसलो असतो तर दररोजचे किती तरी झाले असते. त्या वेळी मी तर....’’
‘‘म्हणजे त्या दिवशी तुम्ही रात्री वलगावहून निघाले नाही का?’’ राघोबाला मूळ गोष्टीकडे वळवण्यासाठी मी विचारलं.
‘‘हो. अंधार विशेष नव्हता, पण रस्त्यावरून एकटं जायला थोडी भीती वाटत होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला कडुलिंबाची उंचच उंच झाडं. ती हलल्यानंतर पानातून येणार्‍या चंद्राच्या प्रकाशातून मी पुढे पुढे जात होतो. मधूनच येणार्‍या बसमुळे जरा बरे वाटत होते. थोड्या थोड्या वेळाने मी मागून कुणी येत आहे का हे बघत
होतो. माझ्यासारखाच एखादा कंटाळलेला चणे-फुटाणेवाला आपला डबा काखेत अडकवून येत असावा असे वाटत होते. कुणी आलं असतं तर येता आलं असतं, पण माझ्या दुर्दैवाने मागून कुणीच येत नव्हतं.
लांबून येण्यापेक्षा थोडं अंतर कमी झालं तर बरं होईल म्हणून मी सरळ न येता कॉलेज रोडने वळलो. पण काही अंतर गेल्यावर वाटायला लागलं की उगीचच या रस्त्याने आलो. कारण या रस्त्याने रहदारी अगदीच कमी असते. कडुलिंबाची झाडं हवेमुळे भयानक आवाज करत होती. मी झपाझप पावले टाकत पुढे जात होतो.
‘‘ए भाऊ.’’
बाजूच्या लिंबाच्या झाडाखालून मला अगदी स्पष्ट आवाज आला. माझ्या छातीत धस्स झालं. हृदय इतक्या जोराने धडधडू लागलं की त्याच्या स्पष्ट आवाज मला ऐकू येऊ लागला, पण तशाही परिस्थितीत मी झाडाखाली पाहिलं. थोडी हालचाल झाली. बांगड्यांचा आवाज माझ्या कानावर आला. इतक्या रात्री ही एकटी बाई? कदाचित भूत-बित तर नसेल? आणि या कल्पनेने मी एकदम घाबरलो. मागे न पाहता भरभर चालू लागलो.
‘‘ए भाऊ घाबरू नको. मी भूत-बित कोणी न्हाय. पलीकडच्या शेतातल्या झोपडीत राहणारी आहे.’’ ती म्हणाली.
मी तिच्याजवळ गेलो. आता धडधड थोडी कमी झाली होती. कडुलिंबाच्या झाडाखालील मुरुमाच्या ढिगावर ती बसली होती. तीस-बत्तीस वर्षांची बाई हिरवे लुगडे आणि हिरवी चोळी नेसली होती. गौर शरीरावर पडलेल्या चंद्रप्रकाशामुळे ती विलक्षण सुंदर दिसत होती. इतक्या रात्री ही येथे कशी काय बसली असावी? मला काहीच कळेना. शेवटी मी तिला म्हटले, ‘बाई आता अंधार बराच झाला आहे. येथे कशासाठी बसल्या?’
यावर ती हसून म्हणाली, ‘भाऊ तुमचीच वाट बघत बसली होती. उद्या वटपौर्णिमा आहे ना? मला बांगड्या भरायच्या होत्या. आठ वाजल्यापासून तुमची वाट पाहत बसली आहे.’ आपली बोटे एकमेकांत गुंफत, परत वेगळी करत ती हसत म्हणाली.
‘‘रामभाऊ, अनेक वर्षांपासून किती तरी बायकांच्या हातात मी बांगड्या भरत आलो आहे. किती तरी लांब सडक बोटे मी पाहिली आहेत, पण त्या बाईची बोटे फारच छान होती.’’ राघोबा म्हणाला.
त्याच्या गोष्टीत खंड पडू नये म्हणून मी फक्त ‘हं’ म्हटलं आणि पुढे तो काय सांगतो ते ऐकू लागलो.
‘‘भरानं लवकर बांगड्या. आधीच उशीर झाला.’’ ती हात लांब करत म्हणाली.
‘‘कोणत्या रंगाच्या भरू?’’ मी विचारलं.
‘‘माझ्याकडे बघून तुम्हाला कोणत्या रंगाच्या भराव्याशा वाटतात?’’ तिने मलाच प्रश्‍न केला.
तिचं हिरवं लुगडं बघून मी हिरव्या रंगाच्या बांगड्या काढल्या. ‘‘ह्याच भरू ना?’’, मी विचारलं.
‘‘हां! ह्याच भरा.’’ ती पुढे सरकत म्हणाली.
मी तिचा हात हातात घेतला. हवेमुळे हात चांगलाच गार वाटत होता.
मी बांगड्या भरता भरता विचारलं, ‘‘इकडे कुठे राहता तुम्ही?’’
‘‘ते पलीकडे शेत आहे ना! त्या शेतातली ती झोपडी दिसते ना? त्याच झोपडीत राहते’’, ती म्हणाली.
‘‘मी बांगड्या भरतच होतो. एका मागून एक बांगड्या भरणं सुरूच होतं. दहा-पंधरा-वीस.... मी जसजसा तिच्या हातात बांगड्या भरत होतो, तसतसा तिचा हात लांब होत होता.
शेवटी तिचा हात इतका लांब झाला.’’
मी राघोबाकडे पाहिलं. त्याचा हात पाच फूट लांब होता. मी किंकाळी मारून बेशुद्ध झालो. शुद्धीवर आलो तेव्हा माझ्या भोवती बरेच लोक जमा होते. त्यांना मी विचारलं, ‘‘राघोबा कुठे आहे?’’
‘‘कोण राघोबा?’’, एकाने मला विचारलं.
‘‘तो बांगडीवाला’’, म्हटलं.
‘‘अहो तो दोन वर्षांपूर्वीच वारला.’’

- रामकृष्ण हिर्लेकर
204, हर्ष हौ. सोयायटी, गोकूळ बिल्डिंगजवळ,
महर्षी कर्वे रोड, डोंबिवली (प.) - 421 202
भ्रमणध्वनी : 99303 68370

No comments:

Post a Comment