‘‘साहेब, जरा गाडी बाजूला घेता का? मला गाडी काढायची आहे.’’
अनेक वर्षांपूर्वी ऐकलेल्या ओळखीच्या आवाजामुळे मी चमकून मागे पाहिले. माझा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसेना. जवळजवळ पंचवीस वर्षांनी आमची भेट होत होती. तीही अचानक आणि अनपेक्षितपणे. अचानक कशाने कंपनी बंद पडल्याने आणि घरच्या परिस्थितीमु
ळे गावी परत जावे लागल्यामुळे सदा सरवदेची परत कधी भेट होईल, असे कधीच वाटले नव्हते. अनपेक्षित अशा कारणाने की इतक्या वर्षांनी तो अशा रूबाबात भेटेल, अशी कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. कदाचित त्यानेही कधी केली नसेल. त्यामुळेच एकमेकांना भेटल्यावर आम्ही दोघेही इतके आश्चर्यचकित झालो की पहिल्यांदा कोणी, कोणाशी, कसं आणि नक्की काय बोलायचं. म्हणूनच एकमेकांना भेटल्यावर आम्हा दोघांनाही सूचत नव्हतं.
‘‘सर, आपण समोरच्या हॉटेलात चहा घेऊया का? प्लीज नाही म्हणून नका.’’
‘‘अरे वेडा आहेस का? मी नाही कशाला म्हणेन? पण एका अटीवर, बील मी देणार.’’
‘‘साहेब, तो नंतरचा प्रश्न आहे. आधी चला तर!’’
पूर्वी इतकंच बोलणारा सदा चालतानाही अंतर ठेवूनच माझ्या पाठोपाठ हॉटेलात शिरला. एका छोट्या टेबलाजवळ आम्ही समोरासमोर बसलो. जराही वेळ न घालवता आणि मुख्य म्हणजे मला न विचारता आणि परवानगी गृहीत धरूनच वेटरला त्याने स्पेशल चहा आणि कांदा भज्यांची ऑर्डर दिली.
‘‘बोल सदा, अरे हे झकपक कपडे, गाडी, काही सांगशील की नाही?’’ इतक्या वेळानंतर माझ्या चेहर्यावरचे आश्चर्य जरा कमी झालं असलं तरी उत्सुकता तशीच होती. इतक्या वर्षांनंतर सदा सरवणेमधला अमुलाग्र बदल मी अजूनही समजावून घेण्याचा प्रयत्न करत होतो.
‘‘सांगतो साहेब, म्हणून तर त्रास दिला तुम्हाला थांबण्याचा.’’
‘‘अरे त्रास कसला त्यात? बोल लवकर.’’
‘‘साहेब तुम्हाला आठवतच असेल की आपली कंपनी बंद पडली तेव्हा तुमच्यात हाताखाली तुमची सगळी कामं करत होतो. अगदी तुमचं केबिन नीटनेटकं ठेवण्यापासून ते दर दहा तारखेला बँकेमधून तुमचा पगार काढून आणण्यापर्यंत. पगार काढून आणला रे आणला की आपल्या डिपार्टमेंटसाठी दर महिन्याला न चुकता तुम्ही स्पेशल चहा आणि गरम गरम भजी मागवत होतात. ती ऑर्डरची मीच द्यायचो.’’
आता माझ्या लक्षात आलं की सदाने इतकी झटपट आणि बरोबर ऑर्डर कशी दिली ते. सदा सरवदे त्यावेळी नोकरीच्या शोधात सोलापूरजवळच्या बार्शीहून थेट पुण्याला आला. शिक्षण जेमतेम पाचवी-सहावीपर्यंत झालं असेल-नसेल. पण वागण्या-बोलण्यात अतिशय अदब आणि नम्रता होती. पांढरा स्वच्छ लेंगा आणि शर्ट डोक्यावर पांढरी टोपी अशा अगदी साध्या पोशाखातूनही त्याची स्वच्छता आणि टापटीपपणा जाणवत होता. केव्हाही आणि काहीही काम सांगा झटपट आशि व्यवस्थितपणे करून पुन्हा हसतमुखाने समोर हजर व्हायचा जणू काही त्याने शिकलेल्या चार बुकात आराम आणि आळस हे शब्दच लिहिलेले नव्हते.
‘‘हं बोला सदाभाऊ’’ मी म्हणालो.
‘‘साहेब कृपा करून मला अहोजाहो करू नका. मला अवघडल्यासारखं होतं. तुमच्यासाठी पूर्वीचा सदाच राहू दे.’’
पूर्वीच्या कंपनीमधला पांढर्या युनिफॉर्ममधला सदा आणि आता माझ्यासमोर पांढर्या सफारीमधला सदा यांच्यामध्ये तिळमात्र फरक नव्हता. नाही म्हणायला सायकलच्या जागी कार तीही पांढरी-स्वच्छच! सदा जणू
मला सूचवत होता की देश आणि वेष बदलला तरी स्वभाव बदलत नाही.
‘‘साहेब तुमच्या लक्षात असेलच की आपल्या कंपनीत लागलो तेव्हा मी एकटाच पुण्यात राहत होतो. आई, वडील बार्शीला होते. वडील आमची छोटीशी शेती सांभाळून वैरागच्या साखरकारखान्यात गळीपाच्या हंगामात कामही करायचे. पण आपली कंपनी बंद पडायला आणि वडील जायला एकच गाठ पडली. तुमच्यासारख्यांना लगेच दुसरी नोकरी मिळाली असणारच. मला माहीत आहे कदाचित तुम्ही मला तुमच्या नव्या कंपनीत नोकरीला ठेवून घेतलं असतं, पण माझी आई गावाकडची ‘काळी आई’ सोडायला काही केल्या तयार होईना. वडील व नोकरी दोन्ही गमावले. म्हणतात ना की संकटं येतात तेव्हा हात धुवूनच येतात. पण त्याही परिस्थितीत जरा मन आणि डोकं शांत ठेवून विचार केला की संकटाकडे जर संधी म्हणून पाहिलं तर? कोणी सांगावं पांडुरंगाच्या मनात काही वेगळं नसेल कशावरून?’’
मी सदाकडे थक्क होऊन पाहत होतो. त्यावेळचा पंचवीशीतला सदा जीवनाबद्दल इतकं साध तत्त्वज्ञान कोठे बरं शिकला असेल? मला वाटतं गरिबीचं माणसाला घडवण्याचं काम करते.
‘‘सदा, पुढे काय झालं ते सांगशील का?’’ साहजिकच माझी उत्सूकता आता आणखीनच वाढली होती.
‘‘साहेब आपण भजी आणि चहा परत मागवूया का?’’
‘‘ठीक आहे.’’
‘‘तर मी काय सांगत होतो? दोन-चार वर्षं कशीबशी ठीक गेली, पण तेवढ्यात आईच्या आग्रहाखातर लग्न करावं लागलं आणि पुढच्या दोन-चार वर्षांत खाणारी आणखी दोन तोंडं वाढली. मग काय सांगू साहेब? आधीच सोलापूर दुष्काळी जिल्हा माझ्या मगदुराप्रमाणे शेतीत थोडीफार सुधारणा करतच होतो. त्यामध्ये गाठीशी पैसे संपत आले. हळूहळू कर्जाचा बोजाही वाढत चालला आणि वययुद्धा कमाई चार आणे आणि खर्चाचा बंदा रुपया. नोकरीचे दोर अपुर्या शिक्षणाने व वाढत्या वयाने केव्हाच कापले गेले होते. आता धड ना शेती ना नोकरी. नो तळ्यात ना मळ्यात. काही सुधरेना बघा.
अशातच हताश होऊन शेतावरून घराकडे यायला निघालो. फार थकवा आला म्हणून घोटभर चहा घ्यावा म्हटलं तर जवळपास येकपण टपरी दिसेना. तेवढ्यात सोलापूर-बार्शी सुपरफास्ट एस्टी बाजून निघून गेली आणि साहेब विठ्ठलाची शप्पथ सांगतो रणरणत्या वैशाखाच्या उन्हातही डोक्यात वीज चमकून गेली.
म्हटलं आपल्या नेमका पाहिजे तेव्हा कपभर चहा मिळेना आणि इथं तर दिवसाकाठी पन्नास एक एस्ट्या, शेकड्यांनी बैलगाड्या आणि पायी चालणारी माणसं जातात. त्यांना जर चहा प्यावासा वाटला तर काय करत असतील? साहेब, चक्क दुसर्या दिवशी घराकडून चहाच्या टपरीसाठी लागणारं सामान-सुमान आणलं. माऊलीच्या फोटोला हार घातला आणि केली की सुरवात. रोजच्या सुरवातीच्या पन्नास कपांचे बघता-बघता शंभर-दीडशे कप झाले. म्हणतातना चहाची वेळ झाली की माणसाला फक्त चहाच लागतो, दुसरं काहीही चालत नाही. अगदी अमृतसुद्धा. म्हणूनच कदाचित चहाला पृथ्वीवरचं अमृत म्हणत नसतील?’’ सदा जसजसा बोलत होता तसतशी त्याची कहाणी आणखीनच ऐकावीशी वाटत होती.
‘‘मग काय चहाबरोबर गिर्हाईकांना खाण्यासाठी काही बाही ठेवायला, सुरुवातीला बटर, मग बटाटे वडे, वडापाव; चहाच्या टपरीचं छोटं हॉटेल झालं. मारुतीरायाच्या शेपटासारखा पसारा वाढायला लागला आणि गिर्हाईकसुद्धा. पण मराठी असूनही आपण एक गोष्ट ठरवली. गिर्हाईक जोडायची, तोडायचं नाही. त्यासाठी जिभेवर साखर ठेवायची आणि डोक्यावर बर्फ. बाकी विठ्ठलाच्या हाती!
मग काय विचारता? हॉटेलाचाही पसारा हळूहळू वाढायला लागला. बायका-मुलंही मग हॉटेलकडे बघायला लागली. मघाशी तुम्हाला सांगितलं तसं देवाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं एवढं नक्की! म्हणून तर त्या चोच देणार्याने चार्याचीही सोय करून ठेवलेली होती.’’ असं म्हणून सदाने बसल्या जागीच डोळे मिटून पंढरपूरच्या दिशेने नमस्कार केला. तो विठुरायाला नक्कीच पोहोचला असणार, कारण शेवटी ‘भाव तेथे देव!’
‘‘अरे पण गाडी वगैरेचं काय?’’ मी विचारलं.
‘‘त्याचं काय झालं साहेब, मी नाही म्हटलं तरी कमाई वाढत होती. पण आम्ही पिढीजात माळकरी अन् टाळकरी. त्यामुळे सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाही. जेवणखाण म्हणाल तर साधंच, अगदी सणासुदीला गोड झालं तरच! त्यामुळे पैसाही बर्यापैकी गाठीला साठत गेला, बरं भाकरीला काय मोडाला तिकडून तोंड आणि येणार्या पैशाला काय जायला दहा वाटा - रावणाच्या तोंडासारख्या. साठवलेला पैसा कापरासारखा केव्हा उडून जाईल त्याचा नेम नाही. त्यातून हॉटेलच्या जोडीला म्हणून कॅटरिंग सुरू केलं, पुण्याकडचे व सोलापूरमधले दोन-चार हॉलही बांधून घेतले. हॉटेल व कॅटरिंगमध्ये मिळून शंभरेक माणसं पोटाला लागली. खर्या अर्थाने ‘अन्नदाता’ झालो.’’
हे सांगताना सदा त्याच्या सोनेरी चष्म्यातून अतिशय निरागसपणे हसला.
‘‘मग काय पैशाच्या दुथडी भरून वाहणार्या चंद्रभागेवर धरण बांधायचं ठरवलं, थोडा जमीन-जुमला घेतला, बायका-मुलांच्या नावाने दोन-चार राहायच्या जागा घेतल्या. आर्थिक स्थैर्याच्या पाठोपाठ सुबत्ता आली. मग मुलांच्या वाढत्या संसाराचीही चिंता राहिली नाही.
पण इतकं सगळ होऊनही एक शल्य मनाला स्वस्थ बसू देईना.’’
‘‘आता काय?’’ मलाही राहावेना.
‘‘अर्धवट शिक्षणामुळे आमच्या नशिबात खुरडणं आलं. तुमच्यासारख्या देवामाणसांच्यामुळे ते सुसह्य झालं ते ठीक. वेळच्या वेळी स्वत:ला सावरल्यामुळे मुलांनाही शिकवता आलं आणि तीही धंद्यात आली, पण नंतर लक्षात आलं की आजही आपल्याकडे अशी कितीतरी दुर्दैवी मुलं आहेत की जी हुशार असूनही केवळ घरच्या परिस्थितीमुळे ‘तुही यत्ता कंची?’ असा प्रश्न विचारायची वेळ त्यांच्या बाबतील अजूनही येते. मग माझ्या मनात विचार आला की आपण उपाशी राहून दुसर्याला जेवायला घालण्याइतके कदाचित आपण मोठे नसू, पण आपल्या ताटातलं चार घास दुसर्यासाठी काढून ठेवण्याइतकी ताकद, कुवत आणि दानत देवाने नक्की आपल्याला दिली आहे.’’ सदाच्या तत्त्वज्ञानाने मी भारावून गेलो.
‘‘म्हणून ठरवलं की अशा मुलांना शिकवायचं. सुरवातीला माझ्या हॉटेलात काम करणार्या मुलांना स्वखर्चाने शाळेत पाठवलं मग हळूहळू छोटीशी शाळा सुरू केली. गरजा वाढत वाढता शाळेसाठी कॉलेज काढलं. बघता बघता शिक्षणसंस्था उभी राहिली. आता तर इतकं समाधान वाटतंय की सांगायला व ते करून घेणार्या ‘पंढरीनिवासा’चे आभार मानायला शब्दच नाहीत.’’
इतका वेळ अखंड बोलणारा सदा गहिवरला आणि हळूहळू शांतही झाला. खिशातून परीटघडीचा रूमाल काढला व चष्मा काढून त्याने आनंदाश्रूंना वाट करून दिली.
मीही त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हणालो, ‘‘अरे ज्ञानदानाच्या पवित्र कार्याला तुजा हातभार लागला. दानासाठी धनापेक्षा मनाची श्रीमंती लागते. तुझ्याकडे तर दोन्हीही आहे. मला तुझ्या भाग्याचा हेवा वाटतो.’’
सदाची कथा ऐकून माझे मन परत पंचवीस वर्षे मागे गेले. त्यावेळच्या व आताच्या सदामध्ये जमीन-अस्मानचा फरक होता. अगणित संकटे एकामागोमाग आली म्हणून गुडघ्यात मान घालून नशिबाला दोष देत रडत आणि कुढत बसला नाही. परिस्थितीला हतबल होऊन शरण जाण्याऐवजी स्वत:च्या सामर्थ्याने परिस्थितीचा प्रवाहच बदलला. मला कुसुमाग्रजांच्या ‘कोलंबसचे गर्वगीत’मधील ओळ आठवली, ‘अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् अशा, किनारा तुला पामराला’ खरोखरच जवळजवळ वर्षभर खवळलेल्या समुद्राशी झुंज देऊनही यश न आल्याने कोलंबसने अमेरिकेचा शोध थांबवला असता तर कोणी त्याला दोष दिला नसता, पण मग त्याचे नावही जगाच्या इतिहासात अजरामर झाले नसते.
शिपायापासून ते खर्या अर्थाने शिक्षणमहर्षी होणे म्हणजे आकाशाला गवसणी घालण्यासारखेच होते. क्षीतिजाचा पल्ला दृष्टिपथातही नसताना नियतीने जटायुसारखे पंख कापूनही त्यान गरूडझेप घेतली. म्हणतात ना आकाशात वादळाची चाहूल लागली की चिमणी, कावळे आपापल्या घराचा आसरा घेतात, पण पक्षीराज गरूड मात्र आपले पंख फैलावून सूर्यावरसुद्धा सावली धरायचा प्रयत्न करतो. सदा सरवदेने यापेक्षा वेगळे काय केले? वेगळे केलेच असेल तर इतकंच आकाशात झेपावूनही जमिनीवरची नजर काढली नाही. फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून पूनर्जन्म घेऊनही त्याच राखेचा अंगारा करून तो रंजल्यागांजल्यांच्या कपाळी लावला. पण ‘मला साधू म्हणून ओळखा’ असा अट्टाहास सोडाच, साधा आग्रह किंवा अपेक्षाही केली नाही. स्वत:चा विकास करताना समाजाचेही ऋण फेडले. एका अर्धशिक्षित माणसाची शिक्षणसंस्था उभारण्यापर्यंत मजल गेली आणि ‘परोपदेशे पांडित्यात’ समाधान मानणार्या पुस्तकी पंडितांना काहीही न बोलता प्रत्यक्ष कृतीने त्याने आपली जागा दाखवून दिली.
आम्ही हॉटेलातून बाहेर पडलो. भररस्त्यात काहीही न बोलता सदाने माझ्या पायांना हात लावला आणि झटकन माझा हात खिशातल्या रूमलाकडे केव्हा गेला ते माझं मलाच कळलं नाही.
- मुकुन्द सराफ
अनिकेत सहनिवास,
विलेपार्ले (पू.) मुंबई - 400 057
भ्रमणध्वनी : 99672 75375
No comments:
Post a Comment