4 ऑगस्ट 2005. हरकिशन लखानी आदल्याच रात्री आपल्या बिझनेस टूरवरून भारतात परतले होते. एक रात्र मुंबईत काढून दुसर्या दिवशी सकाळीच त्यांनी आपल्या खंडाळ्याच्या बंगल्याचा रस्ता धरला होता. गाडी पार्क करतेवेळी त्यांना बंगल्यात जरा जास्तच वर्दळ दिसली. खाकी वर्दीतील चार-पाच हवालदार इथे-तिथे फिरत होते. कसली तरी मोजमापे घेत होते. हरकिशनभाई विचार करतच गाडीतून उतरले आणि त्यांची भेट इन्स्पेक्टर तावड्यांशी झाली.
‘‘तुम्ही श्री. लखानी का?’’ तावड्यांनी विचारले.
‘‘हो. काय भानगड काय आहे इन्स्पेक्टर?’’
‘‘आय ऍम एक्स्ट्रीमली सॉरी मि. लखानी, आपल्या पत्नी श्रीमती सुनंदा यांचा काल रात्री खून झाला आहे.’’
‘‘ओह नो!’’ हरकिशनभाई मटकन खालीच बसले. तावड्यांनी एकाला पाणी आणावयास पाठवले. नंतर ते हरकिशनभाईंना सावकाश घरात घेऊन गेले. ‘‘लखानीजी, माफ करा. आपल्यासाठी हा एक फार मोठा धक्का आहे, हे आम्ही समजू शकतो. तरी गुन्ह्याचा तपास शक्यतो वेगाने व्हावा म्हणून आम्हास काही गोष्टी करणे भाग आहे. आम्ही सुनंदाबाईंचे प्रेत ताब्यात
घेतले आहे. ते तुम्हाला शवविच्छेदनानंतर साधारण दोन दिवसांनी मिळेल. तुम्ही कृपया घरातील सर्व वस्तूंचा एकदा हिशोब घेऊन काही सामान गहाळ झाले आहे काय ते पाहा. आमची या ठिकाणाची बरीचशी पाहणी पूर्ण झाली आहे. मी उद्या संध्याकाळी परत येईन. तेव्हा मला मिसिंग मालमत्तेची यादी द्या. काही जबान्यासुद्धा घ्याव्या लागतील. मी उद्याच तपशीलवार सांगेन.’’ तावडे पंचनामा पूर्ण करून निघून गेले.
हरकिशन लखानी हे मुंबईतील एक बडे प्रस्थ होते. ‘लखानी उद्योगसमूह’ हे एक प्रख्यात नाव होते. हरकिशनभाई त्याच लखानी कुटुंबातील कनिष्ठ बंधू. जरी प्रमुख अधिकारी हे त्यांचे ज्येष्ठ बंधू, स्वरूपकिशन यांच्या हातात असले तरी हरकिशनभाईंच्या शब्दालाही उद्योगसमूहात मोठा मान होता. विशेष करून तयार कपड्यांच्या
उद्योगाच कारभार हरकिशभाई एकहाती सांभाळत असत. याकरिता त्यांची महिना-दोन महिन्यात एखादी परदेशवारी होतच असे.
हरकिशनभाई साधारणत: पन्नाशीतील गृहस्थ होते. पण त्यांचा कामाचा उरक पाहून लोक त्यांना चाळीशीतीलच समजत. त्यांच्या समाजातील प्रथेप्रमाणे त्यांचे लग्न वयाच्या बावीसाव्या वर्षीच कलावतीदेवींबरोबर झाले. चोवीस वर्षे संसार केल्यावर कलावतीदेवी साध्याशा आजाराच्या निमित्ताने वारल्या. औषधांची अकल्पनीय रिऍक्शन असे निदान डॉक्टरांनी सांगितले. पत्नीच्या निधनानंतर वर्षाच्या आत हरकिशनभाईंनी सुनंदाबरोबर लग्न केले. सुनंदा त्यावेळी अठ्ठावीस वर्षांची होती आणि लखानी ग्रुपमध्येच वरिष्ठ पदावर कार्यरत होती. लग्नानंतर सुनंदा नोकरी सोडून घरीच राहू लागली.
हरकिशनभाईंना कलावतीदेवींपासून नेत्रा नावाची एक मुलगी होती. आईच्या मृत्युच्या वेळी नेत्रा सतरा वर्षांची होती. नेत्राला आपली सावत्र आ
ई कधीच आवडली नाही. या लग्नानंतरच हरकिशनभाईंनी खंडाळ्याची प्रॉपर्टी घेतली होती. सुनंदाबाई बरेचदा खंडाल्यासच असत. त्या जेव्हा मुंबईस येत, नेत्रा काकांकडे राहण्यास जात असे. नेत्राने नुकतेच शिक्षण पूर्ण करून आपल्याच उद्योगात उमेदवारी सुरू केली होती.
सुनंदा या लग्नापूर्वी आपल्या भावाबरोबर बोरिवलीस राहत असे. सुनंदाचा भाऊ मनसुख दलाल एका सी.ए. फर्ममध्ये कामास होता. मनसुखचं छोटं आणि सुखी कुटुंब होतं. पत्नी निशा आणि मुलगा हरीश. सुनंदाचं हरकिशनभाईंशी झालेलं लग्न मनसुखला मान्य नव्हतं. त्यामुळे लग्नानंतर त्याने सुनंदाशी कसलाही संबंध ठेवला नव्हता, पण सहा महिन्यांपूर्वीच सुनंदाने स्वत:चा वीस लाखाचा विमा उतरवला होता ज्याचा लाभार्थी तिने हरीशला केले होते. तसे तिने आपल्या भाईला पत्राने कळवले होते.
या कथेला खरी सुरुवात त्यावेळी झाली, तेव्हा निशा दलाल आपल्या नवर्याची केस घेऊ माझा
मित्र देवदत्त याच्याकडे आली. 5 ऑगस्टची संध्याकाळ. शुक्रवार असल्याने मी नेहमीप्रमाणे देवदत्तकडे कॉफी आणि आठवड्याच्या गप्पा यासाठी गेलो होतो. श्रावणी पाऊस पडत होता. मी जाताना भजी घेऊन गेलो होतो. आमच्या गप्पा चालू असताना संध्याकाळी साधारणत: सातच्या सुमारास बेल वाजली. दाजीने (देवत्तचा नोकर) दार उघडले. दारात निशा दलाल या नखशिखांत भिजलेल्या अवस्थेत उभ्या होत्या. त्या अतिशय घाबरलेल्या आणि गोंधळलेल्या दिसत होत्या. दाजीने त्यांना एक टॉवेल दिला आणि जराशी कॉफी दिली. देवदत्तने त्यांना बसायला सांगितले आणि त्यांचे चित्त जरा स्थिर झाल्यावर त्यांनी आपली कैफियत सुरू केली. पण अजून मी तुम्हाला माझा आणि मुख्य म्ह
णजे देवदत्तचा परिचय करूनच दिलेला नाही. देवदत्त हा एक खाजगी गुप्तहेर आहे. खाजगी गुप्तहेर म्हटल्यावर जी प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते त्याच्या एकदम उलट व्यक्तिमत्त्व. सडसडीत बांधा. अंगात साधेसे कपडे. खांद्यावर बरेचदा शबनम. गुन्ह्याच्या ठिकाणी तपासास लागतील अशा अनेक चमत्कारिक वस्तू त्या शबनममध्ये सापडतील. नोंदवही, अनेक पेनं, भिंग, कॅमेरा, फूटपट्टी, बारीक दोरा, सुतळीचा गुंडा, चाकू, एखादं फळ आणि खोट्या दाढी-मिशासुद्धा. गुन्हेगारांच्या मागावर जाताना मात्र जरा हालचालीस सोपे पडेल असे ढगळ शर्ट पँट आणि त्याच्याजवळ एक अत्यंत आधुनिक असं पिस्तूलसुद्धा आहे. अर्थात त्याचा वापर झालेला मला फारसा आठवत नाही, पण त्याला तायक्वांडो उत्तम येतं आणि त्याचं फार भयानक प्रात्यक्षिक मी एक-दोनदा पाहिलं आहे. पण त्याचं मुख्य शस्त्र म्हणजे त्याच्या सर्व गबाळेपणावर मात करीतल असे त्याचे ते दोन भेदक हिरवट डोळे. ते जेव्हा रोखून तो पाहतो तेव्हा कोणीही त्याच्याशी खोटं बोलूच शकत नाही. पण कसे कोण जाणे एखाद्या साक्षीदाराशी बोलताना तेच डोळे अतिशय आश्वासक भाव व्यक्त करताना मी पाहिले आहेत.
देवदत्त स्वत: शक्यतो कोणत्याही गुन्हेगारास पकडावयास जात नाही. त्याची यंत्रणा मजबूत
आहे. हवे ते पुरावे गोळा करून तो पोलिसांना खबरा देतो. साक्षीपुरावे गोळा करणं आणि त्याआधारे आणि आपल्या तल्लख बुद्धिचा वापर करून गुन्हेगारापर्यंत पोहोचणं हे त्याचं काम. प्रत्यक्ष अटकेची जबाबदारी पोलिसांची. म्हणून गुन्हेगारी जगतात देवदत्तला ‘पँथर’ म्हणून ओळखलं जातं.
मी डॉ. सुलाखे. सूर्यकांत सुलाखे. सध्या जनरल फिजीशियन म्हणून काम बघतो. पण फॉरेन्सिक सायन्सची फार आवड. उच्च शिक्षणासाठी हाच
विषयही घेतला होता. काही वर्षे पोलिसात नोकरी केली. नंतर वैयक्तिक कारणांमुळे सोडावी लागली, पण अजूनही तज्ज्ञ म्हणून काही केसेससाठी जातो. देवदत्तची मैत्री तेव्हाच एका केसमुळे जुळली आणि त्याच्यासारखा स्वतंत्र झाल्यावर पक्की झाली.
तर या कहाणीची सुरुवात होती ती 5 ऑगस्टच्या संध्याकाळी. श्रीमती दलाल जेव्हा देवदत्तला भेटायला आल्या तेव्हा मी तिथेच होतो. गुन्हा 3 तारखेस घडला. त्या सकाळी मनसुख दलाल आपल्या बहिणीस भेटायला खंडाळ्यास गेले होते. तिथून ते 4 तारखेस घरी परतले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते दुपारी तिथून निघाले. पण रात्री त्यांचा निवास कुठे होता, हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. साहजिकच पोलिसांनी त्यांचाच संशय घेतला. त्यांचे आधीच बहिणीशी पटत नव्हते आणि त्या दिवशीही त्यांचे भांडण झाल्याचे नोकराने जबानीत सांगितले हो
ते. शिवाय विम्याचे पैसे हाही मुद्दा होताच. मनसुखभाईंना लगेच अटक झाली.
श्रीमती दलाल अगदी घाबरून गेल्या होत्या. देवदत्तने त्यांना शांत केले आणि त्यांच्याकडून अधिक माहिती घेण्यास सुरुवात केली. ‘‘हे बघा बाई, जर माझ्या मदतीची अपेक्षा असेल तर काही गोष्टी मला स्पष्टपणे तुम्ही सांगितल्या पाहिजेत आणि खोटं बोलण्याचा उपयोग नाही. सुलाख्यांना तुम्ही विचारू शकता की माझं हेरांचं जाळं किती मजबूत आहे. थोडीही खोटी माहिती मी लगेच पकडेन.
‘‘नाही देवदत्तसाहेब. काहीही विचारा. मला माहीत आहे ते सर्व सांगेन.’’
‘‘तर 3 तारखेच्या रात्री श्री. दलाल कुठे होते?’’
‘‘फार कठीण प्रश्न आहे साहेब. पण तुम्हाला म्हणून सांगते. हे एका सी.ए. फर्ममध्ये कामाला आहेत. आता सी.ए. म्हटलं की इंन्कम टॅक्सशी संबंध आलाच. क्लायंट्सच्या
विविध भानगडी असतात. कधी कधी प्रत्यक्ष जावं लागतं. तसे ते खरं तर कंपनीच्या कामासाठी लोणावळ्यास गेले होते. दोनलाच गेले होते. तीन तारखेस जरा वेळ मिळाला म्हणून सुनंदाला जरा समजवायला गेले होते की आम्हाला तुझे पैसे नकोत.
आता हे काम पोलिसांना सांगितलं तर नस्ती भानगड उभी राहायची. पण यांच्याबरोबर कंपनीचा ड्रायव्हर होता. तो देईल साक्ष.’’ बाईंच्या चेहर्यावर खरेपणा दिसत होता.
‘‘मी विश्वास ठेवतो बाई तुमच्यावर.’’’ देवदत्त म्हणाला. ‘‘आता काही प्रश्नांची उत्तरं द्या. पहिलं म्हणजे तुमच्या यजमानांना अटक कुठे झाली आहे?’’
‘‘मुंबईला आमच्या घरीच आले होते पोलीस. पण तपासासाठी खंडाळ्यास नेलंय. मी भेटून आले तिथे.’’
देवदत्तने लगेच फोन फिरवले आणि तावड्यांशी संपर्क साधला. ‘‘हॅलो, मी देवदत्त बोलतोय. सुनंदा लखानी केसवर मी काम करतोय.’’ तावडे सुदैवाने ओळखीचे निघाले. ‘‘तावडे, मी आणि डॉ. सुलाखे उद्या सकाळी खंडाल्याला पोहोचू. मग केस तपशीलवार डिस्कर करू आणि हो, बॉडी ताब्यात दिली का? नाही? गुड. मग सुलाखे एकदा बघतील. नंतरच द्या. उद्या सकाळी भेटूच.’’
देवदत्तने फोन ठेवला आणि माझ्याकडे बघितले. ‘‘तू येशील ना रे सूर्या? मी आपला तुझ्यावतीने बोलून मोकळा झालो.’’
‘‘म्हणजे काय? तुम्ही नुसती आज्ञा करा. बंदा हजर आहे आणि खूप दिवसात प्रेत फाडायलाही मिळालेलं नाही.’’
‘‘आता सांगा बाई, तुम
चे सुनंदाबाईंशी संबंध कधीपासून फाटलेले आहेत?’’, देवदत्त अशा वेळी फारच झटकन मुद्द्यावर येई.
‘‘तिच्या लग्नापासूनच. तिच्यात आणि माझ्या यजमानांच्यात तसं बरंच अंतर आहे. त्यामुळे तिच्या लग्नाचं हेच बघत होते. त्या वेळेपासूनच हिच्याबद्दल आणि हरकिशन लखानींबद्दल काहीबाही बोललं जाई. आम्हालाही दिसत होतं. रात्री उशीरापर्यंत कामाच्या नावाखाली ऑफिसात थांबणं, पार्ट्या, टूर्स, सगळं चालूच होतं. तरी आम्ही थोडंसं दुर्लक्ष करून हिच्यासाठी स्थळ शोधलं. किशोर नावाचा मुलगा होता. चांगली नोकरी होती. एक मुंबईत आणि एक गावाकडे अशी दोन घरं होती. साखरपुडाही ठरला होता. आदल्या दिवशी ऑफिसात गेलो ती परतलीच नाही. नंतर थेट लग्न ठरल्याचं कार्ड. तेव्हापासून आम्ही तिच्याशी बोलतच नाही आणि मग सहा महिन्यांपूर्वी ते विम्याचं पत्र आलं. आम्हाला न विचारताच. आमच्या कुटुंबाला एक शापच होती. मेली तीसुद्धा स्वत:च्या भावाला अडकवून.’’
‘‘बरं. तुमचा कोणावर संशय?’’
‘‘हरकिशन लखानी. तोच. आधी सुनंदासाठी आपल्या पहिल्या बायकोला मारलं. आता आणखी कोणासाठी हिचा जीव घेतला. यामागे त्याचाच हात असणार देवदत्तसाहेब.’’
‘‘बरं. या आता तुम्ही मी उद्या खंडाळ्याला जाणारच आहे. मी तुम्हाला नंतर कळवीनच. बरं जाताना आमच्या दाजींकडे तुमचा पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक देऊन ठेवा.’’
सहा तारखेला दुपारी
आम्ही तावड्यांच्या घरी चहा पित बसलो होतो. ‘‘आता सर्व गोष्टी तपशीलवार सांगा तावडे.’’ देवदत्त म्हणाला. ‘‘आज तुम्ही खूनाची जागा पाहिलीतच देवदत्त. घटनास्थळी सर्वप्रथम लखानींची मोलकरीण पोहोचली. रखमा नाव तिचं. त्यावेळी घरात रखमा आणि सुनंदाबाई दोघीच होत्या. त्यांचा केअरटेकर गोवंडे त्या रात्री नेमका सिनेमाला गेला होता आणि त्यांचा ड्रायव्हर रजेवर होता. खंडाळ्याला एवढीच नोकर माणसं आहेत.
रात्री साधारणत: अकराच्या सुमारास रखमा तिच्या खोलीत झोपली होती. एवढ्यात तिला सुनंदाबाईंच्या ओरडण्याचा आवाज आला. म्हणून ती पटकन उठून पळाली. आवाज स्वयंपाकघराच्या दिशेने आला होता. बाई कुणाला तरी विनवत होत्या की तुला हवे तेवढे पैसे देईन पण मला मारू नकोस. रखमाने हेच शब्द ऐकले आणि बाई पुन्हा किंचाळल्या. रखमा खोलीच्या दारात पोहोचली तेव्हा बाई रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. तिने एका पुरुषाला मागच्या मोरीच्या दरवाजाने पळताना पाहिले. ती परत बाईंच्या जवळ आली. पण तोपर्यंत प्राण गेलेला होता. दहा मिनिटातच गोवंडे तिथे पोहचला. त्याने कुंपणावरून एकाला उडी मारून जातान पाहिले होते. त्यानेच आम्हाला कळवले. दीड वाजता आम्ही तिथे हजर होतो.’’
‘‘मृत्यूची वेळ आपण अकरा धरू. काय सूर्या?’’ देवदत्त.
‘‘मग बारला संपलेल्या सिनेमानंतर गोवंडे दहा मिनिटात कसा घरी पोहोचला?’’ देवदत्त.
‘‘सिनेमा थिएटर जवळच आहे. आम्ही तिकट कंफर्म केलं. आणि रखमाची वेळेची यादी पक्की नव्हती. मृत्यूची वेळ बाराच्या जवळपाससुद्धा असू शकेल.’’ तावडे म्हणाले. देवदत्त यावर काहीच बोलला नाही.
‘‘आणि हत्यार तावडे?’’. आपल्या समाधीतून बाहेर येत देवदत्तने पुन्हा विचारले.
‘‘स्वयंपाकघरात वाप
रण्याची सुरी. प्रेताच्या जवळच पडली होती. पण त्या घरातील नव्हती. रखमा आणि गोवंडे दोघांनी हाच जबाब दिला. बोटांचे कोणतेही ठसे नाहीत. पावलांचे ठसे मिळाले. बॉडी पडलेल्या ठिकाणापासून मोरीच्या दारापर्यंत दोन प्रकाराचे आणि बाहेर एकाच प्रकारचे. फक्त आतील ठसे रखमाच्या पायांशी जुळले. बाहेरील पुरुषाचे असावेत असे बुटांच्या ठेवणीवरून वाटते. रखमाचे उघड्या तळव्यांचे दुसर्या ठशांच्या वर उमटले होते.’’
‘‘गुड. आणखी काही?’’
‘‘एक लॉकेट मिळालं. अर्ध्या हृदयाचं. कुणाचं आहे त्याचा तपास लागला नाही.’’
‘‘मनसुख दलालला तुम्ही पकडलंच आहे. काय वाटतं त्याच्याबद्दल?’’
‘‘चौकशीसाठी धरलंय. सोडून देऊ. काही तरी त्याचं इथं लफडं आहे. पण या केसशी त्याचा संबंध नाही.’’
‘‘खरंय’’, हसून देवदत्त म्हणाला, ‘‘पण मी तुम्हाला अधिक सांगू शकत नाही. बरं इतर कोणी संशयित?’’
‘‘किशोर विरानी.’’ तावड्यांनी एक फोटो समोर टाकला. ‘‘सुनंदाबाईंशी लग्न ठरलं होतं. नंतर जमलंच नाही. काही महिन्यांपूर्वी शेअरमार्केटमध्ये बुडाला. नंतर एक-दोनदा फोन करून बाईंकडे पैसे मागितले होते. एकदा लखानींनी त्याला गुंडाकरवी ठोकलाही होता. त्याने खूनाची धमकी दिली होती. मुंबईत आहे. आमचं लक्ष आहे. वाटलं तर धरू.’’
‘‘अजून कोणी?’’
‘‘नेत्रा लखानी. बाईंची सावत्र मुलगी. 3 ऑगस्ट दुपारी इथे आली होती. बाईंशी भांडण झालं. तिच्या प्रियकरावरून. नंतर परत गेली. रात्री तिच्या प्रियकरासोबतच होती.’’
‘‘आणि ती पैसेही मागणार नाही. रखमाबाईंनी पैशाचा स्पष्ट उल्लेख केला होता.’’ मी म्हटलं.
‘‘आणि हरकिशनभाईंचं काय? त्यांच्या पहिल्या बायकोच्या मृत्यूबद्दल बर्याच वावड्या आहेत.’’ देवदत्तने
विचारले.
‘‘हो. पण त्यांच्याविरुद्ध पुरावा गोळा करणं कठीण आहे. मागच्या वेळचा अनुभव आहेच. पण यावेळी तसे वाटत नाही. त्यांना खरोखरच धक्का बसल्याचं जाणवत होतं.’’ तावड्यांनी त्यांचं मत दिलं.
‘‘बरं हा चोरी-दरोडेखोरीचा प्रकार असण्याची शक्यता किती? काही वस्तू गहाळ आहेत का?’’ देवदत्त.
‘‘बाईंच्या गळ्यातील रत्नहार सोडल्यास काहीच नाही.’’ तावडे.
‘‘म्हणजे सध्या किशोर हाच प्रमुख संशयित आहे तर. पण खरा खुनी कोण ते शोधल्याशिवाय मनसुख दलाल खुनी नाही, हे निर्विवादपणे सिद्ध होत नाही. त्यामुळे खुनी शोधणं या देवदत्तला भाग आहे.’’
रात्री आम्ही हॉटेलमध्ये याच प्रकरणाचा विचार करत होतो. मी शवाची पुन्हा तपासणी केली होती. हत्यारही पाहिलं होतं. रिपोर्ट्स सर्व बरोबर होते. तरीही मला काहीतरी खुपत होतं. मी पडल्यापडल्याच ही बाब देवदत्तला बोलून दाखवली. ‘‘म्हणजे तुला काही शंका आहेत?’’, देवदत्तने ताडकन उठत विचारलं.
‘‘म्हणजे काही फार नाहीत. असं बघ. हत्यारावर काही खुणा नाहीत. पण हातमोजे वापरल्याचं मला वाटत नाही. खुणा नंतर पुसलेल्या आहेत. त्यासाठी काही ऍसिटोनसारखं वापरल्यासारखं वाटलं. म्हणजे बघ.
सुर्याची मूठ प्लॅस्टिकची आहे. ती मला काही ठिकाणी खराब झाल्यासारखी वाटली. हे केमिकल्समुळे होतं दुसरं अतिशय महत्त्वाचं. शरीरावर तीन वार झाले. पोटाच्या भागात. पण मला एकही प्राणघातक वाटला नाही. माझ्या मते बाईंचा मृत्यू हा अतिरिक्त रक्तस्त्रावाने झाला.’’
‘‘म्हणजे खूनी नवखा आहे सूर्या. बहुधा स्त्री. पुरुषाचे घाव जास्त खोल जातील. म्हणजे नेत्राला सोडून चालणार नाही. पण रखमाच्या मते बाई लगेच मरण पावल्या होत्या.’’ देवदत्त.
‘‘कदाचित बेशुद्ध झाल्या असतील. नंतर गोवंडे येईपर्यंत जीव गेला असेल.’’ मी.
‘‘शक्य आहे. पण आता आपण उद्या विचार करू. उद्याला खूप कामं आहेत.’’
दुसर्या दिवशी तावडे सकाळी चहालाच हजर होत. ‘‘देवदत्त, न्यूज! किशोरच्या घराची आम्ही झडती घ्यायला सांगितले होते. 3 तारखेचे सिंहगडने पुण्याला गेल्याचे एक तिकिट सापडले. आम्ही लवकरच त्याला धरू.’’ तावडे चांगलेच उत्तेजित झाले होते.
‘‘उत्तम तावडे. एक दिशा मिळाली आणि सुलाख्यांकडेसुद्धा तुमच्यासाठी न्यूज आहे. खून हा सराईत व्यक्तीने केलेला नाही. खूनी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या फारशी सक्षम नसावी. एखादी स्त्री असण्याची शक्यता जास्त. किशोर जर खूनी असेल तर कोणी तरी स्त्रीसुद्धा सहभागी आहे. तिला शोधता आले तर बरीच कोडी सुटतील. बरं, एक अजून काम करा माझं. जरा रखमा आणि गोवंडे या दोघांच्याही मागे एक हवालदार लावा. त्यांची काय लफडी आहेत काय त्याची माहिती घ्या. काय आहे, यांची माहिती जरा मिळाली तर आपल्याला खूनाविषयी अजून डिटेल्स कळतील.’’
‘‘सूर्या, आज तू बंगल्यावर येणार का? काल तुझा दिवस शवागारातच गेला. आज तिथे हरकिशनदास आणि नेत्रा दोघेही असतील.’’
बंगल्याच्या दाराशीच नेत्रा लखानी भेटल्या. त्यांना दु:ख झाल्याचं अजिबात दिसत नव्हतं. त्यांच्याशी आमचं जुजबी बोलणंच झालं. तीन तारखेला दुपारी आल्याचं त्यांनी कबूल केलं. हरकिशनभाईंशी त्यांचे काही काम होते. चार तारखेला त्या बेंगळूरास जाणार असल्याने त्यांनी काही कागदपत्रे खंडाळ्यास गोवंडेंच्या हवाली करावी असा विचार केला होता. पण सुनंदाबाई भेटल्या आणि भांडण झालं. रात्री अंशुलबरोबर असल्याचे त्यांनी मान्य केलं. कदाचित वडिलांशी सर्वच बाबतीत स्पष्ट बोलणं झालं असावं.
हरकिशनभाईंशी फार काही बोलण्यासारखं नव्हतं. किशोरचे फोन साधारण किती महिन्यांपूर्वी आले हेच देवदत्तने विचारलं. त्यांच्या आठवणीप्रमाणे हे सर्व प्रकरण साधारणत: दोन महिन्यांपूर्वीचं होतं. त्यावेळी त्याने पाच-सात वेळा फोन करून त्रास दिला होता. पोलीस कंप्लेंट करून जरा हिसका दाखवल्यावर हे प्रकार थांबले होते.
नंतर देवदत्तने आपल्या शबनममधून टेप काढून अंतरे मोजण्यास सुरुवात केली. त्याने स्वयंपाकघर ते बेडरूम, नोकरांच्या खोल्या अशा अनेक चकरा मारल्या. भिंग घेऊन खुनी ज्या दाराने पळाला त्याची पाहणी केली. चांगले दोन तास घालवल्यावर त्यांचं समाधान झालं. निघताना त्याला अचानक काय आठवलं काय माहीत. त्याने एकदम रखमाला बोलावलं.
‘‘रखमा, बाई नेमकं काय ओरडत होत्या ते पुन्हा एकदा सांगशील?’’
‘‘नको, नको. मला मारू नकोस. हवे तेवढे पैसे घे पण मला सोड.’’ असं म्हणाल्या बाईसाहेब.
‘‘किती वेळा?’’ देवदत्त
‘‘एकदाच आणि मग किंकाळी ऐकू आली.’’ रखमा.
‘‘बरं जा तुम्ही आता.’’ देवदत्त म्हणाला आणि काही न बोलता एकदम निघाला. जेवायच्या वेळी आम्ही लॉजवर परत आलो होतो. दुपारी जेवणानंतर गोवंडे आले होते. थोहा माल आणि थोडा धाक दाखवल्यावर बोलायला लागले. त्यांनी किशोरची वेगळीच माहिती सांगितली. ही भानगड साधारण दोन महिन्यांपूर्वी उपटली होती. किशोरला धडा शिकवायचा प्रयत्न हरकिशनभाईंनी केला होता, पण ते परदेशी गेल्यावर सुनंदाबाई किशोरला दोन-तीनदा भेटल्या होत्या. त्यांनी त्याला काही पैसेही दिले असे गोवंडेचे म्हणणे होते.
काही महिन्यांपूर्वी का कोण जाणे बाईंना उपरती झाली होती. कदाचित हरकिशनभाईंच्या वाढत्या वयामुळे त्यांच्यात वितुष्ट आले असेल. त्यांचे एखादे लफडे असण्याचीही शक्यता होती. या सर्वांमुळे बाई जराशा वैतागलेल्या असत. ते विम्याचे प्रकरणसुद्धा यामुळेच असावे असे गोवंडेंचे मत होते, पण किशोरच्या बाबतीत काही वेगळा प्रकार असावा असे त्यांना वाटत होते. किशोर एकदा घरी आला होता तेव्हा त्यांनी अर्ध्या बदामाचे लॉकेट पाहिल्यासारखेसुद्धा त्यांना वाटत होते.
देवदत्तने त्यांना रखमाबद्दलही विचारलं. त्यांचं मत फारसं चांगलं नव्हतं. ती सतत छोट्या-मोठ्या उचल्या करीत असे, असा त्यांचा संशय होता. तिच्या कामाविषयीसुद्धा ते फार खूश नव्हते. पण या प्रकरणाबद्दल संशय घेण्यासारखं त्यांना काही वाटत नव्हतं. त्यांच्या मदतीबद्दल पुन्हा एकदा ‘विशेष धन्यवाद’ देऊन देवदत्तने त्यांची बोळवण केली.
‘‘आपलं इथलं काम संपलंय.’’ गोवंडे गेल्यावर एकदम देवदत्तने जाहीर केलं. लगोलग त्याने तावड्यांना फोन लावला. अर्धा तास बोलल्यानंतर भेटूनही आला. आल्याआल्या काही न बोलता सामान आवरायला घेतलं. आम्ही संध्याकाळी मुंबईच्या वाटेवर होतो. जाताना त्याने पुन्हा एकदा तावड्यांना फोन केला. दुसर्या दिवशी मुंबईस येण्याचं निमंत्रण केलं. ‘‘येताना जरा रखमा आणि गोवंडेंना आणा आणि त्या किशोरलाही बोलावणं धाडा.’’
आठ तारखेस सकाळीच उठून देवदत्त बँकेत गेला. तिथून पोलीस स्टेशनलाही गेला. संध्याकाळच्या कार्यक्रमाची जोरदार तयारी चालली होती. मी संध्याकाळी जरासा आधीच पोहोचलो. माझ्या पाठोपाठच एक अतिशय सामान्य दिसणारा असा साधारण चाळीस-बेचाळीस वर्षांचा माणूस आत आला. त्याचे डोळे खोल गेले होते आणि डोळ्यांखालील काळी वर्तुळसुद्धा दिसत होती. तो किशोर होता हे मी त्याला पाहताच ओळखलं. थोड्याच वेळात तावडेसुद्धा पोहोचले.
‘‘थोडा वेळ थांबा सर्वजण. आमचे क्लायंट येऊ देत.’’ देवदत्तबाहेर येत सर्वांना म्हणाला. इतक्यात श्री. मनसुख आणि निशा दलालही तिथे हजर झाले.
‘‘आता तरी सांगा देवदत्त कोणी खून केला ते?’’ तावडे म्हणाले.
‘‘सांगतो. पण त्यापूर्वी रखमाबाई जरा त्या रात्री काय घडलं ते पुन्हा एकदा तपशीलवार सांगा बरं. तसं मी बजाकडून माहीत करून घेतलंय. पण तुम्ही सर्वांना तुमच्या जबानीत सांगा.’’ देवदत्त.
बजाचं नाव निघताच रखमाचा धीर सुटला. ‘‘मी गुन्हा कबूल करते साहेब. बाईंचा खून मीच केला.’’ सर्वचजण अवाक् झाले.
‘‘असं नाही बाई. तपशीलवार सांगा.’’ देवदत्तने फर्मावलं.
‘‘बाईंचं या साहेबांसोबत लफड होतं साहेब. बाईंनी यांना पैसेही दिले होते. एक-दोनदा मीच हे काम केलं होतं. मग मलाही पैशाची हाव सुटली. मी बाईंकडून वेळोवेळी पैैसे उकळायला लागले. त्याच सुमारास माझी बजाशी ओळख झाली. मग आम्ही एकदाच मोठा डल्ला मारायचं ठरवलं. पण बाई राजी होत नव्हत्या. त्या दिवशी इतर कोणीही घरी नव्हतं. गोवंडेंनीही सिनेमाचा कार्यक्रम आखला होता. आम्ही तीच रात्र ठरवली. बजा अकरा वाजता येणार होता. मी त्यापूर्वी बाईंशी पुन्हा एकदा बोलले. त्यांनी नकार दिला. मी बजानं दिलेली सुरी घेऊन त्यांना धाक दाखवण्याचा प्रयत्न केला. पण त्या बधल्या नाहीत. शब्दाने शब्द वाढला आणि मी त्यांच्यावर वार केला. तेवढ्यात बजा पोहचला. मग त्यानेच हा सर्व दिखावा रचला. ते अर्ध्या हृदयाचं लॉकेटही त्याचंच.’’ रखमा पूर्ण तुटली होती.
‘‘घ्या तावडे तुमचा गुन्हेगार.’’ देवदत्त म्हणाला. ‘‘बजाला पुणे पोलिसांनी आधीच ताब्यात घेतलं आहे.’’
‘‘काय ट्रिक होती देवदत्त?’’ सर्वजण गेल्यावर मी विचारले.
‘‘सगळ्यात महत्त्वाचा क्लू तूच तर दिलास. खुनी व्यक्ती स्त्री असावी, हे तुझं मत माझ्यासाठी फारच महत्त्वाचं ठरलं. तुला आठवतं पहिल्याच भेटीत मी तावडेंना वेळामधील गोंधळाबद्दल बोललो होतो. कुठल्याही कामाला लागणारा वेळ हा या तपासात महत्त्वाचा मुद्दा ठरला.’’ देवदत्त.
‘‘समजावून सांग जरा. काहीच कळत नाही.’’ मी पुन्हा विचारलं.
‘‘पहिल्या प्रथम मी जी गोष्ट पाहिली ती म्हणजे रखमाची खोली आणि स्वयंपाकघरातील अंतर. पहिली किंकाळी ऐकल्याबरोबर रखमा लगेच धावली. ती अर्ध्या मिनिटाच्या आत घटनास्थळी पोहचली पाहिजे, पण सुनंदाबाई एक मोठं वाक्य मध्ये बोलल्या. नंतर अजून एकदा किंकाळीचा आवाज आणि मग खून. या सर्वासाठी खूप जास्त वेळ लागतो. खून्याचे एकूण तीन वार केले याचाही विचार कर.’’
‘‘याचा अर्थ रखमाची जबानी खोटी होती.’’
‘‘बरोबर सूर्या. पुढची गोष्ट म्हणजे मृत्यूचं कारण. जर अतिरक्तस्राव हे कारण असेल तर तो गोवंडे येण्याच्या आधी दहा मिनिटे शक्य नाही. किमान साडेअकराला खून झाला. गोवंडेनी एक पुरुष पळून जाताना पाहिला, तो बजा होता. रखमाच्या आताच्या जबानीप्रमाणे खून झाल्यानंतर बजा तसा लगेच पोहचला होता. सर्व रचना ठीक करायला त्यांना अर्धा तास लागला असणं शक्य आहे.’’
‘‘या पुढचं काम सोपं होतं. रखमाच्या मागे माणूस लावलाच होता नंतर बजामागेही लावला. बजा एका झेरॉक्सच्या दुकानात कामाला होता. तिथूनच त्याने टोनर केमिकल मिळवलं ज्याने सूरीची मूठ साफ करण्यात आली. खून झाला चुकून, पण बजा पूर्ण तयारीत होता. खूनाचं कारण कळणे आवश्यक होतं. गोवंडेंच्या साक्षीनंतर मी किशोरच्या मागे लागलो. त्यातून मला त्याचे सुंनदाबाईंशी असलेले संबंध तपशीलवार कळले. रखमाचा संबंधही लक्षात आला. बाकी रत्नहार आणि ते अर्ध्या बदामाचे लॉकेट म्हणजे दिशाभूल करण्याचा प्रयत्न होता. मग काय बजाला पकडलं आणि पुढे तू पाहिलंसच. रत्नहारही त्याच्याकडेच मिळाला.’’
‘‘म्हणजे देवदत्तच्या यादीत अजून एका केसची भर’’, मी म्हटलं. ‘‘वाईट त्या किशोरचं वाटतं. एकदा हरकिशनभाई आणि आता रखमामुळे सुनंदा त्याला दुरावली आणि दोन्ही वेळा पैसाच कारण ठरला.’’
हर्षल
भ्रमणध्वनी : 97699 23922
No comments:
Post a Comment