23 November 2010

अरे खोप्यामंदी खोपा...


श्रावणसरींनी आज सकाळपासूनच बरसणे सुरू केले होते. ही घटना आहे 1993 सालच्या सप्टेंबर महिन्यातील. ‘श्रावणात घन निळा बरसला, रिमझिम रेशीम धारा’, असे ते त्याचे बरसणे नव्हते. ‘बरखा रानी जरा जमके बरसो, मेरा साजन जा न पाये इस तरहा बरसो’, असे हे कोसळणे होते. आकाशात काळ्या मेघांचे पुंजके, कासेमध्ये दूध जमा व्हावे तसे साकळत होते. पान्हा दाटलेल्या सहस्रावधी स्तनाग्रातून दुग्धधारा फुटाव्या तशा श्रावणधारा धरतीवर बरसत होत्या. मनातील श्रावणगाणी अलगद ओठावर येऊन पुन्हा पुन्हा मनातच गायली जात होती. बैठकीच्या छपरीत बसून मी जलधारांच्या कथ्थक नृत्याचा, दृतलयीतील तराना अनुभवत होतो. विविध पानांवर टपटपणारे पावसाचे टपोर थेंब तबल्यासारखी साथ संगत करीत होते, थडथडणार्‍या वीजेच्या टिपर्‍याचा ढगांच्या नगार्‍यावर आदळून होणारा घनगंभीर निनाद सारा आसमंत आणि धरतीला हादरवून टाकत होता. मंत्रमुग्ध होवून सारे डोळ्यात नि कानात साठवत होतो.

गाडेगाव येथील आमचा वाडा शेताला लागूनच आहे. वाड्याला लागूनच आमचा खाजगी रस्ता आहे. रस्त्याच्या पलीकडे 25-30 माणसे बसू शकेल अशी बैठकीची खोली आहे. बैठकीत दोन गाद्या खाली टाकल्या. त्यावर तकीये आणि लोड ठेवलेले. गाद्या समोर मोठी सतरंजी अंथरलेली. बैठकीच्या समोर कौलारू छप्पर असलेल्या, पण दोन बाजूंनी भिंती नसलेल्या भागाला आम्ही छपरी म्हणतो. तिचे तोंड शेताकडे आहे. छपरीमध्ये भिंतीला लागून मोठा आणि जड तीन फूट उंचाचा तक्तपोस, त्यावर गादी आणि तकीये, त्याच्यासमोर एक लाकडी बेंच. तक्तपोसाच्या डाव्या बाजूला जनावरांचा गोठा. त्याच्या पाठीमागे गायवाडा आहे. छपरीच्या समोर मोठं अंगण. अंगणाच्या एका टोकाला मोठी विहीर. विहिरीला लागूनच पाणी साठवण्याकरिता असलेले 15 फूट लांब, 10 फूट रूंद आणि 5 फूट उंच असे सिमेंटचे टाके. पूर्वी पिठाच्या गिरणीकरिता व विहिरीतून पाणी काढण्याकरिता जे डिझेल इंजिन होते त्याला थंड करण्याकरिता या टाक्यातील पाणी इंजिनमधून फिरवल्या जात होते. सध्या हे निरुपयोगी होते. अंगणाच्या सभोवताली, सावरी, नीलगिरी, रामफळ, सिताफळ, कडुनिंब, डाळिंब, पेरूची झाडे लावलेली. पुढे दहा एकराचे शेत. घराच्या छपरीतूनच सारे शेत दृष्टीपथात येते. शेतात या वर्षी संकरीत ज्वारी आणि ईरवा म्हणून बाजरी पेरली होती. कणसे निसवून दाणे भरायला सुरुवात झाली होती. आजच्या पावसाने वातावरण धुसर झाले होते. खुर्चीवर बसल्या अवस्थेत कंटाळून डोळे जड झाले होते.

इतक्यात तो पक्षी शेताच्या आणि अंगणाच्या सीमेवर असलेल्या डाळिंबाच्या झाडाच्या फांदीवर येऊन बसला. मी एकदम सजग झालो. पाण्याने तो नखशिखांत भिजला होता. काही क्षणातच तेथून तो उडाला आणि छपरीजवळ 20 फूटांवर असलेल्या नीलगिरीच्या झाडाच्या खालच्या डहाळीवर येवून बसला. माझ्यापासून जवळच असल्याने त्याचे समग्र निरीक्षण करणे शक्य होते. तो चिमणीच्या आकाराच डोक्यावर आणि पोटाखाली पिवळाजर्द रंग ल्यालेला सुगरण नर (बाया) पक्षी होता. त्याच्या बळकट चोचीमध्ये कोणत्यातरी वनस्पतीचा सोललेला धागा होता. नक्कीच तो घरटे (खोपा) बांधीत असावा! पण कोठे? लवकरच त्याचे उत्तर मला मिळाले. नीलगिरीच्या डहाळीवरून उडाला तो थेट अंगणातल्या विहिरीच्या आत उगवून आता विहिरीच्या दहा फूट वर आलेल्या फेफरी किंवा पाखर आणि पिंपळाच्या एकमेकात गुंतलेल्या झाडावर जावून बसला. विहिरीच्या आत असलेल्या फेफरीच्या झाडाच्या फांद्यावर सुगरण (बाया) पक्षाचे तीन खोपे (घरटे) मला दिसले. खोपे विणण्याची नुकतीच सुरुवात झाली होती. सुगरण पक्षाला आमच्याकडे ‘देवचिमणी’ म्हणतात. या पक्षांची घरटी (खोपे) नदी किनारी पाण्याकडे झुकलेल्या झाडांच्या फांद्यावर विणलेली असतात. त्याचप्रमाणे पडीक किंवा मोठ्या विहिरी ज्यांच्या दरडीमध्ये फेफरी, पिंपळ, औदुंबर यांसारखी झाडे निघाली असतात, या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने हा आपली घरटी विणतो. यामुळे साप, शिकारी पक्षी; तसेच मांसाहारी प्राण्यांपासून यांच्या पिल्लांना संरक्षण मिळते. अशा ठिकाणी त्यांच्या जीवनचक्राचे निरीक्षण करणे अत्यंत कठीण असते, परंतु आज अशी दुर्मिळ संधी घरीच चालून आली होती. या संधीचा फायदा घेण्याचा मी मनसुबा केला.

दुसर्‍या दिवशी सकाळी माझे मित्र डॉ. मनोहर खोंडे यांना भेटण्यास गेलो. त्यांना काल घडलेला सर्व घटनाक्रम सांगितला व सुगरण पक्षाच्या प्रजननकाळाच्या क्रियाकलापाचे जवळून निरीक्षण तथा फोटो घेण्याची संधी चालून आल्याचे सांगितले. डॉक्टरांनी ताबडतोब संमती दिली व उद्यापासून सूक्ष्मनिरीक्षणाला सुरुवात करावयाचे ठरले, तरी ही आजचा दिवस फुकट घालवण्याची माझी इच्छा नव्हती. दुपारी जेवण झाल्यावर मी छपरीला येवून बसलो. आज पाऊस थांबला होता. पिंजलेल्या कापसासारखे काही ढग सूर्यासोबत लपाछपीचा खेळ खेळत होते. काल पाऊस पडून गेल्यामुळे धूलीकणांमुळे मुक्त झालेले आकाश, स्वच्छ निळेशार दिसत होते. भरपूर सूर्यप्रकाशाने विहिरीतील तीनही खोपे स्पष्ट दिसत होते, पण अजूनही तो नर सुगरण मला दिसत नव्हता.

थोड्या प्रतिज्ञेनंतर चोचीमध्ये धागा घेवून तो आला आणि सरळ खोप्यावर जावून विणू लागला. मी छपरीतून बाहेर आलो. त्या खोप्याचे जवळून निरीक्षण करता यावे म्हणून हळूहळू विहिरीच्या दिशेने जावू लागलो. वीसेक फूट गेल्यावर मी थबकलो, त्याचे लक्ष माझ्याकडे गेले होते, आणलेला धागा त्याने खोप्याला विणला होता. आपले पंख नृत्यमुद्रेत हलवत तो खोप्यावर इकडून तिकडे, तिकडून इकडे, शीळ वाजवत फिरत होता. मी एक पाऊल पुढे टाकताच, शीळ वाजवत व पंख फडकावीत शेताच्या दिशेने तो उडून गेला. कदाचित मी त्याच्या सुरक्षा वर्तुळाच्या आत शिरलो असेन. त्याचे खोपे पाहण्याकरिता मी विहिरीच्या काठापर्यंत गेलो.

खोपे माझ्या नजरेपासून दहा फूटांच्या आत होते. झाडाच्या वरच्या डहाळीवर त्याने पहिला खोपा बांधला असावा, कारण त्याचा हिरवा रंग, फिक्कट पिंगट झाला होता. या खोप्याचे विणकाम त्याने अर्धवट सोडून दिले होते. दुसरा खोपा वरच्या खोप्याच्या खाली, पहिल्या खोप्याच्या डहाळीपेक्षा जाड आणि मजबूत फांदीला विणणे सुरू होते. या खोप्याचे विणकाम सुरू असल्याचे संकेत त्याच्या ताज्या हिरव्या रंगांच्या धाग्यांवरून मिळत होते. याचे विणकाम अर्ध्यापर्यंत होत आलेले होते. तिसरा खोपा विहिरीच्या आत खोल गेलेल्या डहाळीवर विणणे सुरू होते. मात्र या विणकामात पहिल्या दोन खोप्यांच्या विणकामाची सफाई आणि कला दिसत नव्हती. या खोप्याचे असे ओबडधोबड विणकाम कुणी केले असावे? हा प्रश्‍न मनात येवून गेला. माझे प्राथमिक निरीक्षण संपले होते. तेथून मी सरळ छपरीत येवून आरामखुर्चीत विसावलो व निरीक्षणांच्या नोंदी डायरीत लिहायला सुरुवात केली.
दुपारी चहा घेवून नुकताच मी छपरीत येवून बसलो होतो. इतक्यात आमचे जुने आवारी (शेतीचे काम मजूरांकडून करवून घेणारे) रामराव काका मटरे आले. त्यांची मुले कमावती झाली आणि उतारवयाला सुरुवात झाल्याने काका आता कामावर येत नव्हते, तरीही आमच्या घरी त्यांची दिवसातून एक फेरी असायचीच. हा मोठा बिलंदर आणि धाडसी माणूस, कुस्तीच्या आखाड्याचा शौक केलेला होता. गावाला व शेतीला त्रास देणार्‍या जनावरांना हुसकावण्यात त्याच्या तरुणपणातील काळात तो पटाईत होता. वनवासी असल्याने निसर्गाच्या अंगाखांद्यावर खेळलेला हा माणूस अशिक्षित असूनही अत्यंत सूक्ष्मनिरीक्षक होता. जंगलांचे तसेच जंगली प्राण्यांचे त्यांनी केलेले अवलोकन व विस्मयकारी अनुभव जेव्हा ते सांगत तेव्हा अंगावर रोमांच उभे राहत.

काकांनी पानाची चंची बाहेर काढली आणि पान बनवायला सुरुवात करताकरता मला म्हणाले, ‘‘बटा (बेटा), काय पाहून राह्यलारे तिकडे?’’
मी म्हणालो, ‘‘काका, आपली विहीर आहे ना, तिच्यातल्या झाडावर देवचिमनी खोपा करून राहली ते पाहतोय!’’
काका गालातल्या गालात हसला व म्हणाला, ‘‘भल्लं बिलंदर पाखरू आहे ते! पह्यले एक खोपा करते, बायको धुंडून आनते, लाग करते, मादी आंड्यावर बसलीरे बसली, का दुसरा खोपा बांधाले सुरू!’’
‘‘काका, दुसर्‍या खोप्यात तो राहतो काय?’’ माझा पोरकट प्रश्‍न.
काका गडगडाटासारखा हसला आणि म्हणाला, ‘‘अरं लेका माह्या, दुसर्‍या खोप्यासाठी दुसरी बायको धूंढाले जाते तो, अन् पह्यलीसाठी सवत घेवूनच येते. मंग तिसर्‍या खोप्याच्या तयारीला लागते.’’
‘‘काका, त्याला तिसरी मादी मिळते काय?’’ माझा उत्कंठापूर्वक प्रश्‍न.
काका विचारपूर्वक म्हणाला, ‘‘मले खरंच माहीत नाही गळ्या (गड्या).’’
रामरावकाकाने सांगितलेली ही माहिती माझ्याकरिता अगदी अनपेक्षित आणि नवीनच होती, परंतु पुढील काळात वाचलेल्या पक्ष्यांवरील पुस्तकांवरून काकाने खरे तेच सांगितल्याची पुष्टी झाली. रामरावकाकाने सांगितलेल्या वन्यप्राणी, पक्ष्यांचा बहुतेक कहाण्या पुढील 25-30 वर्षाच्या जंगलभ्रमणात व पक्षीनिरिक्षणात खर्‍या ठरल्या.

माझी नजर शेतावर दूरवर भिरभिरत होती. ज्वारीपेक्षा उंच असलेल्या बाजरीच्या कणसांवर चिमणीच्या आकाराचे काही पक्षी बसलेले होते. त्यातील दोन हळूहळू विहिरीकडे येत होते. शेताच्या आणि अंगणाच्या सीमेवरील डाळिंबाचं झाड त्यांचे प्रथम स्थानक असावे. तेथे येवून ते दोघे अलग अलग फांद्यावर विसावले. ते दोघेही सुगरण पक्षीच होते. मला वाटले नरासोबत मादी आली असावी. पण नाही! दुसराही नरच होता, परंतु याचा रंग धोपटून धोपटून धुतलेल्या कापडासारखा फिक्कट होता. रंग आणि किरकोल बांधा यावरून तो नुकताच तारुण्यात पदार्पण करणारा नर सुगरण होता. पाच मिनिटातच छोटा नर तेथून उडाला आणि विहिरीच्या आतील अव्यवस्थित व ओबडधोबड विणकाम केलेल्या तिसर्‍या खोप्यावर जावून बसला. मी मनात म्हटले, ‘‘असे आहे तर!’’ हा खोपा त्या नवतरुणाचा होता. कदाचित हा त्या मोठ्या नराचा प्रशिक्षणार्थी उमेदवार असावा.

या लहान नरापाठोपाठ, तो मोठा नर आपल्या दुसर्‍या नवीन विणकाम सुरू असलेल्या खोप्यावर जावून त्याच्यावर सफाईचा हात फिरवू लागला. थोड्या वेळातच ते दोघे एका पाठोपाठ खोप्यावरून निघून गेले. अर्धा तास वाट बघूनही ते दोघे परत न आल्याने मी छपरीतून वाड्याकडे निघून गेले.
दिवस तिसरा... दुर्बीण आणि पेन-डायरी घेवून छपरीतील खुर्चीवर जावून बसलो होतो. डोळ्यांना दुर्बीण लावली अन् शेताच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत नजर टाकली. शेताच्या शेवटच्या सीमेवरील ज्वारी आणि बाजरीची कणसे अगदी दहा फूटावर असल्यागत दिसत होती. अचानक पक्षांचा एक थवा दुर्बिणीच्या टप्प्यात आला. नर आणि मादी पक्ष्यांचा तो संयुक्त थवा होता. त्या समुहात पंधरा ते वीस पक्षी असावेत. कदाचित आपला नवरदेव सुगरण त्या स्वयंवरात नवरी मिळवण्याकरिता सामील झाला असावा. आता तो एखादी माती घेवून खोप्यावर येईल, या आशेने मी हाताला थकवा येईपर्यंत दुर्बीण त्या थव्यावर केंद्रित करून होतो. तो थवा विखरायला लागला. पक्षी विविध दिशांनी पांगले. माझे हात शक्तिपात झाल्याने आपोआपच दुर्बिणीसहित खाली आले. नजर मात्र थकली नव्हती, ती अजूनही त्याच दिशेने होती.

दूर अंतरावरून दोन पक्षी अंगणाच्या दिशेने येताना दिसले. काही क्षणातच ते डाळींबाच्या झाडावर येवून बसले. पण हाय रे दुर्दैव! ते दोघेही नर होते. मोठा नर काही क्षणांसाठी खोप्यावर गेला, अगदी घाई असल्यासारखी आकाशात झेप घेवून दृष्टीआड झाला. छोट्या नराने डाळींबांच्या झाडावरूनच आपले प्रस्थान शेताकडे केले. मी घड्यळावर नजर टाकली व वेळेची नोंद मनात केली. दुर्बीण मांडीवर ठेवून त्यांच्या आगमनाची प्रतीक्षा करीत बसलो. इतक्यात माझ्या पाठीमागे हालचाल जाणवली. मागे वळून बघतो तर, सौ. मंजू (पत्नी) हातात चहाचा कप घेवून उभी होती. मला आश्चर्याचा धक्का बसला. प्रश्‍नार्थक नजरेने मी तिच्याकडे पाहिले.

मंजू म्हणाली, ‘‘तुम्हाला चहाची गरज असावी म्हणून चहा आणला. मला बघायचा आहे तो खोपा. बहिणाबाईंची कविता आम्हाला शाळेत होती. तेव्हापासूनची इच्छा होती. तुमच्या त्या देवचिमन्या आणि त्यांचा खोपा पाहण्याची.’’
मी मनात म्हणालो, ‘‘चला हिची बालपणाची इच्छा पूर्ण करू, आणि चहाची परतफेडही करू’’ तिला बाजूच्या खुर्चीवर बसवले व काही सूचना दिल्या. हातात दुर्बीण दिली. तिला दुर्बिणीचा सराव होता. आम्ही दोघेही त्यांची वाट पाहू लागलो. तो मोठा नर चोंचीत हिरवा धागा घेवून आला. माझी नजर घडाळ्यावर गेली. बरोबर चौदा मिनिटानंतर तो आला होता आणि दुसर्‍या खोप्यावर बसून विणकाम करू लागला.

एक-दोन मिनिटातच तो उडाला. बारा मिनिटांत पुन्हा घरट्यावर आला. तिसर्‍या फेरीत तो दहा मिनिटातच चोंचीत हिरवा धागा घेवून आला. आजच्या निरीक्षणात आढळले की हिरवा धागा आणल्यानंतर त्याला ज्यास्तीत जास्त एक ते दोन मिनिटे व कमीत कमी पंधरा सेकंद धागा विणायला लागतात. त्याच्या तीन फेर्‍यांनंतर तो छोटा नर हिरवा धागा घेवून आला. म्हणजेच धागा आणण्याचा छोट्याचा वेळ बराच कमी होता.

साडेअकरा व्हायला आले होते. डॉ. खोडे यायची वेळ झाली होती. मंजू घरात निघून गेल्यानंतर, तो मोठा सुगरण कसा विणकाम करतो याचे दुर्बिणीतून बारकाईने निरीक्षण केले. हिरवा धागा आणल्यानंतर त्याने फेफरीच्या फांदीला ज्या ठिकाणी खोपा लटकवण्याची सुरुवात होते, त्या ठिकाणी आणलेला धागा लपेटला. वारंवार तो धागा आणायला जायचा आणि फांदीवरची खोप्याची गाठ मजबूत करायचा, कारण सरळ होते पाऊस, वारा वादळाने किंवा इतर कोणत्याही कारणाने ती फांदी अथवा ते अख्खे झाड जरी हादरले, तरी त्याची मादी आणि पिलांसहित त्याचा खोपा विहिरीच्या पाण्यात पडायला नको याची तो काळजी घेत होता. तो तितका निश्चितच बुद्धिमान होता.

त्याच्या खोप्याचे बांधकाम अर्धे झाले होते. अंडे उबवण्याचा कप्पा ऊर्फ बाळंतिणीचा खोली तयार झाली होती. तिचा खोलगट आकार दुर्बिणीतून स्पष्ट दिसत होता. प्रवेशद्वार अथवा खोप्याच्या आत येण्या-जाण्याचा बोगदा तयार करण्याची सुरुवात झाली होती. तो अविश्रांत फेर्‍या मारीत होता. त्याची चोच गालीच्या विणणार्‍या कसबी कारागिराच्या हातासारखी सराईतपणे विणकाम करीत होती. हातातून दुर्बीण ठेवून काही क्षण डोळे मिटले. कानात डॉक्टरांच्या स्कूटरचा आवाज कानी पडला. आल्या आल्या डॉक्टरांनी विचारले, ‘‘सकाळपासून काय काय दिसले?’’
मी त्यांना सविस्तर माहिती दिली. डॉक्टर म्हणाले, ‘‘आपण या घरट्याचे, तसेच पक्षाचे प्रत्येक स्टेजचे फोटो घेवू. अगदी पिल्ले खोप्यातून बाहेर येवून उडून जाईपर्यंत.’’
कल्पना एकदम मस्त होती. पण एक मोठी अडचण होती. डॉक्टरांच्या कॅमेर्‍याला टेली लेन्स (दुरून फोटो काढण्याचे भिंग) नव्हते. त्याकरिता डॉक्टरांना खोप्याच्या जवळ जावे लागणार होते, पण मोठा सुगरण 25-30 फूटाच्या आत आल्याबरोबर उडून जात होता. हा मला आलेला अनुभव मी डॉक्टरांना सांगितला.
डॉक्टर म्हणाले, ‘‘एक आयडिया आहे, मी विहिरीजवळच्या पाण्याच्या टाक्यात कॅमेरा घेवून लपून बसतो. बैठकीत अंथरलेली मोठी सतरंजी तू टाक्यावरून झाकून टाक. फोटो काढून झाले की मी तुला आवाज देईन तेव्हा सतरंजी काढून घे.’’
दुर्बिणीतून खोप्याचे निरीक्षण सुरू केले. अर्ध्या तासातच मोठ्या सुगरणाच्या चार फेर्‍या होऊन गेल्या होत्या. त्याला नक्कीच कशाची तरी घाई झाली होती. छोटा सुगरण मात्र दोनदाच धागा घेवून आला होता. पुढील एक तास यांचे जाणे-येणे सुरूच होते. हे पक्षी हिरवा धागा कशाचा व कोठून आणतात हा प्रश्‍न माझ्या मनात पिंगा घालू लागला. याचे उत्तर कसे शोधावे याचा मी विचार करीत होतो. पाठीला कळा यायला लागल्याने छपरीतून उठून बैठकीच्या आतील गादीवर डोळे बंद करून लोळलो. तरीही डोक्यात हिरवा धाग्याचा विचार सुरूच होता.

दुपारचे 4 वाजले असावेत कुणाच्या तरी पावलांच्या आवाजाने माझी तंद्री भंगली व मी डोळे उघडले. रामरावकाकांना बैठकीच्या दारातून आत येताना मी पाहिले आणि विचारले, ‘‘काका, तो देवचिमना हिरवा धागा कोठून आणतेगा?’’ माझी भाषा अजूनही पूर्ण शहरी झाली नव्हती.
‘‘बटा, ते पाखरू लयं हुशार हाये. शिंदीच्या लहान झाडावर जाते, कोवया पानचोई ले चोचीन फाळते, तेचा धागा काढून खोपा विनते. वावराच्या धुर्‍यावर केतकीचं झाड राह्यते, तेच्यापासून नरम धागा काढून खोपा अंदरून विनते. गवताचे धागे, नदीतल्या लव्हाळीचा धागाही ह्या आनते. म्या सौता नजरने पाह्यल हाये. झालं त्वाल समाधान!’’ काका माझ्याकडे पाहत म्हणाला.
‘‘काका या देवचिमण्यांनी अशा वर्दळीच्या जागी खोपा का केला असेल?’’ माझ्या मनात प्रश्‍न विचारला. ‘‘बटा, गोस्ट असी आहे, या वर्षी या वावरात जवारीच्या सोबत बाजर्‍याचा ईरवा आहे. या पाखराले बाजर्‍याचे दाणे लय आवडते. चरासाठी ज्यास्त दूर जा लागत नाही, म्हणून या ईहरीत खोपा केला.’’ असे म्हणून काकाने माझ्या हातात पानाचा विडा दिला व बैठकीच्या बाहेर पडला.
हातात दुर्बीण घेवून बाहेर आलो. खोप्यावर नजर टाकली, खोप्याच्या आत जाण्या-येण्याचा बोगदा किंवा प्रवेशद्वार अर्धा फूट लांब झाले होते. मोठ्या नर सूगरणाच्या फेर्‍या सुरू होत्या.

चवथ्या दिवशी डॉक्टर सकाळी 8 वाजताच आपला कॅमेरा घेवून माझ्या घरी हजर होते. मीही आज तयारीत होतो. मदतीकरिता रामरावकाकाला बोलावून घेतले होते. डॉक्टरांनी पाण्याच्या टाक्याचे निरीक्षण केले. टाक्याचे आतील गवत काकाने कापून बाहेर काढले. टाक्यात पायाच्या घोट्याएवढे पाणी साचले होते. ते काढण्याचा काही इलाज नव्हता. टाक्यात लाकडी स्टूल ठेवून डॉक्टर त्यावर विराजमान झाले. डॉक्टरांनी कॅमेरा विहिरीकडील भागाच्या टाक्याच्या भिंतीवर ठेवला व आपले तोंड विहिरीकडे केले. मी आणि रामरावकाकाने ती बैठकीतील सतरंजी आणून टाक्यावर झाकली. आम्ही परत छपरीत जावून बसलो. मोठा नर धागा घेवून आला होता. क्षणभर तो विहिरीकडे गेला व खोप्यावर न जाता डाळींबाच्या झाडावर जावून बसला. तो सतत विहीर व डाळींबाच्या झाडादरम्यान चकरा मारीत होता. या काळात छोटा नर खोप्यावर जावून परत उडून गेला होता. 35 मिनिटे चकरा मारून झाल्यानंतर एकदाचा तो आणलेला धागा घेवून खोप्यावर गेला. सूर्य बराच वर आला होता, वातावरण गरम होत चालले होते. मोठ्या नराच्या नेहमीसारख्या धागा आणण्याच्या फेर्‍या सुरू होत्या. फेफरीच्या झाडावर दहा एक वेळा कॅमराचा फ्लॅश चमकलेला दिसला.

डॉक्टरांना टाक्यात बसून एका तासापेक्षा ज्यास्त वेळ झाला. ठरल्याप्रमाणे डॉक्टरांनी मला आवाज दिला. आम्ही टाक्यावरून सतरंजी काढली. डॉक्टरांकडे आम्ही दोघेही आश्चर्याने बघत होतो. ते नखशिखांत घामाने भिजले होते. सर्व कपडे घामाने चिंब ओले झाले होते. डोक्यातून व चेहर्‍यावरून घामाच्या धारा वाहत होत्या. डॉक्टरांना आधार देवून टाक्यातून बाहेर काढले व छपरीत नेले. लिंबू, मीठ पाण्याच्या सरबताने डॉक्टरांना टवटवी आली.
डॉक्टर म्हणाले, ‘‘विलक्षण अनुभव घेतला मी. अक्षरश: स्टरिलायझेशनच्या कुकरमध्ये असल्यासारखे वाटत होते. पंधरा मिनिटातच ठरवले की या पुढे टाक्यात बसणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त फोटो काढून घेतले. हा बाया लेकाचा अजिबात स्थिर राहत नव्हता त्यामुळे किती फोटो चांगले येतील यात शंका आहे. तुझे निरीक्षण चालू ठेव व मला सांग..’’ असे म्हणून डॉक्टर निघून गेले. काही वेळाने रामरावकाकाही निघून गेला.

छपरीत आता मी एकटाच होतो. दुर्बीण डोळ्याला लावून त्याची शिवणकला न्याहाळत होतो. त्या खोप्याचे अजून एक वैशिष्ट्य माझ्या लक्षात आले की धाग्याचे टोक तो वर येवू देत नाही. आलेले दिसले तर जाणीवपूर्वक आत टोचतो. अचानक त्याने चमत्कारिक हालचाल केली. तो खोप्यावरून उडून त्याच्या विणणे सोडून दिलेल्या खोप्यावर जावून बसला. त्या खोप्याचे धागे काढण्याचा प्रयत्न केला. तेही सोडून तो उडाला आणि छोट्या नराच्या खोप्यावर जावून त्याचे धागे काढून स्वत:चा खोपा विणू लागला. त्याला खोपा विणण्याची विलक्षण घाई झाली होती. काय कारण असावे बरे? मी विचार करीत जेवायला निघून गेलो.

दुपारी 2 वाजता मी पुन्हा दुर्बीण घेवून निरीक्षण सुरू केले. खोपा पूर्ण व्हायला आला होता. त्याचा प्रवेशद्वाराच्या बोगद्याची नळी अंदाजे एक फूट इतकी लांब झाली होती. छोटा नर नसतानाच तो त्याच्या खोप्याचे धागे काढून आपल्या खोप्याला लावत होता. त्याने आपल्या खोप्यावर गोल चालत जावून प्रदक्षिणा घातली व शेताच्या दूरच्या सीमेकडे उडत निघून गेला. बराच वेळ वाट पाहूनही त्याचा पत्ता नव्हता म्हणून मी डोळे मिटून आरामखुर्चीवर लोटलो. पंधरा-वीस मिनिटांतच सुगरण पक्ष्यांच्या तोंडातून निघालेल्या विविध आवाजांनी (कॉलस) माझे लक्ष वेधून घेतले. खोप्यावर नजर टाकली तर बघतो, दोन सुगरण माद्या फेपरीच्या डहाळीवर बसून आहेत आणि आपले दोन्ही नर आपआपल्या खोप्यावर बसून पंख हालवत नृत्य करीत विविध आवाज काढून त्या माद्यांना आपल्या खोप्यावर बोलावीत आहेत. बराच वेळ त्यांची विनवणी ऐकून त्यातील एक मादी, किंचित गुलाबी रंग ल्यालेली, चिकण्या पिसांची गुबगुबीत, क्यूट अशी ती सुगरण मोठ्या नराच्या जुन्या खोप्यावर येवून बसली. एक-दोन वेळा तिने त्या खोप्याचे धागे चोचीने ओढून पाहिले. तेथून ती त्याच्या पूर्ण झालेल्या खोप्यावर आली. या खोप्याचे तिने आत जावून तसेच बाहेरून संपूर्ण खोपा फिरून चोचीच्या साहाय्याने परीक्षण केले. थोडा वेळ खोप्यावर थांबली. तेथून उडून त्या छोट्या सूगरणाच्या खोप्यावर गेली. ते त्याचे ओबडधोबड विणकाम पाहून कदाचित तिची निराशा झाली असावी. ताबडतोब तेथून उडून ती पुन्हा फेफराच्या झाडाच्या शेंड्यावर जावून बसली.

दुसरी मादी पहिल्या मादीचे निरीक्षण करीत असावी. तिनेही तिच प्रक्रिया रिपीट केली. काही वेळाने पहिली मादी मोठ्या नराच्या पूर्ण झालेल्या खोप्यावर येवून बसली व आपले पंख हलवू लागली. ताबडतोब तो मोठा नर तिच्याभोवती पिंगा घालू लागला. लगेचच संधी साधून तिच्यावर आरूढ होवून लागला. प्रणयक्रीडा करू लागला. 10 ते 15 वेळा ही क्रिया घडत होती. शेवटी ती मादी खोप्याच्या आत जावून बसली. मोठा नर आपल्या खोप्याला अजून व्यवस्थित करू लागला. फेपरीच्या शेंड्यावर बसलेली दुसरी मादी सरळ त्या ओबडधोबड खोप्यावर जावून बसली. दोन-चार वेळा तिने त्या खोप्याचे विणकाम तपासून पाहिले. तिचे तिलाच माहीत दोन मिनिटातच तो खोपा सोडून ती शेताच्या दिशेने उडून गेली. तिच्या पाठोपाठ तो छोटा नरही गेला.
मोठ्या नराने, छोट्या नराच्या खोप्याला सुटणे सुरू केले होते. तेथून तो धागा पळवायचा आणि स्वत:च्या खोप्याला लावायचा थोड्या वेळातच त्याच्या स्वत:च्या खोप्याचे प्रवेशद्वार विणून पूर्ण झाले होतेे. अंधार पडायला लागला होता, म्हणून मीही आजचे निरीक्षण आटोपते घेतले.

पाचव्या दिवसांची सकाळ उजळली ती मनात उत्सुकता घेवूनच. त्यामुळे झटपट तयार होवून साधारणत: 9 वाजता मी छपरीत जावून बसलो आणि दुर्बिणीने खोप्यांचे निरीक्षण करू लागलो. तेथे एकही पक्षी हजर नव्हता. छोट्या नराचा विस्कटलेला खोपा जशाच्या तसाच होता. अर्ध्या तासानंतर मोठा नर आणि त्याची मादी खोप्यावर आली. नर मादीसोबत प्रणयक्रीडा करू लागला. थोड्या वेळातच मादी खोप्याच्या आत गेली. नर खोपावर बसला, चोंचीने खोपा तपासला आणि उडून गेला. आज छोट्या नराचे दर्शन झाले नाही. वीस मिनिटांनंतर मोठा नर चोचीत पांढरा धाग घेवून आला व खोप्यावर बसला. मी दुर्बिणीतून बघत होतो. मला त्याच्या चोचीतला पांढरा मुलायम धागा स्पष्ट दिसत होता. तो बहुतेक कातीनीच्या (कोळी, स्पायडर) जाळ्याचा असावा. मादी घरट्यातून बाहेर पडली व शेताकडे उडून गेली. ती निघून जाताच नर खोप्याच्या आत गेला. दुपारी 1 वाजेपर्यंत त्याचे पांढरा धागा आणणे व खोपाच्या आत जाणे सुरूच होते.

छोटा नर तसेच काल उडून गेलेली मादी अजूनपर्यंत आली नव्हती. बहुतेक त्याने त्याच्या ओबडधोबड खोप्याचा कायमचा त्याग केला होता.
मला माझ्या कामानिमित्त काही आठवड्यांकरिता आजच बाहेरगावी जायचे असल्याने तयारी करण्याकरिता वाड्यात गेलो. जेवण करून आणि बॅग घेवून मी छपरीत आलो. सोबत मंजू होती. तिला या खोप्यावर लक्ष ठेवायची सूचना केली व खोप्यावर नजर टाकली. तो खोप्यावर बसला होता त्याची मादी आत अंडे देत असावी. त्याला किंवा मला पुढे घडणार्‍या अकल्पनीय घटनांची जाणीव नव्हती. बॅग घेवून मी बसस्थानकाच्या दिशेने चालू लागलो.
बाहेरगावी जावून मला तेरा-चौदा दिवस झाले होते. सुगरणीच्या खोप्याची आठवण येत होती. अंडे उबवून पिल्ले तयार झाली असावी असा माझा अंदाज होता. काकाने सांगितल्याप्रमाणे तो नर पक्षी दुसर्‍या नवीन खोप्याच्या तयारीला लागला असावा. मनात इच्छा होती की खोप्यातील सुगरणीचे पिल्ले माझ्यासमोर आकाशात उडावीत.

पुण्याहून मी अमरावतीला आणि तेथून वरूडला पोहोचलो. रात्रीचे 8 वाजून गेले होते. गाडेगावची शेवटची बस निघून गेल्याने डॉ. खोडे साहेबांकडे मुक्काम करावा म्हणून 9 वाजता राजूराबाजारला पोहोचलो. तेथून मी घरी फोन केला. मंजूने फोन उचलला, दोन-तीन वेळा हॅलो हॅलो केल्यावर तिच्या तोंडावून हलकासा हॅलोचा घूसमटलेला आवाज आला. काही तरी नक्कीच बिघडले होते.
मी, विचारले, ‘‘सर्वांच्या तब्बेती ठीक आहे ना?’’
तिने होय म्हणून म्हटले.
‘‘मग तुझा आवाज रडल्यासारखा का येत आहे? टेलिफोन खराब आहे काय? किंवा काही वाईट बातमी आहे काय? उद्या घरी येतो आता मी डॉक्टरांकडे आहे.’’ मी.
‘‘नाही हो!’’ तिचा आवाज आणखीच रडका झाला.
‘‘मग काय भानगड आहे? मला लवकर सांग माझा जीव टांगणीला लागला आहे.’’ मी काळजीच्या स्वरात म्हणालो.
‘‘अहो, आपल्या विहिरीतले सुगरणीच्या खोप्याचे झाड, आपल्या कामावरच्या माणसांनी आज सकाळी तोडून टाकून फेकून दिले. दुपारपासून येथे पाऊस सुरू आहे. त्यात असलेले पिल्ले मरून गेली असतील.’’ ती फोनवरच स्फूंदू लागली. मला दु:खद धक्का बसला. मी एकदम सुन्न झालो.
काय करावे काही सुचेना. माझ्या हातात काहीच करण्यासारखे नव्हते. डॉक्टरांना घडलेली हकीगत सांगितली. डॉक्टर उदास झाले. कसे तरी दोन घास पोटात ढकलून मी बिछान्यावर अंग टाकले. सुगरणीच्या खोप्याचा सारा चित्रपट माझा डोळ्यासमोरून झरझर सरकत होता. परंतु झाड तोडनू खोपा नष्ट करण्याचे दृश्य मात्र डोळ्यासमोर येत नव्हते. कदाचित ही घटना माझ्या मनाने स्वीकारली नसावी. रात्री कधी झोप लागली ते कळलेच नाही.
सकाळी 9 वाजता डॉक्टरांच्या स्कूटरवर बसून गाडेगावला गेलो. मला माझ्या घरासमोर उतरवून डॉक्टर दवाखान्याकडे निघून गेले. मी उदास मनाने घरात प्रवेश केला. सपरीमध्ये (ड्रॉइंग रूम) मंजू खिन्न मुद्रेने उभी होती. मी अबोलपणे बंगईवर (लाकडाचा मोठा पाळणा) जावून बसलो. पाणी पिवून थोडं शांत झाल्यावर तिने स्वत:हून काल सकाळी घडलेली घटना सांगितली. विहिरीच्या आणि अंगणाच्या आसपास पावसामुळे गवत तसेच रानटी झुडपे निघाली होती. सततच्या पाण्याने ती खूपच वाढली होती. त्या सकाळी माझ्या लहान भावाला त्या झुडपे आणि गवतात एक साप वावरताना दिसला. म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने त्याने कामावरील माणसांना ताबडतोब परिसराची साफसफाई करण्यास सांगितले. त्यांनी ती तत्परतेने केली. पण ‘तक्षकाले नम: स्वाहा. इंद्राये नम: स्वाहा’ या न्यायाने सुगरणीची खोपे असलेली विहिरीमधील झाडेसुद्धा तोडण्यात आली.

मी मनात विचार केला. एक आठवण म्हणून तो खोपा घरी नेवूया. मी खोप्याची फांदी टाक्यातून बाहेर काढली आणि खोपा फांदीपासून अलग करण्यास सुरुवात केली. माझ्या हाताचा हलकासा धक्का खोप्याला लगाला, काय चमत्कार! काय आश्चर्य! खोप्यातून पिलांचा चिवचिवाट सुरू झाला. त्यांची ती किलबिल ऐकून माझ्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. मी टाक्यावरून उतरताना फांदीला मोठा धक्का बसला. पिल्ले एकदम चिडीचूप झाली. फांदीसहीत खोपा घेवून मी छपरीत आलो. खोपा जमिनीकडे लटकत राहील अशारीतीने फांदी तक्तपोसावर ठेवली व फांदीवर वजन ठेवले. फांदीला इतके झटके बसूनही पिल्ले एकदम चिडीचूप होती. मी खोप्याला हळूच धक्का दिला. पुन्हा आश्‍चर्य! पिलांचा चिवचिवाट सुरू झाला. ‘अस्से आहे तर!’ मी मनात म्हणालो. मला त्यांचे संकेत समजायला लागले होते. फांदीला झटके म्हणजे शतू आला आहे. सावध व्हा आणि चूप बसा. खोप्याला हळूच धक्का किंवा स्पर्श म्हणजे आई-बाबा जेवण घेवून आले. आता त्यांची चिवचिव थांबली होती.

माणसांनी चारलेल्या अन्नाने चिमणीची पिल्ले मरतात हा आमचा अनुभव होता. दोन वर्षांपूर्वी, एका फोटोफ्रेमच्या मागे चिमणीची पिल्लं होती. चिमणा-चिमणी त्यांचे संगोपन करीत होते. एके दिवशी चिमणी बाहेर गेली ती परत आलीच नाही. दुसर्‍या दिवशी चिमणा ही पिल्लं सोडून निघून गेला. भुकेने व्याकुळ झालेली पिल्लं फोटोफ्रेमच्यावर येवून वाट पाहत होती. मला त्यांची तगमग पाहली न गेल्याने पोळीचे भिजवलेले छोटे तुकडे, भाताची शिते चिमट्याने त्यांना चारले. त्यांनीही ते खाल्ले. चिमण्यांना जे खातांनी मी पाहिले होते तेच त्यांना मी भरवले होते. तरीही तिसर्‍या दिवशी तीनही पिल्लं त्यांच्या खोप्यात मरून गेली होती.

या पिलांच्या बाबतीत तसे करणे प्राणघातक ठरू शकले असते. आम्ही एक प्रयोग करून पाहावयाचं ठरवलं. तो खोपा फांदीपासून वेगळा केला. ज्या डाळींबाच्या झाडावर तो सुगरण पक्षी बसायचा त्याच्या एका फांदीला हा पिल्लं असलेला खोपा बांधला. आम्ही ठरवलं की या पिल्लांचे मायबाप येतात काय याची दिवसभर वाट पाहायची. जर ते आले नाहीत तर अळ्या, ओल्या बाजरीचे दाणे असं जेवण खोप्याला छिद्र पाडून नोजप्लायरने त्यांना भरवायचे मग काहीही होवो. कारण गेल्या 30-32 तासात ते उपाशीच होते. नाही तरी भुकेने ते मरणारच होते. संजय, ओल्या बाजरीची कणसे आणण्याकरिता शेतात निघून गेला. अर्धा पाऊण तास वाट पाहून आम्ही घरी निघून आलो.

दुपारचे 4 वाजले होते. ओल्या बाजरीचे दाणे आणि नोजप्लायर घेवून मी छपरीत आलो व खुर्चीत बसलो. अजूनपर्यंत कोणताही पक्षी खोप्यावर आला नव्हता. मी निराश झालो होतो. खोप्यापर्यंत जावून त्याची नजरेनेच तपासणी केली. तो व्यवस्थित होता. मग हळूच त्याला धक्का दिला. पिलांची चिवचिव सुरू झाली. पिलं सुरक्षित व जीवंतही होती. माझ्या मनात धर्मयुद्ध चाललं होतं. पिलांना खावू घालावे की थोडी वाट पाहावी. खावू घालण्याचे परिणाम मला माहीत होते. डॉक्टरांच्या संकटातूनही ते वाचले होते. ते खोप्याबाहेर पडले असते तर निश्चितच ते मेले असते. त्या खोप्याच्या नळीतून त्यांना आत घालणे अशक्य होते. खोप्याबाहेरच्या पिलांना आई-बापाने कधीच स्वीकारले नसते. ते काही असो पिलांचे नशीब बलवान होते. आतापर्यंतचा घटनाक्रम पाहता काही तरी मार्ग निघेल असा विश्वास वाटू लागला. लवकरच त्याचा अनुभव आला. शेताच्या दूर वर छोट्या पक्षांचा थवा मला दिसला. तसाच मी छपरीत जावून बसलो. दुर्बीण हातात घेतली. तो थवा सुगरणांचाच होता. त्यातील एक पक्षी हळूहळू ज्वारीच्या एका कणसावरून दुसर्‍यावर येत येत डाळींबाजवळ असलेल्या रामफळाच्या झाडावर येऊन बसला. त्याच्यात आत्मविश्वासाचा अभाव होता. तसाच तो भेदरलेला होता. बराच वेळ तो त्या झाडावरच थांबला. तेथून उडून तो डाळींबाच्या एका फांदीवर जाऊन बसला. त्याची नजर सारखी भिरभिरत होती. कदाचित कालचा अनुभव त्याच्या खोलवर कोरला गेला असावा. थोड्या वेळातच तो त्याच्या खोप्यावर येऊन बसला. पिलांचा चिवचिवाट सुरू झाल्याचा क्षीण आवाज माझ्या कानी पडला. काही सेकंदातच तो त्या थव्याकडे निघून गेला. तो खोप्यात आत न जाताच निघून गेल्याचे पाहून मी अत्यंत निराश झालो. तरीही धीर धरून काही तरी घडण्याची मी वाट पाहत राहिलो. संधिप्रकाश हळूहळू कमी होत होता. अंधाराने आपले हातपाय पसरणे सुरू केले होते.

अकस्मात दोन पक्षी येवून रामफळाच्या झाडावर बसले. तेथून ते डाळींबाच्या झाडावर गेले, दुर्बिणीतून पाहिले तर ती नर-मादीची जोडी होती. बापाने आपल्या लेकरांकरता परागंदा झालेली त्यांची आई शोधून आणली होती. नर झाडावरच थांबला, मादी खोप्यात आत गेली व ताबडतोब बाहेर येऊन उडून गेली. पाठोपाठ नरही उडून गेला. काही मिनिटांतच ती दोघेही पिलांकरिता चारा घेऊन आली. घुप्प अंधार होईपर्यंत त्यांचे चारा घेऊन येणे व चार्‍याला जाणे सुरूच होते.

त्यांचे पिलांवरचे प्रेम पाहून त्या दोन्ही पक्षांबद्दल आदर, सन्मान निर्माण झाला. मनोमन त्या सुगरण पक्ष्याच्या जोडप्याला अभिवादन केले. अत्यंत आनंदाने व प्रसन्न मनाने मीही माझ्या पिलांना आणि त्यांच्या आईला पाहण्यास माझ्या खोप्यात निघून गेलो.

- शिरीषकुमार पाटील
19, ‘बनाई’, आय.टी.आय. कॉलनी,
कांतानगर कॅम्प, अमरावती - 444602
भ्र. : 9421818695







No comments:

Post a Comment